Blog | चारा छावणी नव्हे छळछावणी..!

शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने चारा छावणीला नको दावणीला द्या, अशी भूमिका मांडण्यास काही शेतकरी बांधवांनी सुरुवात केली आहे. त्यापैकी एक प्रातिनिधिक म्हणावी अशी प्रतिक्रिया आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. इतरांनी आपल्याही भावना मांडल्यास सरकारी धोरण बदलणे किंवा त्यातील त्रुटी दूर करण्यास खऱ्या अर्थाने मदत होईल.

सध्या महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात दुष्काळ आहे. याचं फार मोठं संकट शेतकऱ्यांवर आहे. पशुपालकांसाठीही हा फार कठीण काळ आहे. यातच शासनाने चारा दावणीला देण्यापेक्षा छावणीला दिला आहे, चारा छावणीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होतात, एक तर दिवसरात्र तिथं एक माणूस गुंतून पडतो. शक्यतो त्यात कुटुंबातील वृद्ध, महिला व लहान मुले यांचा मोठ्या प्रमाणात भरणा असतो. कारण कमावत्या व्यक्तीला सर्व कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी रोजंदारीवर जावं लागते. खरंतर चारा दावणीला दिला तर तो शेतकरी आपल्या सोयीनुसार जनावरांना टाकू शकतो व त्यासाठी दिवस-रात्र राखण करण्याची वेगळी गरज नसते.

दावणीला जनावर असल्यावर त्याच्यावर कुटुंबातील सर्वांच लक्ष असतं. त्यासाठी फारसा वेगळा वेळ द्यायची गरज पडत नाही. मात्र व्यावसायिक पशुपालकांना वेळ द्यावा लागतो. परंतु छावणीला जनावर नेल्यावर मात्र त्या जनावरापाशी एक माणूस रात्रंदिवस ठेवावा लागतो. या ठिकाणी प्रचंड उकाडा असतो. त्यामध्ये मुलं, वृद्ध माणसं, महिला यांना छोट्याशा आडोशाचा आधार घेऊन रहाव लागत. त्याचप्रमाणे बऱ्याचशा चारा छावणीत तिथं यांच्या टॉयलेटची शौचालयाची सोय नसते. तसेच जेवणाचे डबे घेऊन घरून यावं लागतत. यात आरोग्याची हेळसांड मोठया प्रमाणात होते. काहींचा दोनवेळचा डबा एकदाच येतो. उकाड्याने ते अन्न बऱ्याच वेळा खराब होत. परंतु नाईलाजामुळे बऱ्याच वेळा ते अन्न खाल्ले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न उभा राहतो.

शिवाय जनावरे इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आल्यावर त्यांना वेगवेगळ्या साथीच्या मिळालेल्या रोगांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण राबवावे लागते. शिवाय छावण्यांमध्ये होणारा भ्रष्टाचार पाहता चारा छावणी ही शेतकऱ्यांसाठी वरदानछावण्या वरदान न होता एक प्रकारच्या छळ छावण्या होऊ पाहतात. यासाठी शासनाने चारा दावणीला द्यायची व्यवस्था करावी. शेतकऱ्याच्या व त्यांच्या जनावरांच्या आरोग्याच्या विचार करता तसेच आर्थिक दृष्टीने विचार करता चारा दावणीला शासनाने द्यायला पाहिजे. अडचणीच्या काळात शासनाने शेतकऱ्यांचा मजबुरीचा फायदा न घेता त्यांना सढळ हाताने मदत करण्याचा विचार करावा. तसेच अनेक स्वयंसेवी संस्था, कारखाने यांनी पुढे येऊन शेतकऱ्यांना चारा दावणीला द्यावा.

लेखक : ॲड. श्रीकांत रामचंद्र कडे

अध्यक्ष, पुणे जिल्हा शेतकरी सुकाणू समिती,

मु.पो. निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे

मो. 996075 50 87

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*