खरीप नियोजन | तरच मूग लागवडीतून होईल धनलाभ..!

दुष्काळाशी दोन हात करतानाच महाराष्ट्रातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीलाही लागला आहे. हवामान विभाग व खासगी हवामान अंदाजानुसार चांगला पाऊस होऊन आर्थिक उन्नतीचा राजमार्ग सापडण्याच्या आशेने शेतकरी अडचणींवर मात करण्याच्या आशेने आता पावसाची वाट पाहत आहेत. खरीप हंगामात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यास मुग पिकाची लागवड करून कमी कालावधीत आर्थिक समाधान मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण होणार की फोल ठरणार, हे वरुणराजा ठरविणार आहे.

हमखास पाऊसमान असो की अवर्षणप्रवण प्रदेशातील मध्यम जमीन किंवा भारी कसदार काळ्या जमिनीत शेतकरी खरीप हंगामात मूग आणि उडीद अशी पिके घेतात. फक्त अडीच ते तीन महिन्यातील या पिकाचा झटका अनेकदा शेतकऱ्यांना धनलाभ मिळवून देण्यास उपयोगी ठरतो. मात्र, याचे सगळे गणित फ़क़्त पावसावरच अवलंबून आहे. झटकन पैसा देणाऱ्या या कडधान्य पिकाची महाराष्ट्रातील उत्पादकता खूपच कमी आहे. अनियमित पर्जन्यमान, जमिनीची अयोग्य निवड, बीजप्रक्रिया न करणे, प्रमाणित बियाणे व खतांची मात्रा देण्याकडे होणारे दुर्लक्ष, दाट पेरणी, कोड व रोग व्यवस्थापनाचा अभाव, आंतरमशागत व सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे राज्यातील उत्पादकता कमी आहे. एकात्मिक व्यवस्थापन व आधुनिक तंत्राचा उपयोग करून याची उत्पादकता वाढविण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.

मशागत व पेरणी

मूग लागवडीकरिता मध्यम ते भारी आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. उन्हाळ्यात शेतात खोल नांगरट करून मृगाचा पहिला पाऊस झाल्यावर वखरणीने जमीन भुसभुशीत करावी. १५ ते २० गाड्या शेणखत एका हेक्टरसाथी जमिनीत टाकल्यास उत्पादकता वाढते. मॉन्सूनचा पाऊस पडल्यानंतर वाफसा स्थिती आल्याबरोबर या पिकाची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी. त्यानंतर शक्यतो पेरणी करणे टाळावे. पेरणीस उशिरामुळे उत्पादनातही घट होते. पेरणीसाठी हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे बाविस्टीन १ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम चोळून वापरावे. प्रतिकिलो बियाण्यास ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम बीजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य (भुरी व मूळकुज) रोगापासून संरक्षण होते. तसेच प्रतिकिलो बियाणास रायझोबियम जिवाणू संवर्धक व पीएसबी प्रति २५ ग्रॅम लावून पेरणी करावी. दोन ओळीतील अंतर ३o आणि दोन रोपांतील अंतर १o सेंमी ठेवा. मात्र आंतरमशागतीच्या सोयीनुसार दोन ओळीत ४५ सेंमी अंतर वाढविण्यास हरकत नाही.

पेरणीसाठीच्या जाती

या पिकाच्या पारंपारिक जातीसह विविध कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या सुधारित जातीही पेरणीसाठी वापरल्या जातात. कोपरगांव हे वाण मर, करपा, पिवळा केवडा रोगास प्रतिकारक आहे. बिया हिरव्या रंगाच्या व चमकदार असून हेक्टरी सरासरी उत्पादन ९ ते १o क्विंटल मिळते. पश्चिम महाराष्ट्रात हा वाण आणि फुले मुग २ या जाती पेरणीसाठी उत्तम समजल्या जातात. तर, बीएम ४ याची शिफारस मराठवाडा व विदर्भाच्या काही भागासाठी केलेली आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन ९ ते ११ क्विंटल मिळते. बीपीएमआर १४५, बीएम २००२-१, बीएम २००३-०२ ही जातही मराठवाड्यासाठी योग्य मानली जाते. पीकेव्हीएकेएम ४ हा वाण विदर्भात १२ ते १५ क्विंटल उत्पादन देणारा आहे.

खत व किडरोग व्यवस्थापन

शेतामध्ये शेणखताची योग्य मात्रा देऊन उत्पादनात वाढ शक्य आहे. तसेच पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजे युरिया ४० किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट २५० किलो किंवा डीएपी ८७ किलो अधिक ११ किलो युरिया याप्रमाणे खत टाकावे. पेरणीनंतर एका महिन्यात गरजेनुसार खुरपणी व कोळपण्या कराव्यात. तूर, ज्वारी, कपाशी यामध्ये आंतरपीक म्हणून मूग पिक घेतात. यावर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता रोगप्रतिकारक्षम वाणाची निवड करावी. पावसाच्या झडीनंतर एकदम आठवडाभर पावसाने दडी मारून वातावरण दमट असल्यास भुरी रोग येण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी सल्फेक्स ०.३० टक्के किंवा ३० पोताची गंधकाची भुकटी २० किलो वापरावी. क्लोरोपायसीफॉस २o ई सी २० मिली प्रति दहा लिटर पाणी टाकून फवारणी करावी.

काढणी, साठवणूक व विक्री

पिकाच्या बहुतांश शेंगा पक्व झाल्यानंतर पावसाचा अंदाज पाहून शेंगांची तोडणी करावी. तोडलेल्या शेंगा व्यवस्थित वळवताना पावसाने भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. शेंगा उन्हात वाळवून काठीने बुडवून किंवा ट्रॅक्टरने मळणी करून उत्पादित मूग खेळत्या हवेच्या वातावरणात साठवाव्यात. बाजारातील अंदाज घेऊन मुगाच्या विक्रीचे नियोजन करावे. सुरुवातीला जास्त भाव मिळत असल्यास लगोलग मूग विकावा. तसेच बाजार कमी असल्यास आडते, व्यापारी व इतर शेतकरी यांच्याशी चर्चा करून साठवणूक व विक्री याचे नियोजन करावे.

माहितीचा स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*