शेळीचे दुध आहे बहुगुणी; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

गरिबांची गाय म्हणून महात्मा गांधी यांनी उल्लेख केलेल्या शेळीचे व्यावसायिक महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, तरीही भारतात अजूनही शेळीच्या दुधाला बाजारात किंवा आहारात द्यायला पाहिजे इतके महत्व नाही हे दुर्दैव आहे. उठता-बसता स्वदेशीचा नारा देणार्यांनीही शेळीला दुय्यम मानले आहे. कमी चारा लागणाऱ्या शेळीच्या दुधातील औषधी व पोषक घटक समजून घेतलेल्या कोणालाही या दुधाचे रतीब लावावेसे वाटणे साहजिक आहे. त्याबद्दल माहिती देणारा हा लेखप्रपंच.

लहान बालकांना मातेच्या दुधाखालोखाल पचनाला हलके शेळीचे दूध असते. शेळीचे दुध पचनास हलके असल्याने नवजात शिशू व चिमुरड्यांना आईंच्या दुधाचा पर्याय म्हणून शेळीचे दुध द्यावे, असे आहारतज्ञ आणि वैद्य नेहमीच सांगतात. दररोज अर्धा लिटर शेळीचे दूध पिणारे महात्मा गांधीजी आजारी न पडता जीवनभर कार्यप्रवण राहिले. हे दुध शक्तिदायक व औषधीही समजले जाते. तरीसुद्धा उठता-बसता आयुर्वेदावर बोलणाऱ्या देशात शेळी हा प्राणी दुधापेक्षा मांस उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, दुहेरी महत्वाच्या या प्राण्याला दुधामुळे आगामी काळात आणखी महत्व येण्याची चिन्हे आहेत.

भारत देशात जरी शेळीच्या दुधाला अजूनही महत्व नसले तरी स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये शेळीला ‘स्वीस बेबीज फॉस्टर मदर’ अर्थात लहान बाळाची पालकमाता म्हटले जाते. तर, इतर काही युरोपीय राष्ट्रांमध्ये शेळीला ‘वेटनर्स ऑफ इनफंट्स’ अर्थात ‘अर्भकाची दाई’ अशी ओळख आहे.

एका संशोधानुसार शेळीचे दूध प्राशन केलेल्या बालकांमध्ये गाईच्या दुधापेक्षाही उत्तम रिझल्ट मिळालेले आहेत. बालकांच्या वजनातील वाढ, उंची, सुदृढपणा, हाडातील खनिज द्रव्यांची पातळी, रक्तातील जीवनसत्व अ, कॅल्शिअम, थायमिन, रोबोप्लेविन, नाएसिन व हिमोग्लोबीनच्या प्रमाणात शेळीच्या दुधामुळे चांगली प्रगती आढळली आहे.

शेळीच्या दुधात कॅल्शिअम, फाॅस्फरस, पोटॅशिअम ही मॅग्नेशिअम ही खनिजे इतर दुधापेक्षा जास्त प्रमाणात आढळतात. ही खनिजे हाडे व दात मजबूत ठेवण्यासह रक्तदाब आणि हृदयविकारापासून बचाव करण्यात फायदेशीर आहेत.

असे महत्वपूर्ण गुणधर्म असूनही या तुलनेने जास्त दुध देणाऱ्या शेळीच्या जाती शोधण्यात भारतीय कृषी विद्यापीठे व पशुसंवर्धन विभागाने विशेष रुची दाखविलेली नाही. तसेच या दुधापासून उत्तम दर्जाचे आरोग्यदायी अन्नपदार्थ बनविण्यामध्येही भारतीय खूपच मागासलेले आहेत. हेच मागासलेपण घालविल्यास शेळीचेही व्यावसायिक महत्व नक्कीच आणखी वाढेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*