गावरान अंडे ओळखायचे असे..!

सध्या देशभरात नाही तर जगभरात सेंद्रिय, विषमुक्त आणि गावरान असा ट्रेंड सेट झाला आहे. १९७० पूर्वीचे अन्नपदार्थ पुन्हा खावेत, त्यांच्यामधील पोषक तत्व महत्वाचे असून रासायनिक, कृत्रिम किंवा प्रयोगशाळेत संशोधित अन्नपदार्थ नकोत म्हणणारे वाढले आहेत. अशावेळी सगळीकडे केज फ्री (पिंजरा विरहित) अंडी किंवा गावरान (देसी) अंडी खायला मागणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. इंग्लिश अंड्यापेक्षा चवीला देसी अंडी खूपच उजवी असतात.

मात्र, सध्या याच चवदार व पोषक अंड्यांची मार्केटमध्ये बदनामी झाली आहे. इंग्लिश अंड्यांना चहापत्तीचा रंग देऊन किंवा ब्राऊन (करडी) एग हीच देसी एग म्हणून विकली जात आहेत. मोकाट पद्धतीने (केज फ्री) अंडी देसी असल्याचे सांगून ब्राऊन एग बाजारात विकली जातात. अशावेळी खरे देसी अंडे कोणते आणि बनावट कोणते, असा प्रश्न पडून ग्राहक चक्रावले आहेत. त्यामुळेच गावरान अंड्याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न…

गावरान अंडी ही पांढरी नसतातच, असा एक गैरसमज सर्रास आहे. तसेच ही अंडी खूप तांबडी असतात असाही अनेकांचा समज आहे. होय, एक मात्र खरे आहे की गावरान अंडी इंग्लिशच्या तुलनेत आकाराने लहान असतात. मात्र, याचाच गैरफायदा घेऊन इंग्लिश किंवा ब्राऊन एगच्या छोट्या अंड्यांना देसी अंडी म्हणून विकले जाते.

गावरान अंडी आणि इतर अंडी यांच्यात चवीला मात्र खूप मोठा फरक असतो. फ़क़्त मिठात ही अंडी खाल्ल्यास चवीचा पूर्ण परिमाण आपण अनुभवू शकतो. तसेच गावरान अंड्यांची केलेली पोळी तुलनेने रुचकर असतानाच त्याद्वारे येणारा सुगंध हा मनाला आल्हाददायक अनुभूती देतो.

गावरान अंडी ही पांढरी असू शकतात, तसेच थोडीफार अंडी करडीही असू शकतात. मात्र, त्यांच्यामध्ये सगळी अंडी एकसारखी (वजन, आकार व रंग) नसतात. खात्रीशीर देसी अंडी देणाऱ्या काही मोजक्या कंपन्या पुणे व मुंबईच्या मार्केटमध्ये काम करीत आहेत. अशा अंड्यांच्या चव व पौष्टिक गुणधर्मामुळे त्यास मागणीही जास्त आहे. मात्र, खात्रीचा उपदान व पुरवठा अजूनही म्हणावा त्या पद्धतीने विकसित होऊ शकला नाही, हे या चवदार अंड्यांचे दुर्दैव..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*