कृत्रिम पावसाची होईल कमाल, तरच शेतकरी होईल मालामाल..!

यंदाच्या भीषण दुष्काळाने होरपळलेल्या ग्रामीण भागासह उकाड्याने हैराण झालेल्या शहरी भागालाही आता मान्सूनच्या पावसाचे वेध लागले आहे. दमदार पाऊस होऊन शेतशिवार फुलेल, बहरेल आणि चांगले अन्नधान्य पिकून चार पैसे गाठीला ठेवता येतील, असे स्वप्न ग्रामीण भाग पाहत आहे. तर, शहरी भाग मुबलक व दर्जेदार अन्नाच्या अपेक्षाने आणि शितलतेच्या अपेक्षाने पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे. मात्र, त्याचवेळी भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट यासारख्या संस्थांनी यंदाही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशावेळी भारतीय व मराठी शेतकऱ्यांचा एकमेव आशेचा किरण उरला आहे, तो म्हणजे कृत्रिम पाऊस..!

दीर्घकालीन विचार पाहिजे

होय, यापूर्वी हा शब्द अनेकांनी ऐकला, वाचला आणि अनुभवला असेल. तोच एकमेव आशेचा किरण या महाराष्ट्र भूमीवर पडल्यास शेतीत काहीतरी सुखद घडण्याची शक्यता आजच्या घडीला वाटते. शेतीमधील समस्या या एका दिवसात, वर्षात किंवा एकाच तपात सुटणाऱ्या नाहीत. त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतात. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांनी डॉ. एम. एस. स्वामिनाथन व इतर शेती संशोधक यांच्या नेतृत्वाखाली पन्नासेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कामामुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आताही पाण्याची समस्या सोडविण्यासाठी वापर कमी करण्यासह पाऊस पाणी यांचे योग्य संवर्धन यासाठी ठोस व शास्त्रशुद्ध पद्धतीने कामाची गरज आहे.

ठोस नियमावली गरजेची

भारत देशात २००३ पासून कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेशात कृत्रिम पावसाचे प्रयोग अमेरिकन कंपनीद्वारे करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कायपिक्स नावाचा प्रयोगामध्ये देशातील हवामान संशोधन करणाऱ्या संस्थांचा यामध्ये समावेश होता. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटरीऑलॉजी (आयआयटीएम) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली २००९-२०११ मध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला. मे ते सप्टेंबर या काळात सर्व भारतभर मान्सूनच्या ढगांची निरीक्षणे विमानाद्वारे करण्यात आली. तापमान, उर्ध्व गती, पाण्याचे प्रमाण, मेघबिंदूंचे आकारमान, त्यांची व्याप्ती यांचे निरीक्षण केल्यावर लक्षात अआले की, पर्जन्य छायेतील ढग मेघबीजनासाठी उपयुक्त आहेत. २०१० व २०११ मध्ये हैद्राबाद येथून संप्टेंबर-आक्टोबर महिन्यात तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात हे प्रयोग केले गेले. मात्र, यासाठी ठोस नियमावली तयार नसल्याने नंतर हा प्रकल्प कोर्टाच्या कचाट्यात अडकला आणि बंद पडला. मात्र, त्यातील निरीक्षणे खूप महत्वाची ठरली.

ढगात मोठ्या आकाराचे बीजरोपण करून नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसाची प्रक्रिया उत्तेजित कारण्यासाठी मेघबिजन केले जाते. सोडियम क्लोराइड म्हणजेच मिठाच्या पावडरचा ढगात फवारा केला जातो. मिठाचे कण ढगातील बाष्प शोषून घेतल्याने त्यांचा आकार १४ मायक्रॉनपेक्षा वाढून पाऊस पडायला सुरवात होते. शीत मेघात सिल्वर आयोडाइडच्या कणांचा फवारा केला जातो. प्रत्यक्ष विमानातून उष्णढगांच्या पायथ्याशी असलेल्या उर्ध्व स्रोत यामध्ये रासायनिक नरसळ्या फोडून मिठाची फवारणी करतात. ढगांची निरीक्षणे रडारने केली जातात. त्यानुसार संशोधक निर्णय घेतात.

नाहीतर व्हायचा बैल गेला..!

पावसाळ्यात आपल्याकडे ढग मोठ्या प्रमाणावर दिसतात. मात्र, तरीही पाऊस पडत नाही. कारण त्या ढगांमध्ये अंतर्गत प्रक्रियेद्वारे पाऊस पडण्याची क्रिया पुरेशा वेगाने होत नाही. त्या गतीला फ़क़्त वेग देण्याचे काम कृत्रीम पावसाच्या प्रयोगात करतात. त्यासाठी यंदा सरकारने पुढाकार घेऊन कामाला लागण्याची गरज आहे. नाहीतर, सप्टेंबर महिन्यात पाऊस नसताना ऐनवेळी धावपळ करूनही काहीच हाती लागायचे नाही. बैल गेला आणि झोपा केला, याला काय किंमत म्हणायची..?

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग (मो. ९४२२४६२००३)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*