शेवंतीची फुलशेती अर्थात शेतकऱ्यांची प्रगती..!

गुलाब म्हटले प्रेमाचे प्रतिक अशी ओळख आपल्याला पक्की असते. तसाच प्रकार झेंडू आणि शेवंती या फुलाबाबत आहे. ही दोन्ही फुले सणासुदीच्या काळातील महत्वाचा घटक आहेत. दसरा व दिवाळीचा हंगाम लक्षात घेऊन आणि फुले येण्यासाठीचा योग्य कालावधी लक्षात घेऊन शेवंतीची लागवड एप्रिल किंवा मे महिन्यात उरकून घ्यावी. कारण सणासुदीच्या काळातील शेवंतीचे चढे भाव शेतकऱ्यांच्या प्रगतीला नक्कीच हातभार लावतील. भारतासह अमेरिका, जपान आणि इतरही बऱ्याच देशांमध्ये उत्पादन व लागवडीमध्ये गुलाबानंतर शेवंतीचा नंबर लागतो. जपानचे तर हे राष्ट्रीय फूल आहे. खुल्या वातावरणात आपल्याकडे शेवंतीची लागवड होते. मात्र, शेडनेट व पोलीहाउसच्या नियंत्रित वातावरणातही वर्षभर नियमित आणि जास्त उत्पादन मिळणे शक्य आहे. 

शेवंतीच्या जाती

पांढरी फुले : राजा, पांढरी रेवडी, बग्गी, शरदमाला, ब्युटी, स्नोबॉल, कस्तुरबा गांधी, जेटस्नो, शरदशोभा, मिरा, शरदमाला, वर्षा, मेघदूत, कारगील, मोहिनी, शरदशृंगार आदि.

पिवळी फुले : झिप्री, सोनाली तारा, पिवळी रेवडी, चंद्रमा, सोनार बांगला, सुपर जायंट, इंदिरा आदि.

जांभळट गुलाबी : महात्मा गांधी, क्लासिक ब्युटी, पिकॉक  आदि.

आपल्याकडे लाल, निळ्या, पिवळ्या व पांढऱ्या जातींची लागवड महाराष्ट्रामध्ये अहमनगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि नागपूर येथे केली जाते. एप्रिल-मे महिन्यामध्ये शेवंतीची लागवड केल्यावर ऑक्टोबर-फेब्रुवारी या कालावधीमध्ये फुले तोडणी करता येते. शेवंतीला फुले येण्यासाठी किमान ९-१३ तासांचा अंधाराचा कालावधी गरजेचा असतो. आपल्याकडे हा कालावधी फक्त हिवाळ्यामध्येच असतो. त्यामुळेच आपल्याकडे हा कालावधी व हवामान लक्षात घेऊन लागवड आणि पिक व्यवस्थापन करावे लागते.


छाट कलमाने लावलेली रोपे शेवंतीला फुले येईपर्यंत वाढविली जातात. चांगल्या प्रतीचे माध्यम वापरल्यास कलमाला मुळ्या फुटण्याची क्रिया सहजपणे होते. रोपवाटिकेत कलमांची लागवड करताना दोन छाटांमध्ये २ तर, दोन ओळीत ५ सेंटीमीटर अंतर ठेऊन जमिनीत सरळ उभे राहू शकतील इतपतच दाबावेत. ४-६ सेंमी लांब आणि ३.५-४.७ मिलिमीटर जाडी असलेले छाट लागवडीसाठी उत्तम असतात. छाटांना चांगल्या मुळ्या येण्यास २ आठवडे लागतात. 

शेवंतीची लागवड करण्यापुर्वी जमीन खोलवर नांगरून, कुळवून भुसभूशीत करून घ्यावी. प्रतिहेक्टरी ४० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे. लागवड सरी वरंब्यामध्ये ३०x२० सेंमी अंतरावर पोटाशी करावी. प्रतिहेक्टरी १,४०,००० रोपे यासाठी लागतात. त्यानंतर रोपांना आधाराची सोय करावी. दांडे अर्थात फुटवे हाताळणी करण्यालायक झाल्यावरच छाटणी करावी. फुटव्यावरील अनाश्यक कळ्या काढून टाकण्याच्या क्रियेला ‘डिसबडींग’ म्हणतात. खतांच्या मात्रा शक्यतो फुले येण्यापूर्वीच द्याव्यात. शेवंतीला नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची गरजेनुसार मात्र द्यावी. वाढीच्या काळात खतांबरोबर पाण्याची आवश्यकता असते. फुलकळ्या सुरुवात झाल्यानंतर पानांची वाढ मंदावल्याने पाण्याची गरज कमी होते. त्यातही पाणी आणि खते एकाचवेळी देण्यासाठी ठिबकचा वापर करता येतो.

या फुलपिकावर मावा, फुलकिडे, लाल कोळी, अस्वली अळी या किडरोग येतात. त्याची काळजी घ्या. तसेच या पिकला बुरशीजन्य मूळ कुज, खोड कुज, मर, काजळी, पानावरील ठिपके, भुरी असे रोग येतात. जीवाणूजन्य करपा, विषाणूजन्य खुजावा, केवडा असे रोग येऊ शकता.

शेवंतीची फुले शक्‍यतो सूर्योदयापूर्वी काढावी. यातून हेक्‍टरी साधारणतः ७ ते १३ टनांपर्यंत सुट्या फुलांचे उत्पादन मिळते. काही शेतकऱ्यांनी हरितगृहात किंवा शेडनेट यामध्ये यापेक्षाही जास्त उत्पादन मिळविले आहे. लांबच्या बाजारपेठेसाठी बांबूच्या करंड्यांचा, तर जवळच्या बाजारपेठेसाठी पोत्यांचा उपयोग शेतकरी पॅकिंगसाठी करतात.
लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यात फुलांची तोडणी सुरू होऊन महिनाभर चालते. पूर्ण उमललेल्या फुलांची तातडीने काढणी करावी. उमललेली फुले उशिरा काढल्यास फुलांचा रंग फिक्कट होतो. हिरवट असतानाच फूल दांडे कापते वेळी कापण्याचे ठिकाण पुरेसे मऊ असावेत. नंतर दांड्यांच्या खालच्या बाजूची काही पाने काढून टाकून दांडे पाण्यामध्ये बुडवून ठेवावे. नंतर ५-६ तासांनी फुलांची प्रतवारी करून गड्डे बांधावे.

शेवंती पिकावर मर आणि पानावरील ठिपके हे महत्वाचे रोग आढळतात. मर रोग हा पिकाच्या लागवडीपासून वाढीच्या काळात ते फुले येण्याच्या कालावधीपर्यंत केव्हाही होतो. मर रोगामुळे झाडांची खोडे तपकिरी होतात, पाने पिवळी पडून निस्तेज होतात आणि काही दिवसांत झाड मरते. या रोगाच्या नियंत्रणासाठी झाडाच्या मुळाशी मॅंकोझेब द्रावण ०.२ टक्के किंवा कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड ०.३ टक्के द्रावण ओतावे. पानांवरील ठिपके हा रोग पावसाळी आर्दता असताना दमट हवामानात येतो. जमिनीलगतच्या पानांवर सुरुवात होते. त्यावर लक्ष ठेवावे. त्यामध्ये पानांवर काळपट आणि तपकिरी गोलाकार ठिपके पडून ते हळूहळू मोठे होतात. नंतर संपूर्ण पान करपते. याचा प्रसार रोपाच्या बुंध्याकडून शेंड्याकडे होत जातो. खूप दुर्लक्ष झाल्यास नंतर कळ्या आणि फुलेदेखील याला बळी पडतात. याच्या नियंत्रणासाठी मॅंकोझेब ०.२ टक्के / कार्बेनडॅझीम ०.१ टक्के / क्‍लोरोथॅलोनील ०.२ टक्के यापैकी एका बुरशीनाशकांची आलटून-पालटून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करा. पाने गुंडाळणारी कोळी कीड दिसल्यास पाण्यात विरघळणारे गंधक ३ ग्रॅम/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पावसाळ्यात अस्वल अळीचा प्रादुर्भाव आढळतो. ही अळी पाने खाऊन पिकाचे मोठे नुकसान करते. अशावेळी क्विनॉलफॉस २ मिली प्रतिलिटर प्रमाणात फवारल्यास या किडीचे प्रभावी नियंत्रण होते. गरजेनुसार पुन्हा एक-दोनदा याची फवारणी करून घ्यावी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*