खरीप नियोजन | शेतकरी बंधुंनो, येत्या हंगामात असे करा नियोजन

यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा येणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केल आहे. त्यातच मे महिन्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाने गुगांरा दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यांची नजर सतत आभाळाकडे भिरभिरत आहे. अशा पद्धतीने दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या असताना राज्यांत अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने खरीपाच्या तयारीसाठी शेतकऱ्याची लगभग सुरु झाली आहे. यंदाच्या वर्षी आपल्या जमिनीत केंव्हा, काय आणि कसे पेरावे या संबंधीचा खास लेख राज्यातील बळीराजासाठी…

पेरणीची घाई करू नका
केरळात शनिवारी मान्सूनचे आगमन झाले असले तरी दक्षिण कोकणात तो १४ जूनपर्यंत येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. राज्याच्या अन्य भागात मात्र मान्सून आणखी उशिरा येऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आव्हान राज्याच्या कृषी विभागाने केले आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यास, जमिनीत वाफसा येताच खरीप पिकांच्या पेरण्या कराव्यात. पेरणी करतांना विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या वांणाची योग्य अंतरावर, योग्य वेळी, योग्य प्रमाणात खत मात्रा देऊन पेरणी करा. स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच पेरणीचे निर्णय घ्यावेत.

बाजरी लागवड व व्यवस्थापन
बाजरी पिकाकरीता पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमिन निवडावी. हलक्या
जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते. बाजरीची पेरणी १५ जून ते १५ जुलै दरम्यान करावी. पेरणीकरिता फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती हे संकरित वाण आणि धनशक्ती हा सुधारित वाण हेक्टरी ३ ते ४ किलो या प्रमाणात बी वापरावे. पेरणी २ ते ३ सेमीपेक्षा जास्त खोलीवर करू नये. कोरडवाहू क्षेत्रात ४५ x १५ से.मी व नियमित पावसाच्या ठिकाणी अथवा पाण्याची सोय असल्यास ३० x १५ सेमी अंतरावर पेरणी करावी. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास प्रत्येकी २५ ग्रॅम अझोस्पिरीलम व स्फूरद विरघळवणाऱ्या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. पेरणी करतांना ४० किलो नत्र ,२० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश हलक्या जमिनीत तर, मध्यम जमिनीत ५० किलो नत्र २५ किलो स्फूरद आणि २५ किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. पेरणीच्या वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फूरद व पालाश आणि २५ ते ३० दिवसांनी अर्धे नत्र जमिनीत ओलावा असल्यास दयावे. रासायनिक खते दोन चाडीच्या पाभरीने पेरून दयावे.

सोयाबीन पिक पेरणी
सोयाबीनच्या पेरणीकरिता मध्यम काळी पोयट्याची, चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. पेरणी खरीपात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वापशावर करावी. भारी जमिनीत पेरणी ४५ x ५ सेमी आणि मध्यम जमिनीत ३० x १० सेमी अंतरावर करावी. सलग पेरणीकरिता ७५-८० किलो प्रतिहेक्टर तर टोकण करण्याकरिता ४५-५० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. पेरणीकरिता जे.एस.३३५, एम.ए.सी.एस ११८८, फुले कल्याणी (डी.एस २२८), जे.एस ९३०५, कें.एस.१०३, फुले अग्रणी (केडीएस ३४४) आणि फुले संगम (केडीएस ७२६) या वाणांचा वापर करावा. आंतरपिकांमध्ये सोयाबीन + तूर (३:१) या प्रमाणात घ्यावे.सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ७५ किलो स्फूरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्या वेळी दयावे. खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावीत अथवा दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून दयावे.

सूर्यफुल पिक पेरणी
लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिन निवडावी. आम्लयुक्त आणि
पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीला वाफसा येताच सूर्यफुलाची पेरणी करावी. मध्यम जमिनीत ४५ x ३० सेमी,तर भारी जमिनीत ६० x ३० सेमी, तसेच संकरीत वाण आणि जास्त कालावधीच्या वाणाची लागवड ६० x ३० सेमी अंतरावर पेरणी करावी. हेक्टरी बियाणे (सुधारित वाण) आठ ते दहा किलो व संकरित वाण पाच ते सहा किलो वापरावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. पेरणीकरिता भानू, फुले भास्कर या सुधारित वाणांची तर फुले रविराज,एम एस एफ एच-१७ या संकरित वाणाची निवड करावी. दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी. कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी पेरणी करताना ५० किलो नत्र,२५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या दयावे.बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ६० किलो स्फूरद + ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी.गंधकाची कमतरता असलेल्या जमीनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खातात अथवा शेणखतात मिसळून दयावे.

तूर लागवड करावी
वाफसा येताच पेरणी करावी. पेरणीकरिता लवकर तयार होणारे आयसीपीएल ८७, विपुला,फुले राजेश्वरी, बीडीएन ७११ या वाणांचा वापर करावा. लागवडीसाठी ९० x ६० सेमी अथवा १८० x ३० सेमी अंतर ठेवावे. याशिवाय बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३ हे मध्यम उशिरा येणारे वाण वापरावेत. पेरणी करतेवेळी प्रतिहेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डीएपी वापरावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. हेक्टरी जातीपरत्वे १० किलो बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बी कमी लागेल.

मुग व उडीद
मुग व उडीदला मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमिन आवश्यक असते. पाणी साचून
राहणारी, क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमिन टाळावी. मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच म्हणजे जूनच्या दुसरा पंधरवडामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशीरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. मुगामध्ये वैभव व बी.पी.एम आर.-१४५ हे दोन वाण रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत.उडीदामध्ये टीपीयू-४ व टीपीयू-१ हे दोन वाण उत्कृष्ट गणले जातात. मुग व उडीद ही पिके अतिशय कमी कालावधीची (७० ते ८०) असल्यामुळे सलग अथवा आंतरपीक म्हणून घेतले जाते.या दोन्ही पिकाचे दोन ओळीत ३० सेमी व दोन रोपांमधील अंतर १० सेमी राहील या बेताने पेरणी करावी. पेरणीकरिता १५-२० किलो प्रतिहेक्टर बियाणे वापरावे. या दोन्ही पिकांना २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.या पिकामध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकाच्या दोन ते चार ओळीनंतर एक ओळ तुरीची पेरावी.

बियाणांची उगवण चांगली होण्याकरिता व रोपवस्थेत बुरशी रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाणास दोन ग्रॅम कार्बेन्डॅझिम व दोन ग्रॅम थायरम ची बीजप्रक्रिया करावी. अथवा ५ ग्रॅम टायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर बाजरी, सूर्यफुलाच्या प्रती किलो बियाणास २५ ग्रॅम अॅझोटोबॅकटर व २५ ग्रॅम पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जीवाणू) संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. तूर, सोयाबीन, मुग, उडीद, मटकी, चवळी, हुलग्याच्या बियाणास २५ ग्रॅम रायझोबियम व २५ ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करताना गुळाचे द्रावण वापरावे. त्याकरिता एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे तासभर सुकवून पेरणी करावी. कोरडवाहू पिकांना संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश या शिफारशीत खत मात्रा पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने द्याव्यात. तत्पूर्वी ५ टन शेणखत अथवा कंपोस्टखत शेवटच्या कुळवाच्या पाळी देते वेळी दयावे.

भुईमुग पेरणी
भुईमुगाच्या पेरणीकरिता मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व
पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हेक्टरी १०० ते १२५ किलो वाणनिहाय बियाणे प्रतिहेक्टरी वापरावे. पेरणी ३० x १० सेमी अंतरावर करावी. पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद द्यावे. अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतमात्रेसोबत जिप्सम ४०० किलो/हेक्टरी (२०० पेरणी वेळी तर उर्वरित २०० आऱ्या सुटताना) जमिनीत मिसळून द्यावे. पेरणीकरिता एस बी.११, टी जी २६, टीअेजी- २४, जेएल २८६, जेएल ५०१, फुले-६०६१, जेएल-२४, फुले व्यास, टीपीजी -४१, फुले उनप,फुले उन्नती, फुले भारती हे शिफारशीत वाण वापरावेत.

चवळी
मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी. पेरणीकरिता १५ ते २० किलो बियाणे प्रतिहेक्टरी वापरावे. पेरणीकरिता सीना, माण व फुले सकस या वाणांची निवड करावी. पेरणी ४५ x १० सेमी अंतरावर करावी. पेरणी करताना २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खतांची मात्र द्यावी म्हणजेच १२५ किलो डीएपी प्रति हेक्टर प्रमाणे पेरणी करताना खत द्यावे.

हुलगा व मटकी
हलकी ते मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते, पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी. हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पेरणीकरिता वापरावे. पेरणी ३० १० सेमी अंतरावर करावी. पेरणीच्या वेळेस १२-१५ किलो नत्र आणि २५- ३० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्र द्यावी. म्हणजेच ७५ किलो डीएपी प्रति हेक्टरप्रमाणे पेरणी करताना खत द्यावे.

राहुरी कृषि विद्यापीठाच्या वतीने मेनगेटवर बियाणांची उपलब्धता
कृषि विद्यापीठाच्या वतीने मका (आफ्रिकन टॅाल) ६ किलो बॅग रु.२७०/-, सोयाबीन (जेएस-३३५ केडीएस- ७२६) ३० किलो बॅग रु.१९५०/-, बाजरी १.५ किलो बॅग(आदिशक्ती रु. २२५/- धनशक्ती रु.६९/-, कांदा (फुले समर्थ ) १०किलो बॅग रु.१२००/- या बियाणांची विक्री दिनांक ६ जुन पासून चालू आहे.

लेखक : डॉ. आदिनाथ ताकटे, प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे),
महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, जि. अहमदनगर. मो. ९४०४०३२३८९

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*