६६ लाख शेतकऱ्यांना मिळाले अनुदान..!

मुंबई :
दुष्काळग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून दुष्काळ निवारणाच्या अनेक उपाययोजनांना शासनाने गती दिली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

ते म्हणाले की, राज्य शासनाने १७ हजार ९८५ गावातील ६६ लाख ८८ हजार ४२२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ हजार ४६१ कोटी रुपयांचे अनुदान जमा केले आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट अशा अनेक उपाययोजना दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी करण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतांना गावातील सध्याची लोकसंख्या आणि पशुधन विचारात घेऊन टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात ९ हजार ९२५ विहिरी, विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. २ हजार ४३८ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व विशेष योजनांची दुरुस्तीची कामे करण्यात आली. राज्यात ५,२४३ गावांना आणि ११,२९३ वाड्या वस्त्यांना ६ हजार ५९७ टँकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

चारा छावण्यात ११ लाखांहून अधिक पशुधन
राज्यात ३० हजार हेक्टर गाळपेर जमीनवर २९.४ लाख मे.टन चाऱ्याचे उत्पादन करण्यात आले. तसेच पशुधनासाठी राज्यात १ हजार ६३५ चारा छावण्या उभारण्यात आल्या. त्यात ११ लाख ४ हजार ९७९ पशुधन दाखल असल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात प्रथमच शेळ्या आणि मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्याची, पशुधनाच्या अनुदानात वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*