Blog | आठवडी बाजार आणि समाज जीवन

तिखट लाल मिरचीचा बाजार…

उस्मानाबादच्या आठवडी बाजाराच्या मागील बाजूस म्हणजे पूर्व दिशेस असणाऱ्या भागात वाळलेल्या लाल मिरच्यांचा बाजार भरतो. वाळवून खट्ट झालेल्या लाल मिरचीच्या अनेक शौकीन लोकांसाठी हा बाजार म्हणजे एक पर्वणी असते. दुकानात मिळणाऱ्या पॅकिंग वाल्या विविध ब्रँडच्या मिरची पावडर मध्ये तिखटपणा नसतो असे मानणारे लोक अशा बाजारात मिरच्या विकत घेण्यासाठी खास येतात.

आठवडी बाजारात येणारा समाज हा तळागाळातील समाज ,ज्यांना इतर कोणताही मसाला नसला तरी केवळ तिखट आणि तेल या बरोबर भाकरी ओली करत आनंदाने खातात. त्यांच्या आवडीचे तिखट देणारी मिर्ची केवळ अशा बाजारातच मिळते! म्हणून अशा चोखंदळ ग्राहकांची इथे गजबज असते. इथून मिर्च्या घेवून त्या कांडनालयात कांडून त्याची पुड दैनंदिन वापरासाठी बनविली जाते.

उस्मानाबादच्या आठवडी बाजारात मिरची विक्रेत्यांची ५० ते ७० च्या आसपास दुकाने आहेत. त्यातील मोठी अशी २० ते २५ व्यापा-यांची तर उर्वरित शेतकऱ्यांची आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात या संपूर्ण बाजारात मिर्चीचा विशिष्ट असा वास दरवळत असतो. त्यातच एखाद्या विक्रेत्याने मिर्च्याचे पोते दुकानातील चटई वर विक्रीसाठी ओतले की एकदम खाट उठतो आणि मग अशा अनेक शिंका देत ग्राहक फिरताना या बाजारात दिसतात. विशेषतः अशा शिंका आणणाऱ्या मिर्चीकडे लगेच मग सर्वांचे लक्ष जाते आणि ग्राहक शिंका आणणा-या मिर्च्याच्या दुकानाकडे धाव घेतो.

मिर्ची बाजारात फेरफटका मारताना अचानक असेच एक पोते ओतल्यामुळे खाट उठला आणि मला लहानपण आठवले ! लहानपण , मिर्ची आणि तिखट याचा याचा जवळचा संबंध आहे. त्यावेळी आपण तिखट खायला शिकलो म्हणजे आता मोठे झाले आहोत असे वाटे. कारण त्या पूर्वी तिखट आणि त्याचा खाट याचा संबंध केवळ आई किंवा आजी माझी दृष्ट काढत असे तेंव्हाच येत असे ! कानात मिर्च्यांचा विशिष्ट आवाज ऐकत आणि नाकात ठसका लावणारा खाट अनुभवत मी तानाजी हरिदास शिंदे यांच्या दुकानात पोचलो ! सोलापूर जिह्ल्यातील वैराग हे त्यांचे गाव ! पूर्वी ते जेसीबी चालवत असत , मात्र ते काम करून मणक्याचा त्रास सुरु झाला आणि गेल्या वर्षभरापासून त्यांनी जेसीबी सोडून थेट मिर्ची विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे आणि तो बर्यापैकी तेजीत आहे. तानाजी शिंदे म्हणाले, ‘लोक पाहिल्यासारखे तिखट खात नाहीत हल्ली आणि त्यात ठिकठिकाणी मॉल निघाल्यामुळे आणि पाकिंग मिरची पावडरवर सवलती दिल्यामुळे खुल्या मिरची बाजारावर परिणाम झाला आहे’, साधारणपणे रु. १२० ते १३० असा भाव असतो पण हल्ली रु. ८० ते १०० असा चालू आहे. हल्ली मिरचीच्या इतर अनेक तिखट जातींचे मिश्रण वापरले जात आहे आणि त्यात कृत्रिम रंगही वापरतात त्यामुळे कांही खास ग्राहक आमच्याकडे आवर्जून येतात”

उस्मानाबादच्या मिरची बाजारात येणारा संपूर्ण माल हा आंध्र आणि कर्नाटक या राज्यातून आलेला आहे.कारण महाराष्ट्रात सध्या मिरचीचे उत्पन्न कोणीही शेतकरी जास्त प्रमाणात घेताना दिसत नाही.घेतलेल्या पिकापैकी बहुतांश मिरची हिरवी असतानाच भाजी म्हणून विकली जाते.त्यापैकी अगदी कमी प्रमाणात मिरची वाळवून विकली जाते. त्यामुळे महाराष्टात महाराष्ट्रीय मिरची केवळ साहित्यात, कवितात आढळते असे म्हणावे लागेल. मराठी ,हिंदी वा इतर भाषात मिर्ची लागणे, मिर्च्या झोंबणे, अशा अनेक म्हणी असू मिर्चीने जेवणाबरोबर भाषाही समृद्ध केली आहे हे विशेष !

सुलोचना चव्हाण यांनी गाईलेली “ नाव गाव कशाला पुसता, आहे मी कोल्हापूरची ! मला हो म्हणतात लवंगी मिरची” या लावणीत खट्याळ प्रेयसी स्वतःला लवंगी मिरची आणि तीही कोल्हापूरची अशी म्हणवून घेते. म्हणून माझ्या नादाला लागू नको असे प्रियकराला बजावताना दिसते. कडक स्वभावाच्या मुलीस मिर्ची म्हटले जाते ते या अर्थानेच !

मिरची ही तिखटआणि लवंगही तिखट मग या दोन्हीचे मिश्रण असणारी लवंगी मिरची म्हणजे अतिशय तिखट असते, तिलाच कांहीजण गावरान मिरची म्हणतात. ही मिरची आकाराने लहान आणि ओली असताना गडद हिरवी दिसते.

तिखट ही चव नसून ती एक संवेदना आहे. आपल्या जिभेवर गोड, खारट, तुरट, आंबट आणि कडू अशी पाच चवकेंद्रे आहेत, त्यात तिखट नाही ! कारण गोड, खारट, तुरट, आंबट आणि कडू या पैकी कोणतेही खाद्यवस्तू अंगाला चोळली तर दाह होत नाही मात्र तिखटाचे तसे नव्हे ,म्हणून तीला संवेदना म्हणतात ! जगात तिखटाच्या संवेदनेवर संशोधन होवून त्यास एक व्यसन मानले असून , मानसशास्त्रीय संशोधनानुसार तिखट म्हणजे रोलर कोस्टर मध्ये ज्याप्रमाणे भीती आणि त्रास यातून एक आनंद मिळवला जातो, तसेच मिरचीच्या लोकप्रियतेचे रहस्य यात दडले आहे.

तिखट खाण्याची क्षमता असणे आणि कणखर वा शौर्यवान वा धाडसी असणे याचा एक अजब संबंध भारतीय समजात आढळून येतो. व्यवहारात तिखट न खाणारा म्हणजे मवाळ असे म्हणतात. पण यास वास्तवात कांहीच अर्थ नाही. आश्चर्याची बाब अशी की, मुळ मेक्सिको या देशाची रहिवाशी असणारी ही मिर्ची कोलंबसने लँटीन अमेरीकेतून युरोपात नेली आणि युरोपातून ती पोर्तूगीज लोकांमार्फत भारतात आली ! म्हणजे मिरची ही तशी विदेशी किंवा यवनी म्हणावी लागेल. अशी ही परकीय, विदेशी अभारतीय मिरची आपली प्रत्यकाच्या स्वंयपाक घरात अशी जावून बसली आहे की तिला काढणे प्रचंड मुश्कील नव्हेतर नामुक्कीन आहे. हल्ली सरकारे अनेक बाबींवर बंदी आणत आहेत, उद्या परकीय म्हणून कोणी मिर्चीला स्वंयपाक घरातून तडीपार करा म्हटले तर अनेकांच्या नाकाला तीच मिर्ची झोंबेल हे मात्र नक्की !

लाल मिरचीचे शास्त्रीय नाव, कॅप्सिकम अॅनस असे असून जगात, तिखट असणा-या सर्व फळांना पेपर असे म्हणतात. जसे मिरीला ब्लॅक पेपर तसे मिर्चीला चिली पेपर किंवा रेड चिली असे नाव आहे. पेरू या देशात मिरची हे मुख्य पिक असून जगात मिरचीचे दरवर्षी अंदाजे ३५ मिलियन टन एवढे उत्पन्न होते. त्यापैकी निम्मे उत्पन्न एकट्या चीनमध्ये होते. त्यानंतर मेक्सिको, अमेरिका,पेरू, बोलोव्हीया यांचा क्रमांक आहे. जगात मिर्ची ही प्रामुख्याने हिरवी मिरची म्हणजे भाजी या स्वरुपात विकली वा खाल्ली जाते. तिचा वाळवून पावडर करून उपयोगात आणले जाण्याचे प्रमाण मुळ उत्पन्नाच्या १/९ एवढेच आहे. मात्र या १/९ पैकी ३६ % व्यापार आपल्या भारतात आहे. म्हणजे भारत हा असा देश आहे कि जो मिरची वळवून त्याची पावडर करून सेवन करतो !

मिर्ची मसाल्याचे पदार्थ म्हणून त्याच बरोबर कांही मलम कांही औषधी द्रावण तयार करण्यासाठी वापरली जाते. पण प्रत्येक मिरचीचा वापर तिच्या तिखटपणावर आधारित आहे. लवंगी मिरची वाल्या लावणीत ‘तिखटपणावर भाळणे’ असे एक कडवे आहे ! यातील भावविश्व केवळ मराठी भाषेची आणि संस्कृतीची जाण असणाऱ्या व्यक्तीलाच होवू शकते. अन्यथा ही लावणी म्हणजे निव्वळ मिरची या पिकाचे वर्णन होईल. तिखटपणा हेच मिरचीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, जो मिर्चीत Capsaicin या द्रव्यामुळे येतो.

जागतिक पातळीवर मिरचीच्या तिखटपणाची वर्गवारी ठरवली असून , सहा पैकी सहा किंवा पाच किंवा चार असा ग्रेड ठरवतात. अगदी कांही कमी तिखट जातींना स्वीट पेपर, बेल पेपर असे म्हणतात. आपण ज्यास सिमला मिरची म्हणतो, तीस स्वीट पेपर म्हटले जाते. कांही जाती अतितिखट असतात आणि गिनीज बुक मध्ये अतितिखट म्हणून एखाद्या मिर्चीस गौरविले जाते. कांही वर्षापूर्वी भारताच्या पुर्वोतर भागात घेतल्या जाणा-या नागा मिरची या प्रजातीस या सन्मान मिळाला होता !

भारतात राजस्थान,आंध्रातील गुंटूर, मध्य प्रदेशातील जबलपूर येथील मिरची सोबत ब्याडगी मिरची देखील वापरली जाते, जी भडक लाल रंगाची असते! उस्मानाबादच्या बाजारात गावरान, तेजा गावरान आणि गुंटूर या तीन प्रकारच्या मिरच्यांची विक्री होते अशी माहिती कसबे तडवला येथील महेबूब महमद तांबोळी यांनी दिली.

महेबुब तांबोळी गेल्या ३० वर्षापासून लाल मिचीच्या व्यापारात आहेत. ते सांगतात की, पूर्वी आपल्या भागातील शेतकरी सुद्धा हे पिक घेत असत आता मात्र पूर्ण माल, अांध्रातून कर्नुल आणि गुंटूर येथून सोलापूरला येतो आणि तिथून आम्ही आणून येथे विकतो. मेहेबुब म्हणतात “आम्हाला गिर्हाईक पाहिलं की ते घेणारं हायकी निस्तं इचारणारं लगीचं कळतं! साहेब, मिरची निसती हलवली की घुंगराच्याआवाजासारखा आवाज येतो , त्यावरूनच मिरचीचीबी क्वालिटी कळते आणि घेणाराचीबी क्वालिटी कळते!” खरंच , वाळलेल्या मिर्चीचे सुश्राव्य संगीत कानात वेगळेच भावविश्व तयार करते आणि तीच्या खेचते !

मेहबुब यांच्या समोरच पांगरीच्या सत्तर इब्राहीम बागवान यांचेही मिरची विक्रीचे दुकान आहे ! बागवान यांनी सांगितले की, मिरची बाजाराच्या स्वच्छतेकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. “सायब, आजूबाजूला घाण असेल तर लोक मिरची घ्याला कशाला येतील!” याबद्दल तुम्ही सरकारला सांगा असा त्यांनी आग्रह धरला , मी त्यांना तसे आश्वासन दिले !

उस्मानाबादच्या या आठवडी बाजारात असणाऱ्या ५० ते ७० मिरची दुकानात महिन्याभरात चार ते पाच लाखाचा मिरची विक्रीचा व्यापार होतो, ज्यात विक्रेत्यास ३ ते ५ % एवढ्या प्रमाणात नफा मिळतो ! एकंदर पाहता, मिरचीच्या बाजारात तिच्या तिखट पानाप्रमाणेच सतत तेजी असते ,असे म्हणावे लागते ! मिर्ची तिखट असते पण तीच्या तिखटपणातही एक गोडवा लपलेला आहे.गोडवा हा शब्द आपुलकी या अर्थाने वापरला आहे पण विदेशातून भारतात येवून भारतातील विविध भाषा, पंथ, धर्म नि प्रांत यांच्या मनात घर करणारी मिर्ची समस्त भारतीयांच्या जीभेचे चोचले गेल्या चारशे वर्षापासून पुरवित आहे.

भारतात अनेक लोक आले. ते भारताचे झाले, भारतानेही त्यांना आपलेसे केले आणि ते भारतीय संस्कृतीचा भाग बनून गेले. मिर्चीही अगदी तशीच आहे.

© राज कुलकर्णी .

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*