पीककर्जासाठी बँकांना मेळावे घेण्याचे निर्देश

मुंबई :
राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा वेळेत व्हावा यासाठी बँकांनी गाव पातळीवर मेळावे घेऊन पीक कर्जासंदर्भात जनजागृती करावी, असे निर्देश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. आज मंत्रालयात सर्व बँकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीक कर्जाबाबत आढावा घेण्यात आला.

या बैठकीला कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला उपस्थित होत्या.
श्री.देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक कर्ज पुरवठा झाला पाहिजे, पण त्याचे प्रमाण कमी आहे हे प्रमाण एक आठवड्यात वाढविण्यासाठी सर्व बँक प्रतिनिधींनी गाव पातळीवर मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जपुरवठा संदर्भात उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या.

डॉ.बोंडे म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रत्येक गावात मेळावे घ्यावेत आणि मेळाव्याच्या तारखा जाहीर कराव्यात. त्यामुळे शेतकऱ्यांना हे मेळावे आपल्या भागात कधी आहेत याची माहिती होईल शेतकऱ्यांना या मेळाव्याला उपस्थित राहून आपल्या समस्या बँकांच्या संबंधित अधिकाऱ्यांपुढे मांडता येतील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*