देशाला सक्षम कृषिमंत्री मिळणार का..?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये सर्वाधिक नकारात्मक चर्चेत राहिलेले मंत्रालय म्हणजे कृषी कल्याण मंत्रालय. नाव बदलूनही शेतकऱ्यांचे कल्याण करण्यात हे मंत्रालय अपयशी ठरले. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्यानंतर आता या मंत्रालयाची धुरा कोण वाहणार, की पुन्हा एकदा सिंग यांचीच वर्णी लावून महाराष्ट्र सरकारप्रमाणे देशाचाही शेतीचा गाडा धोरणहीन पद्धतीने हाकला जाणार, याकडे सध्या देशाचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कुशल राजकीय नेतृत्वाखाली देशात पुन्हा एकदा लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. सायंकाळी मोदी यांच्यासह त्यांचे काही मंत्री शपथ घेऊन पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार आहेत. मात्र, अशावेळी देशाला कुशल व कार्यक्षम कृषिमंत्री मिळणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यंदातरी मोदी-शाह यांनी स्वतंत्रपणे व जबाबदारीने सकारात्मक धोरण राबविणारे कृषिमंत्री देशाला द्यावेत अशीच शेतकरी व ग्रामीण भागाची भावना आहे.

सिंग यांच्या कार्यकाळात शेतीचे काय चालले होते, याचा थांगपत्ता निवडणुकीचे निकाल लागल्यावरही स्पष्ट झालेले नाही. मोदी-शाह यांच्यासह भाजपने प्रचारातही त्यावर अधिकृतरीत्या चुप्पी साधली होती. अशावेळी नवा भारत घडविताना शेती क्षेत्राला सकारात्मक दिशा देणारा मंत्री देशाला लाभाव अशीच अनेकांची इच्छा आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दोन टर्ममध्ये देशातील शेतीच्या क्षेत्राला दिलेला विकासाचा विचार आता मोदींच्या मंत्र्यांनीही द्यावा, अशीच शेतकऱ्यांची भावना आहे. ती भावना सरकार पूर्ण करणार की पायदळी तुडविणार, यावर ग्रामीण भागाचे समाजकारण व अर्थकारण गती घेणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*