Blog | संभाव्य ग्लायफॉसेट बंदी आत्मघातक

बंदीमुळे नव्हे तर तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कीटकनाशक आणि तणनाशक यांचा वापर कमी होत आहे. यासाठी तंत्रज्ञानात वापराचे स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे…

गेल्या वर्षी तणनाशक ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर झाला होता. पण शेतकरी संघटनेनेे (शरद जोशी) यांनी याला तीव्र विरोध केलेने बंदी बारगळली. गेल्या वर्षी बंदी घालण्याच्या विचारामागे अनधिकृत तणनाशक प्रतिबंधक जीएम कापसाच्या बियाणांचा वापर रोखावा, यासाठी होता. यंदा पुन्हा सरकारी स्तरावर ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र यावेळी बंदी घालण्याचा हेतू ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होतो हा आहे.

मनसेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्षांनी 8 डिसेंबर 2018 रोजी ग्लायफॉसेट बंदीबाबत अपर सचिव प्रकाश कदम यांना पत्र पाठवले. त्या पत्रकावर कारवाई करीत अपर सचिवांनी ग्लायफॉसेटमुळे कॅन्सरग्रस्त झालेल्या रूग्णांची सविस्तर माहिती मागवणारे पत्र कृषी आयुक्त आणि कृषी विद्यापीठांना 17 जानेवारी 2019 ला पाठवले आहे. कृषी संचालक (नि.व. गुनि) यांनी 3 एप्रिल 2019 रोजी सर्व विभागीय कृषी संचालकांना पत्र देऊन ग्लायफॉसेटमुळे कॅन्सरग्रस्त झालेल्या रुग्णांची माहिती मागवली आहे. वास्तविक ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होतो काय हा कृषी विद्यापीठांचा संशोधनाचा विषय नाही. त्यासंबंधी कोणतीही पात्रता या विद्यापीठात नाही. कोणाला कॅन्सर झाला असेल तर कशामुळे झाला असेल, हे कृषी विद्यापीठे सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचेकडून माहिती मागवून निर्णय घेणे अयोग्य आहे. या विषयावर मुंबईत टाटा मेमोरियल हॉस्पीटल काम करते. त्यांचा विचार घेणे योग्य होऊ शकते.

पंजाबमधील भटींडा जिल्ह्यात, शेतीतील कीटकनाशके आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे, कॅन्सरचे रूग्ण खूप मोठ्या संख्येने वाढलेची चर्चा, सर्व माध्यमातून खूप प्रमाणात झाली होती. भटींडा-बिकानेर रेल्वे ‘कॅन्सर ट्रेन’ म्हणून प्रसिद्ध झाली होती. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातसुद्धा, भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांच्या वापरामुळे, कॅन्सर रूग्णांची संख्या 60 हजार पेक्षा जास्त असल्याच्या, बातम्या माध्यमातून आल्या होत्या. या दोन्ही ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पिटलने व्यापक पहाणी केली. त्यातून शेतीतील रसायनांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात कॅन्सर रूग्ण झाले हे खोटे आहे, असे टाटा हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी जाहीर केले आहे. पण दुर्दैवाने या बातमीला माध्यमांनी फारशी प्रसिद्धी दिली नाही.

ग्लायफॉसेट तणनाशकांच्या वापरामुळे कॅन्सर झाला, असे मान्य करून अमेरिकेतील दोन ज्यूरी कोर्टांनी कॅन्सर ग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निकाल दिला आहे. या निकालामुळे भारतात ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याचे प्रयत्न काही हितसंबंधी लोकांनी चालवले आहेत. पण अमेरिकेतील ज्यूरी कोर्टाचा निकाल म्हणजे अंतिम सत्य नव्हे. अमेरिकेतील ज्यूरी कोर्ट आपल्या गाव पंचायत सारखे असते. त्यात गावातील मान्यवर नागरिकांना पंच म्हणून बोलावले जाते. ते प्रशिक्षीत न्यायाधीश नसतात. अशा कोर्टात मृत्यूच्या दारात असलेल्या कॅन्सर रूग्णांच्याबद्दल सहानुभूतीने चुकीचे निर्णय होऊ शकतात. या संबंधात संंबंधित कंपनीने उच्च न्यायालयात अपिल केले आहे. या निकालाची पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत वाट पहाणे उचित आहे. खुद्द अमेरिकन शेती खात्याने हा निकाल वैज्ञानिक साक्षी पुराव्यावर आधारित नसलेने ग्लायफॉसेटवर बंदी घालण्यास नकार दिला आहे.

शेतीत वापरल्या जाणार्‍या विविध रसायने आणि खतांच्यामुळे लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होते हे तपासणार्‍या आंतरराष्ट्रीय सक्षम संस्था आहेत. तसेच प्रत्येक देशात या संबंधात संशोधन आणि नियंत्रण करणार्‍या व्यवस्था आहेत. या पैकी एक वगळता बाकी सर्वांनी, ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होते, याला मान्यता दिली नाही. ग्लायफॉसेटचा परिणाम फक्त वनस्पतीवरच होतो. माणूस आणि प्राणीमात्रावर होत नाही. कारण वनस्पती आणि सुक्ष्मजीवातच आढळणार्‍या एन्झाइमवर त्याचा परिणाम होतो. ग्लायफॉसेटवर मागील 40 वर्षात 384 अभ्यास निबंध प्रसिद्ध झाले आहेत. नियमानुसार फक्त 26 अभ्यासांची आवश्यकता आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनच्या आयएआरसीने ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. डब्लूएचओच्या इतर तीन संस्थांनी ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर किंवा आरोग्याला धोका नाही, असा निर्वाळा दिला आहे. या तीन संस्था अशा आहेत. 1) इंटरनॅशनल प्रोेग्रॅम ऑन केमिकल सेफ्टी. 2) गाईडलाइन फॉर ड्रिंकिंग वाटर क्वॉलीटी. 3) कोअर असेसमेंट ग्रुप. थोडक्यात डब्लूएचओच्या चार पैकी तीन संस्थांना आयएआरसीचा निष्कर्ष मान्य नाही. या शिवाय अन्य संस्थांचे निष्कर्ष असे आहेत. जर्मन फेडरल इन्स्टिट्यूट फॉर रिस्क अ‍ॅसेसमेंट – माणसांना कॅन्सर होत असल्याचा कोणताही पुरावा नाही. (2015) यु.एस. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी – ग्लायफॉसेटने कॅन्सर होण्याचा धोका नाही. (2013) पेस्टीसाईड अँड व्हेटरनरी मेडिसीन अथॉरिटी – पुरावे ठोसपणे कॅन्सर होत नाही हे सिद्ध करतात. (2013) अर्जेंटीना इंटरडिसीप्लीनरी सायंटीफीक कौंसील – कॅन्सर आणि ग्लायफॉसेट याचा संबंध अभ्यासात दिसत नाही. (2009) कॅनेडीयन पेस्ट मॅनेजमेंट रेग्युलेटरी अथॉरिटी – ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होण्याची शक्यता नाही. (2015). जर्मन फेडरल इन्स्टिट्यूट फॉर रिस्क मॅनेजमेंट, युरोपीयन फुड सेफ्टी अथॉॅरिटी, जाइंट मिटींग ऑन पेस्टिसाइड यात सर्व सक्षम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था, वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन आणि फूड अँड अ‍ॅग्रीकल्चर ऑरगनायझेशन यांचा समावेश आहे. या सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांनी आयएआरसीचे निष्कर्ष अमान्य केला आहे.

1974 मध्ये ग्लायफॉसेट तणनाशकाचा वापर सुरू झाला. त्यानंतर ते जगातील सर्वात जास्त खपणारे लोेकप्रिय तणनाशक झाले. 2000 सालानंतर ग्लायफॉसेट प्रतिबंधक जीएम बियाणामुळे याचा वापर आणखी वाढला. यामुळे माती, जमीन, पाणी यांचे सर्वात कमी प्रदूषण होते. हे मातीच्या संपर्कात आलेनंतर निष्क्रीय होते. त्यामुळे याचे अंश पाण्यात पाझरत नाही. मानसांना विषारी नाही. बर्‍याच वेळा ग्लायफॉसेट पिऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न अनेक शेतकर्‍यांनी केले. पण ते सर्व वाचले. कारण हे सामान्य मिठापेक्षा कमी विषारी असल्याचा तज्ञांचा निष्कर्ष आहे.

ग्लायफॉसेट तणनाशक शेतकर्‍यांना का हवे आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. लव्हाळी, हराटी, कुंदा वगैरे चिवट तणांनी शेतकर्‍यांना नेहमीच हैराण केले आहे. मोकळ्या पडीक रानात, बांधावर, पाटात उगवणार्‍या तणांचे नियंत्रण खर्चीक त्रासदायक मजूरावर अवलंबून होते. पाटातून, बांधावरून हे तण पिकात जाते. ग्लायफॉसेटमुळे तणे मुळासकट नष्ट होतात. अत्यंत कमी खर्चात तण नियंत्रण होते. ओळीत जास्त अंतर असलेल्या पिकातसुद्धा ग्लायफॉसेटचा वापर करून तण नियंत्रण करता येते. रोजगार हमी योजना आणि रेशनवर मिळणारे स्वस्त धान्य यामुळे मजूर मिळणे मुश्कील झाले आहे. उद्योग व्यवसाय नसलेल्या वर्धा सारख्या जिल्ह्यात सुद्धा मजूर मिळत नाहीत.

खरीपात पेरणीनंतर एकाचवेळी तण व पीक उगवते. तेव्हा तर मजूर पूरत नाहीत. त्यामुळे तण वाढून पिकांचे खूप नुकसान होेते. जर ग्लायफॉसेटवर बंदी आले तर बर्‍याच शेतकर्‍यांना शेती बंद करावी लागेल. सध्याच्या शेतीतील ग्लायफॉसेटचा अपरिहार्यता लक्षात घेतली तर बंदी घालणे घातक ठरेल. 1974 पासून ग्लायफॉसेट वापरले जात आहे. मागील 45 वर्षात कोठेही ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर झालेचे उदाहरण नाही. जगातील सर्व प्रगत देशांनी बंदी घातलेली नाही. जगातील सर्व नियंत्रक (रेग्युलेटरी) संस्थांनी ग्लायफॉसेट सु रक्षीत असल्याचा निर्वाळा दिला आहे. तरीही भारतात आणि महाराष्ट्रात ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याची तत्परता का?

शेतकर्‍यांचे खूप नुकसान होईल, याची कल्पना असताना सुद्धा ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याची धडपड, मागील 2 वर्षात सुरू आहे. यामागे अनेक हितसंबध असू शकतात. 1) ग्लायफॉसेटला पर्यायी पेटंट असलेले नवे तणनाशक येण्याची शक्यता असावी. नव्या पेटंट असलेल्या महाग तणनाशकाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ग्लायफॉसेट बंदीचे प्रयत्न सुरू असावेत. 2) ग्लायफॉसेटला पर्यायी तणनाशक ग्लुफॉसिनेट उत्पादनाची व्यवस्था एक मोठ्या भारतीय उद्योगाने केली आहे. ग्लायफॉसेटच्या तुलनेने महाग, कमी प्रभावी असलेल्या ग्लूफॉसिनेटचा खप वाढवण्याचा हेतू असू शकतो. 3) जीएम बियाणाला विरोध करणार्‍या कीटकनाशक लॉॅबीचा हात सुद्धा यामागे असेल. कारण बीटी बियाणामुळे कपाशीत 80 टक्के कीटकनाशकाचा वापर कमी झाला. तणनाशक प्रतिबंधक जीएम बियाणामुळे अन्य तणनाशकांचा वापर कमी झाला. बंदीमुळे नव्हे तर तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कीटकनाशक आणि तणनाशक यांचा वापर कमी होत आहे. यासाठी तंत्रज्ञानात वापराचे स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे.

हितसंबंधी गटाचा अपप्रचाराला बळी पडून बंदी घालणे, शेती, शेतकरी, पर्यावरण आणि अन्नपुरवठा या दृष्टीने घातक आहे. देशात डाव्या, उजव्या, पर्यावरणवादी, पुराणमतवादी, तंत्रज्ञान विरोधी विचारांचा प्रभाव खूप मोठा आहे. या सर्वांना एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीला लक्ष्य करून झोडपणे खूप आवडते. म्हणून ग्लायफॉसेटवर बंदी, जीएम बियाणावरील बंदी या सारखे विषय ताबडतोब चर्चेचे वादाचे होतात. पण समग्र शेती व्यवस्थेचा विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येण्याचा धोेका आहे. म्हणून याला सर्व सुजान लोकांनी विरोध केला पाहिजे.

लेखक : अजित नरदे,
श्रद्धा संकुल, 6 वी गल्ली, जयसिंगपूर, जि.कोल्हापूर
मो.नं. ९८२२४५३३१०; Email : narde.ajit@gmail.com

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*