सीट्रस व वेज नेटमध्ये नोंदणीचे ‘कृषी’चे टार्गेट..!

नागपूर : 

निर्यातीमधील वाव आणि भारतीय शेतकऱ्यांना त्यामध्ये असलेल्या संधी लक्षात घेऊन राज्याचा कृषी विभाग यंदाच्या खरीपाचे नियोजन करीत आहे. त्यामुसार सीट्रस नेट तसेच वेज नेटमध्ये नोंदणीचा लक्षांक कृषी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे.

नागपूर येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन निर्यातक्षम फलोत्पादन उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिले. विभागीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.   

या बैठकीस कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक प्र. ना. पोकळे, विस्तार आणि प्रशिक्षण संचालक व्ही. एन. घावटे, मृदा संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक डॉ.कैलास मोने, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

दिवसे म्हणाले की, भाताखालील एकूण क्षेत्रापैकी किमान 15 टक्के क्षेत्र हे फळबाग व भाजीपाला या पिकाखाली आणण्यासाठी प्रत्येक कृषी सहायकाला किमान 10 हेक्टर लक्ष्यांक देण्यात आलेला आहे. निर्यातक्षम फलोत्पादन उत्पादनाकरिता कृषी सहायकांनी किमान 20 शेतकऱ्यांची सीट्रस नेट आणि वेज नेटमध्ये नोंदणी करुन घ्यावी.

शेतीशाळा घेताना कमी पाण्यावर येणारी पिके, कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वाणांचा प्रचार करावा, पिक पद्धतीत जैविक घटकांचा वापर वाढविणे, निंबोळी गोळा करून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गंत भाजीपाला, मसाला पिकांचे क्षेत्र वाढविणे, बांबू आणि रेशीम लागवडीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिवसे यांनी दिले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*