शेतीकथा | सालगडी : कथा शेतकऱ्यांची

मुलांच्या शिक्षणासाठी राबणाऱ्या मजुरांची अन त्याला मदद करणाऱ्या शेतकऱ्यांची कथा

सालगडी

लेखक : श्री. श्रीकांत रामचंद्र करे

मु. निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे

मो. 9960755087

महादू जोरात चालत व्हंता. त्याच्या डोक्यात चक्र फिरत व्हती. आपलं आयष्य गेलं गरिबीत.आता कायबी झालं तरी पोरीला शिकवायचा. माझ्या बापाकडं पैसे नव्हतं म्हणून माझ्यावर ही येळ आली, पण आता नाय.

त्याचा पायजमा फाटलेला होता. त्याला गॅटर लावलं होतं. फाटलेला शर्ट दोन ठिकाणी शिवला व्हंता, अनवाणी पायानं तो तसाच चालत पाटलाच्या रानात पोचला.

पाटील आधीच येऊन रानात बाजेवर बसलं व्हते, आले बरोबर महादूनं लवून राम राम घातला. त्याबरोबर पाटील त्याला म्हणलं, “फोदरीच्या तुझ्या बापाचं रान हाय का? दिस डोक्यावर आला.”
मग महादू म्हणला, “पाटील, मला तसं नव्हतं म्हणायचं..”
पण पाटलांना त्याचं वाक्य अर्धवट सोडलं “तर कसं नाही आम्ही काय खुळं हाय का” त्यावर महादू म्हणला, “आज जरा पोरीच्या शाळेत गेलतो, दहावीला ९० टक्के मार्क पडलित, तवा तालुक्याला ऍडमिशन घ्यायचंय पोरगी हुशार हाय, त्याची चौकशी करायाला गेलतो.”
त्यावर पाटील म्हणलं,”आरं पोरगी म्हणजे लोकांच्या घरची ! तवा ऐक, तिचं हात पिवळं कर, तेवढं बघ.”
त्यावर महादु म्हणला, “तसं नाय पाटील मला तर दोनच पोरी हायत, आमचं आयुष्य गेलं लोकांच्या सालं घालण्यात, निदान त्यांच्या वाट्याला हे दिस नगं.”
त्यावर पाटील म्हणले,”बघ तुला जसं करायचं तसं,”
त्यावर महादु म्हणला, “पाटील तुम्ही आमचं मायबाप, तंवा पोरीच्या शाळेला एक पन्नास हजाराचे नड हाय, तेवढी पुरी करा. वाटलं तर ह्या सालाचा पैसा माना, आन मला सालाची उचल तेवढी द्या.”

त्यावर पाटलानी पानांची चंची सोडली आन तोंडात पानाचा इडा टाकताना थोडं डोकं खाजवत ,आन म्हणलं “उद्या वाड्यावरणं पैसे घेऊन जा, पर ध्यानात ठेव कामात हयगय करायची नाय, लवकर यायचं. नायतर पुण्यांदा कटकट करशील ते काय आपल्याला जमणार नाय,हाय तुझी इच्छा तर शिकीव पोरीला.लोकं लग्नासाठी साल धरतेत तू शिक्षणासाठी धरतोय चांगलंच हाय.”

पाटील राजी झाल्यावर त्यो खुशीन कामाला लागला. आज त्याला लय आनंद वाटत व्हंता,इतके दिस तो साल धरायला लागल्याबद्दल नशिबाला दोष देत होता, पण आज पहिल्यांदाच त्याला या कामाचा हुरूप आला होता. त्या आनंदात कसा दिस बुडला ते त्याला कळलं नाही. तो सांचं घरी आला तर त्याची बायको लक्ष्मी, पोरगी राजश्री ही सकाळपासून काळजीत व्हंती घरात सुतक पडल्याची कळा व्हती ,त्यांना काळजी व्हती की ऍडमिशन ला पैसे मिळणार नायत,
पण तेवढ्यात महादू हसत आला. “लवकर च्या ठिव तोंड गोडकर राजश्रीच्या ऍडमिशन ची सोय झाली ,चला सामान बांधा.”

रात्री सारी झोपली पण महादू मात्र एकटाच जागा व्हंता, त्याच्या घरावल्या जुन्या गंजलेल्या पत्र्याच्या बिळातून आज जे पूर्णिमेचं चांदनं बरसत व्हंतं. इतके दिवस त्याला याचा राग यायचा पण आज त्या चादण्याचं शीतल प्रकाश कित्येक पिढ्याचा काळोख भेदून राजश्री च्या चेहऱ्यावर पडला व्हंता, त्याचं एक वेगळं समाधान घेऊन महादू झोपला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*