Blog | कृतीशील शिक्षक विक्रम अडसूळ

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असणाऱ्या बंडगरवस्ती या अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले विक्रम अडसूळ या एकमेव शिक्षकाची निवड यावर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून करण्यात आलेली आहे. श्री अडसूळ तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत. आपल्या शिक्षकी जीवनात नवनवीन उपक्रम राबवून शालेय शिक्षण अभ्यासक्रमाला नवी दिशा त्यांनी दिलेली आहे. श्री.अडसूळ यांनी ‘महान्यूज’शी केलेली बातचीत. तीच मुलाखत कृषीरंग जशीच्या तशी वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहे.

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत.
यावर्षी प्रथमच राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आलेली होती. त्यामध्ये मी अर्ज केला. ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे पारदर्शकता अधिक असते. विशेष म्हणजे यावर्षी मुलाखतीही घेण्यात आली. त्या सर्व प्रक्रियेतून मला निवडण्यात आलेले आहे. याबाबत मी केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा तसेच निवड समितीचे मनापासून आभार व्यक्त करतो.

तुम्ही ज्या शाळेत शिकविता त्या शाळेविषयी सांगा ?
कर्जत तालुक्याच्या अंत्यत दुर्गम भागातील बंडगरवस्तीत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. आधी शाळापत्र्यांची होती. शासनाने दिलेल्या आर्थिक सहायतेतून दोन खोल्या बांधलेल्या आहेत. शाळेच्या प्रमुख श्रीमती सविता बंडगर या आहेत. त्यांच्या जिद्दीने ही शाळा उभी राहिली आहे. या शाळेत पहिले ते चौथीपर्यंतचे वर्ग लागतात. या मुलांना आम्ही कुटूंबातील सदस्यांप्रमाणे वागतो. अभ्यासाचा कोणताही ताण विद्यार्थ्यांवर दिला जात नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, तसेच ते या देशातील सुजाण नागरिक बनावे, यासाठी नवनवीन प्रयोगशील उपक्रम राबवित असतो.

विद्यार्थ्यांना अभ्यासात रूची निर्माण व्हावी यासाठी कसे शिकविले जाते.
आमच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे मुख्यत: दारिद्र्य रेषेखालील आहेत. विद्यार्थी दररोज शाळेत यावेत, त्यांचे लक्ष अभ्यासात लागवे, यासाठी शाळेमध्ये ‘आनंददायी शिक्षण’ हा उपक्रम राबविला आहे. याअंतर्गत नाटकाच्या माध्यमातून, बाहुली नाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविले जाते. मुलांनाच पात्र निवडायला सांगितले जाते, लिहायला प्रोत्साहित केले जाते.

अभ्यासासाठी नवीन तंत्रज्ञान, सामाजिक माध्यमांचा वापर शाळेत होत असतो का ?
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे, सामाजिक माध्यमांचे आहे. अभ्यासासाठी संगणक, लॅपटॉप, मोबाईल, यांचा वापर होऊ शकतो. आम्ही आमच्या शाळेमध्ये अभ्यासक्रम शिकविण्यासाठी दृक-श्राव्य साधनांचा उपयोग करतो. शाळेमध्येच छोट्या-छोट्या लघुपटांची निर्मिती केली जाते. स्थानिकांना अभ्यासाचे महत्त्व पटवून लोकसभागातून शाळेला लॅपटॉप, संगणक उपलब्ध करून दिलेले आहे. याचा उपयोगही अभ्यासासाठी केला जातो. विद्यार्थ्यांचा जगाशी संबंध जुळावा यासाठी फेसबुक, यु-ट्युब वरील अभ्यासोपयोगी व्हीडियो विद्यार्थ्यांना दाखविले जातात. व्हीडियो कॉन्फरसिंगद्वारे इतर राज्यातील शाळेंशी तसेच परदेशातील शाळेंशी संवाद साधला जातो, जेणे करून विद्यार्थ्यांचा स्वत:वरील विश्वास वाढेल.

शाळेत होणाऱ्या उत्सवाबद्दल सांगा ?
आपली भारतीय संस्कृती वैविध्यपुर्ण आहे. येथे सर्वच जाती-धर्माचे लोक राहतात. त्यांच्यातील एकोपा कळावा यासाठी आम्ही गणतंत्र दिन, स्वातंत्र दिनासह ईद, दिवाळी, दसरा, रक्षाबंधन असे सर्वच सण साजरे करतो. आमच्या शाळेतील विद्यार्थी सीमेवरील सैनिकांसाठी राखी पाठवतात. विशेष म्हणजे ज्या जवानांना ते राखी पाठवतात. ते सैनिक पत्राद्वारे कळवितात. या माध्यमातून देशप्रेम जागृत करण्याचा प्रयत्नही आम्ही करीत असतो.

विद्यार्थ्यांचा चौफेर विकास व्हावा यासाठी आपण काय करता ?
विद्यार्थ्यांचा चौफेर विकास करणे हा आमच्या शाळेचा उद्देशच आहे. यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयास भेटी देत असतो. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नगरपंचायत, पोलीस स्थानके, न्यायालय तसेच जिल्ह्यातील अन्य प्रेक्षणीय स्थळे यांनाही भेटी आयोजित केल्या जातात.

यासह जेव्हा सैनिक सुट्ट्यांवर येतात तेव्हा ‘सैनिक आपल्या भेटीला’ असा उपक्रम राबविला जातो. अभ्यासाला मनोरंजनाची जोड दिलेली आहे. बेरजेचे झाड, शब्द डोंगर अशा संकल्पनातून गणित, भाषेचा विषय शिकविला जातो.

दर शनिवारी दप्तर मुक्त शाळा असते. या दिवशी सामूहिक वाचन केले जाते. तसेच शैक्षणिक साहित्य बनविण्याचा उपक्रम असतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासह अनेक गोष्टी शिकायला मिळतात.

आपण बंडगरवस्तीतील शाळेत राबवित असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर शाळेंना कशी देता ?
महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमाशी निगडीत मंडळांमध्ये मी सदस्य आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने मला अन्य राज्यांमध्ये आयोजित प्रशिक्षण शिबीरात जाण्याची संधी मिळालेली आहे. मी एमएससीआरटी पुणे येथे जीवन शिक्षण विभाग अंतर्गत ‘भाषिक खेळ’ पुस्तक लेखन समिती सदस्य आहे. भाषिक खेळ -2 या पुस्तकाचे संपादनात मी लेखन केलेले आहे. यासह जीवन शिक्षण, शिक्षण संजिवनी मासिकांमध्येही लेखन करतो. यांची माहिती इतर शिक्षकांना वेगवेगळ्या पद्धतीने देत असतो.

यामध्ये, सामाजिक माध्यमांची विस्तृतता लक्षात घेता मी krutishilshikshak.blogspot असा ब्लॉग तयार केलेला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून विविध शैक्षणिक विषयावर लेखन करीत असतो. फेसबुक आणि यु-ट्युबवर माहिती अद्ययावत करीत असतो. यामुळे इतर शाळेतील शिक्षक त्यांच्या शाळेत ती राबवितात. यासह मी ‘ॲक्टीव्ह टिचर्स महाराष्ट्र’ असा शिक्षकांचा समूह तयार केलेला आहे. या समूहामध्येही विविध नाविण्यपूर्ण राबविलेल्या उपक्रमांची माहितीचे आदान-प्रदान केले जाते. या सर्वांचा उद्देश चांगले विद्यार्थ्यी घडविणे हाच आहे.

लेखक : अंजु निमसरकर-कांबळे
माहिती अधिकारी,
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
मो. 9899114130

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*