Blog | गावरान कोंबड्या आणि चिकन

आठवडी बाजार आणि समाज जीवन

गावरान या शब्दांत कांहीतरी जादू आहे हे नक्की ! गावरान भाजी , गावरान आंबे, गावरान मसाला या धर्तीवर गावरान कोंबडं वा गावरान कोंबडी! गावरान नसलेल्या ब्रायलर कोंबड्यांना सरकारी कोंबडी म्हटले जाते ज्यांचे मांस भरपूर विकले जात असले तरीही गावरान कोंबडीला जे वलय, जी लोकप्रियता आहे ,तीची सर कशालाही येणार नाही !

उस्मानाबादच्या आठवडी बाजारात प्रवेश केल्यावर, मुख्य चौकाच्या उजव्या बाजूस गावरान कोंबड्यांचा बाजार भरलेला असतो.गावरान कोंबड्या बरोबर त्यांची अंडी देखील इथं विकली जातात.गावरान कोंबडी जशी टेस्टी अंडीही टेस्टी ! म्हणून रविवारच्या आठवडी बाजारात गावरान अंडीही भरपूर विकली जातात.

गावरान कोंबड्या इथे पायास एकीला एक दोरीने बांधलेल्या असतात. कोंबड्यांच्या ‘पकपकाटाने’ कान किट्ट होवून जातात. त्यामुळे खरेदीदार नसलेल्या माझ्यासारख्या बाजारहाट करणा-या व्यक्तीचेही लक्ष वेधून घेण्याची क्षमता बाजाराच्या या भागात आहे. तीथे खरेदीदारांची भाव ‘कमी’ करण्याची हुज्जत, घासाघीस आणि कोंबड्यांचे केकाटणे असा सप्तसुरी गोंधळ एकाच वेळी चालू असतो. त्यामुळे दुर्लक्ष करूनही इकडे लक्ष जातेच!

उस्मानाबादच्या बाजारात गावरान कोंबडी विकणा-या जावेद शेख, शांताबाई आणि इतर विक्रेत्यांशी बातचित केल्यावर समजले की, साधारणपणे एक कोंबडी रू.१७५ ते २००/- तर कोंबडा रू.३०० ते ३५० /- असा त्यांचा भाव असतो ! परंतु हंगामानुसार व इतर मांसाहारी पदार्थाची आवक या नुसार यांचे भाव कमी जास्त होत असतात!

सामान्यपणे मांसाहारीं कडून मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाणारे मांस हे कोंबड्यांचेचअसते. कोंबडीच्या मांसास इंग्रजीत चिकन हे नाव असल्यामुळे तेच नांव भारतात सर्वांच्या ओठी आहे. चिकनला भरपुर मागणी असण्याची अनेक कारणे आहेत, एकतर ते स्वस्त असते, तत्काळ कोंबडी कापून ते अगदी ताजे मिळू शकते, ते लवकर शिजते आणि सर्वत्र मिळते. बदक, तितर या पक्षी जातीय इतर मांसापेक्षा अनेकांची पसंती ही कोंबडीलाच असते!

कोंबडी हे मासांहार करणाऱ्या सर्व लोकांत आदरातिथ्याचे आणि चांगल्या पाहुणचाराचे प्रतिक समजले जाते. एखादा लाडका पाहुणा आला आणि तो मांसाहारी असला की यजमानाकडून आवर्जून ‘गावरान कोंबडे’ केले जाते. खूप वर्षापुर्वी आनंद शिंदे यांच्या लोकगीताच्या एका कॅसेटमध्ये ‘ लई बाई लाडाचा पाहुणा खायला मागतोय कोंबडे’ असे एक गाणे ऐकले होते. त्याचा अर्थ लाडाच्या पाहुण्याचे स्वागत कोंबडे जेवायला देऊन करावे, असा आहे. त्यानंतर परवा आणखी एक गाणे माझा पुतण्या अस्मितच्या तोंडी ऐकायला मिळाले -‘गावरान कोंबड कसं टेस्टीच लागतंय’! आमच्या घरी हे सर्व निषिद्ध आहे पण त्याच्या गाण्याचे मात्र कौतुक वाटले! एकंदर पाहता या गावरान कोंबड्याच्या कौतुकावर अनेक विविध प्रकारची गीते अनेक भाषांत आहेत. चिकनच्या अनेक डिशनुसार त्यावर अनेक गाणी रचली गेली आहेत. दुरदर्शनवरील ‘सण्डे हो या मण्डे रोज खावो अंडे’ या जाहीरातीपासून ‘ अंडे का फंडा ‘ या गाण्यांमुळे अंड्याचे महत्व सर्वश्रुत आहे. अनेक हिंदी चित्रपटात प्रामुख्याने ‘आयटम सॉंग’ म्हणून दाखवली जाणारी गाणी कोंबडी वा चिकन विषयी आहेत. यावरूनही चिकन आणि कोंबडी या शब्दांना ‘मादक तरूणी’ असा भावार्थ चिकटला आहे. ‘तंदुरी ..चिकन ‘ हे एक असेच एक द्वैअर्थी गाणे मध्यंतरी अगदी हिट्ट झाले होते !

भारतात विविध प्रांतात कोंबडीपासून म्हणजे चिकन पासून बनवलेल्या विविध डिश आहेत. आपल्याकडे भाजी प्रमाणे कोंबडीचे चिकन शिजवून आणि तळून खाल्ले जाते!पंजाब मध्ये चिकन तंदूर हा प्रकार जास्त आढळतो. बंगाली आणि केरळी लोकांचे प्रेम माशांवर अधिक असले तरी कोंबडीचे विविध प्रकार तिथेही आढळतात अगदी पुर्वौत्तर राज्ये देखील कोंबड्यांची शौकीन आहेत.राजस्थान मध्ये ‘चिकन रोस्ट’ खूप आवडीने खाल्ले जाते. गुजरात प्रांतात शाकाहाराचा प्रभाव जास्त असल्यामुळे मांसाहार तिथे जास्त केला जात नाही. मात्र आश्चर्याची बाब अशी की याच गुजरातमध्ये अहमदाबाद जवळ ,बहुचरा देवीचे मंदिर असून या देवीस शेरवली माता प्रमाणे मुर्गेवली माता म्हणून ओळखले जाते.

बहुचरा माता ही शाक्त पंथीय देवता असून तिचे वाहन कोंबडा आहे. कारण कोंबडा हा निष्पाप तेचे प्रतिक आहे. या देवतेस चार हात असून उजव्या वाजुच्या वरील हातात हातात तलवार ,डाव्या बाजूच्या वरील हातात पवित्र ग्रंथ आहे. पवित्र ग्रंथाचे व कोंबडा वा कोंबडीचे नाते दैवतांनी मान्य करून, कोंबड्यावर विराजमान होऊन हातात दिव्य ग्रंथ घेतले आहेत हे विशेष! या देवतेचा उजव्या बाजूचा खालील हात ,हा अभय हस्त म्हणजे आशीर्वाद देणारा असून ,खालील बाजूस असणा-या डाव्या हातात त्रिशूल आहे. दोन्ही डाव्यापैकी एका हातात ग्रंथ आणि एका हातात शस्त्र असणे हे खूप सुचक आहे.

योगशास्त्रातील तांत्रिक उपासनेत शरीरातील सातव्या चक्राकडे घेवून जाणा-या या देवतेस कुंडलिनी जागृत करण्याची प्रमुख देवता म्हणून मानले जाते. कुंडलिनी जागृत झाल्यावरच मोक्षप्राप्ती होते, असे योगशास्त्र सांगते. सुर्योदयाचे प्रतिक म्हणून कोंबडा हा पक्षी महत्वपूर्ण मानला जातो , कोंबड्याने बांग दिल्यावर सूर्योदय झाल्याची जाणीव होत असल्याने ,कुंडलिनी जागृत होण्याची म्हणजेच योगातील एक प्रकारच्या सूर्याची जागृती असते आणि ती कोंबडा हे वाहन असणार्या देवतेच्या रूपातून प्रकट होते.

गुजरात मधील मेहसाना पासून पश्चिमेला ३५ किलोमीटर अंतरावर असणारे मुर्गेवाली मातेचे हे मंदिर सन १७८३ साली बांधले असल्याचे मानले जाते. या देवतेची दंतकथा अशी सांगितली जाते की, बहुचरा ही कुमारीका तरूणी आणि तिच्या सात बहिणी प्रवासाला गेल्या असताना त्यांच्यावर दरोडेखोरांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिने स्वतःचे आणि बहिणींचे स्तन कापून देहत्याग केला. यावेळी त्यांनी त्या दरोडेखोरांना शाप दिला की, तुझ्यामुळे आमच्या स्त्रीत्वाची ओळख असणारे स्तन आम्हास कापून देहत्याग करावा लागला. म्हणून तुझे पुरुषत्व नष्ट होईल. यावर म्हणून तिने दरवर्षी त्यास स्त्रियांच्या वेशात यात्रा करावी, तरच तुझे पुरुषत्व टिकेल असा उशाप दिला आणि त्यानंतर ती देवता बनली. आणखी एका दंतकथेनुसार बहुचरेने एकदा तिच्या पतीच्या त्रासास कंटाळून त्यास नपुंसक होण्याचा शाप दिला. तेंव्हापासून ही देवता नपुंसक लोकांची अाश्रयदात्री समजली जाते. त्यामुळेच तिच्या भक्तामध्ये किन्नरांची संख्या प्रचंड आहे. नव्हेतर किन्नरांकरवीच देवतेची पूजा करावी असा संकेत आहे.

बहुचरा माता मुर्गेवली माता म्हणून ओळखली जात असली तरी गावो गावी आढळणाऱ्या शाक्त आणि तंत्र उपासनेतील दैवतांसाठी मात्र कोंबडी हाच स्वस्त आणि सर्वांना आवडणारा असा नैवेद्य आहे.ज्या प्रमाणे नारळ फोडल्याविना खाता येत नाही त्याप्रमाणे कोंबडीही कापल्याविना खाता येत नाही. मग केवळ खाण्यासाठी कापण्यापेक्षा कोण्या तरी देवी समोर कापावी या चवनेबाज व्यावहारिक विचारातून मांसाहार जसा वाढला त्या प्रमाणात या अशा देवस्थानांना देखील उर्जित काळ आला. वेताळ, झोटिंग, मेसाई ,केसाई,जोखाई, मरीआई अशा अनेक दैवतांचे मुख्य अन्न म्हणजे कोंबडीच ! महागडे बकरे कापणे परवडत नाही अशी मंडळी आपआपल्या भक्तीची कुवत बघून आपआपला देव निवडतात. तिरुपती, साईबाबा अशा श्रीमंत देवांपेक्षा त्यांचा ओढा अशा लहान देवतांवर असतो आणि मग यातूनच जाणते, जोगते, भगत, सगुण बघणा-या, बाहेरवासा काढणा-या आदी लोकांसाठी प्रथिनांचा आहार यातूनच उपलब्ध होतो.

आज भारतात चिकनचे पदार्थ म्हटले तर अगदी हजारो पदार्थ असतील. त्यात पूर्ण कोंबडा किंवा कोंबडीचा बनवला जाणारा ‘दम का मुर्ग’, तंदूर, चिकन बिर्यांनी या शिवाय लहान पीसच्या स्वरुपात शिजवून चिकन मसाला, चिकन कबाब, चिकन ६५, चिकन चिल्ली, मटका चिकन, चिकन ड्राय, चिकन फ्राय, चिकन कंटकी, चिकन लसनी, चिकन अद्रकी, तसेच गावाच्या व प्रांताच्या नावावरून चिकन कोल्हापुरी, चिकन हैद्राबादी पासून ते चक्क चिकन लाहोरी या पाकीस्तानी शहराच्या नावाचेही चिकन आढळते. अर्थात या सर्व डिश या ब्रायलर चिकनच्याच आढळतात!

चिकन मग ते गावरान असो की ब्रायलर सर्वसामान्य लोकांना प्रथिनाचा पुरवठा करणारे ते प्रमुख अन्न आहे, शिवाय त्यात अनेक जीवनसत्वे,पोषक मुल्यद्रव्ये आणि मुबलक स्निग्ध पदार्थ असतात.गावरान कोंबडे आणि मटण यांच्यातील स्निग्धतेचे प्रमाण जवळपास एकसारखेच असल्यामुळे ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ब्रायलर चिकन हा कमी स्निग्धतेचा आणि प्रथिनांचा योग्य आहार आहे. चिकन सूप हे त्यात अत्यंत पोषक समजले जाते!

चिकनच्या देशी पदार्थांसोबत हल्ली गावोगावी पसरलेल्या चायनीज हॉटेलांमुळे आणि गाड्यांमुळे चिकनचे ‘च्यँव-म्यँव’, ‘हाका-नाका-फाका’, ‘ड्रँगन-सेजवान’ अशा न्युडल्स मिश्रीत चित्र विचित्र नावाचे आणि रूपाचे अनेक चिकनचे पदार्थ प्रचलित झाले आहेत! चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या घोषणा केल्या जाणा-या ‘अच्छे दिन’वाल्या भारतात आता ‘चीनी बँका’ प्रवेशकर्त्या होत असल्यातरी भारतीयांच्या जिभेवर मात्र चायनीज पदार्थांनी अधिराज्य गाजवायला खूप पूर्वीपासून सुरूवात केली आहे, हे एक असेच चित्रविचित्र वास्तव आहे!

आठवडी बाजारातील गावरान कोंबड्या या प्रामुख्याने शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी पाळलेल्या असतात आणि त्या मुक्तपणे चरणाऱ्या असल्यामुळे त्याची चांगली लागते, असे जाणकार सांगतात. ज्या प्रमाणे एखाद्या मुख्य व्यापारी पिकांसोबत कांही शेतकरी भाजीपाला आणि दुधाचा व्यवसाय करतात अगदी त्याप्रमाणे अनेक शेतकरी, शेतमजूर कोंबडीपालन करतात. त्यांच्या आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या गावरान अंड्यांच्या विक्रीतून त्यांना दैनंदिन खर्चाचे पैसे उपलब्ध होतात.

कडकनाथ नावाची कोंबड्यांची एक रानटी जात सध्या खूप प्रसिद्ध असून आठवडी बाजारात ती क्वचितच विक्रीला आणली जाते. पण या कडकनाथाचे शौकीन अल्पवाधितच प्रचंड वाढले असल्याची माहिती मिळाली.

बर्ड फ्लू वगैरेंच्या साथी आल्यावर हा कोंबड्याचा व्यवसाय तोट्यात जातो पण यात वास्तव कमी आणि अफवाच जास्त असतात. त्यातून रोगप्रतिकारक शक्ती असणा-या गावरान कोंबड्यांच्या पोल्ट्रीचा व्यवसाय कांहीनी सुरू केला होता मात्र त्यांच्या संख्यावाढीचा आणि शारीरिक वाढीचा दर अतिशय संथ असतो त्यामुळे गावरान कोंबड्यांच्या पोल्ट्रीच्या भानगडीत कोणी सहसा पडत नाही. त्यापेक्षा अशा ‘हौसे’ने वाढवलेल्या कोंबड्याच बाजारात जास्त आणल्या जातात. त्या जशा ‘हौसे’ने वाढवल्या जातात तशाच मोठ्या ‘हौसे’ने खरेदी केल्या जातात आणि ‘हौसे’ने बनवून खाल्ल्या जातात! शेवटी हौसेला चीभेच्या चोचल्याची साथ लाभल्यावर, हौसेला मोल नसते याचाच प्रत्यय येतो!

बिफबंदीमुळे गोवंश वाचला परंतु कुक्कुटवंशावर लोकांची चव शमन करण्याचा भार पडल्यामुळे या व्यापाराला तेजी आली होती पण बहुचर्चित नोटबंदीत मात्र हा गावरान कोंबड्याचा बाजार पुर्णत: बसला होता अशी माहीती या विक्रेत्यांनी दिली.मोठ्या मोठ्या बहुराष्ट्रीय व देशी कंपन्या चिकनच्या बाजारात आल्यामुळे चिकन विक्री करणारा सर्वसामान्य विक्रेता अडचणीत असल्याची माहीती इथल्या आसिफ कुरेशी या चिकन मार्ट चालविणाराने दिली.पण एका गोष्टीचं अजब वाटलं की, पतंजली या नावाने हल्ली प्रचंड मोठा व्यापार उभा करणा-या एका योगगुरूंनी कुंडलिनी जागृत करणाऱ्या बहुचरा देवतेस स्मरण करून कोंबडा या तीच्या वाहनास खरेतर पावित्र्य आणि मांगल्य प्रदान करायला हवे होते,पण तसे करताना ते आजीबात आढळून येत नाहीत!

एकंदर पाहता सरकार कोणाचेही येवो आणि कोणासाठी कितीही ‘अच्छे दिन’ येवोत किंवा वार शुक्रवार असो रविवार ,कोंबड्यांसाठी तो घातवारच असतो. तरीही एक बरे आहे की, बहुचरा मातेच्या भक्तांनी ‘मुर्गामाता’ म्हणून कोंबड्यांच्या हत्याबंदीची मागणी आमच्या भावना दुखावतात म्हणून केलेली नाही; नाहीतर अख्या देशात ‘पक पक पकाक’ चा गोंधळ उडाला असता!

कांहीही असो, पण काश्मीरसे लेकर कन्याकुमारी तक आणि बंबईसे आसाम तक कोंबडी, कोंबडा आणि चिकन सर्वव्यापी आहे हे शाकाहारी लोकांनीही वास्तव म्हणून मान्य करायला हवं!

© राज कुलकर्णी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*