Blog | कुंभी पडल्या, पाऊस येणार..!

आपल्या पुर्वजांची निरिक्षण क्षमता अफाट होती. निरिक्षण क्षमतेच्या बळावरच त्यांनी पाऊस येण्याचे संकेत निश्‍चित केले होते. पुणे जिल्ह्याच्या डोंगरी पट्टयात मुसळधार पाऊस पडण्याचे पारंपारिक संकेत आहेत. दुर्गम डोंगरी भागात कुंभी नावाचे झाड आहे. झाडांची फळ गळ म्हणजे मुसळधार पाऊस येण्याचे संकेत असल्याचे समजले जाते. मुसळधार पावसाचा संकेत देणार्‍या कुंभीच्या फळाचा आढावा घेणारा हा विशेष लेख…..

पाऊस येण्याचे संकेत निसर्गच देत असतो. निसर्गाने दिलेले पावसाचे संकेत मानवा सोबत प्राण्यांना सुद्धा कळतात. आपल्या पुर्वजांनी निरिक्षणाच्या अधारावर पाऊस येण्याचे काही संकेत ठरवलेले आहेत. अभ्यासपुर्ण निरिक्षणातून आलेले संकेत एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला सांगितले जातात. पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ, भोर व वेल्हा डोंगरी तालुके म्हणून ओळखले जातात. डोंगरी तालुक्यातील अती दुर्गम भागात कुंभी नावाचे जंगली झाड आहे. दर्‍या खोर्‍यात वाढणार्‍या कुंभीच्या झाडाला वर्षातून एकदाच फळे येतात. कुंभीचे फळ पिवळट हिरव्या रंगाचे असते. फळाचा आकार गोल असतो. सलग आठ ते दहा दिवस ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्यासरी आल्यानंतर कुंभीची फळे गळण्यास सुरवात होते. झाडाखाली फळांचा अक्षरक्ष थर जमा होतो. थर जमा झाल्यानंतर परिसरातील शेतकरी भात पिकाची दहाड (भात पिकाची बियाणे लागवड) टाकायला सुरवात करतात. गेल्या अनेक शतकांपासून सुरु असलेली परंपरा कधी सुरु झाली ? या प्रश्‍नाचे उत्तर कोणालाच देता येत नाही. डोंगरी तालुक्यांच्या दुर्गम भागात सध्या दहाड टाकण्याचे काम सुरु आहे.

कुंभाचे नामकरण…
मावळी भाषेत मडक्याला कुंभ नावाने संबोधले जाते. कुंभाच्या फळांचा आकार मडक्या सारखा असतो. त्यामुळे सदर जंगली फळाला कुंभ नावाने ओळखले जाते.

जंगली प्राण्यांचे आवडते खाद्य..
जंगली प्राण्यांना कुंभाची फळे खुप आवडतात. जंगली प्राण्यांपैकी रानडुकरे फळांचा फडशा पाडतात. गळलेली फळे म्हणजे पावसाचे संकेत असल्याचे प्राण्यांना सुद्धा कळते. त्यामुळे प्राणी व पक्षी सुद्धा पावसाळ्यात सुरक्षीत निवासाची सोय करतात.

औषधी गुणधर्म…
कुंभाच्या फळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. दमा, खोकला, सांध्यावरील सुज आदी विकारांवर कुंभाचे फळ गुणकारी आहे. झाडाच्या सालीमध्ये देखिल विविध औषधी गुणधर्म आहेत. बॅक्टेरियाला प्रतिबंध करण्याचा महत्वपुर्ण गुणधर्म कुंभाच्या फळात आहे.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपयोग करावा..
कुंभाच्या फळांमध्ये ऍटीऑक्साईड व ऍटीमायक्रोबील नावाचे घटक असतात. त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होवू शकतो. त्यामुळे कुंभीच्या फळांचा प्रयोग करण्यापुर्वी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.

लेखक : विशाल केदारी
मो. क्र. : ७७१९८६००५८

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*