तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन

कपाशीच्या बीजी ३ तंत्रज्ञानाला सरकारने खोडा घातला आहे. तर, बीटी वांग्याचे प्रकरण स्वदेशीच्या आंदोलनामुळे अजूनही प्रसवकळा घेत आहे. महाराष्ट्रासह देशभरात शेतकरी या नवीन तंत्रज्ञानापासून वंचित आहे. त्याचवेळी गुजरात राज्यात हे तंत्रज्ञान खुले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य देण्यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन आक्रमकपणे पुढे नेण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल संघटनेच्या अध्यक्षांचे खुले पत्र…

कार्यकर्ते भावांनो,
नमस्कार…
काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे, काही सुचना आहेत व काही बाबींवर आपली मते अपेक्षीत आहेत यासाठी ही पोष्ट टाकीत आहे.
१. तंत्रज्ञान स्वातंत्र्य लढ्यातील पुढील टप्पा
HTBT कपाशीची जाहीर लागवड करुन किसान सत्याग्रहाकडे देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधण्यात आपण यशस्वी झालो आहोत. पण लागवड होताना, तणनाशक फवारताना सेल्फी टाकण्यात आपण कमी पडलो. आंदोलन अजुनही संघटनेच्या कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित राहिले आहे. हे आपण कबुल केले पाहिजे. प्रतिबंधित बियाणे पेरणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल न करण्याचा निर्णय जाहीर करुन शासनाने चालाखीने आपले आंदोलन दुर्लक्षित केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाची तिव्रता वाढविण्यासाठी काही पाउले उचलावी लागणार आहेत. प्रसार माध्यमांमध्ये पुन्हा आंदोलनाला स्थान मिळविण्यासाठी व त्याद्वारे शासनावर दबाव निर्म‍ण करण्यासाठी आता शेतात GM / HTBT तंत्रज्ञानाच्या समर्थनाचे बोर्ड, झेंडे लावणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांशिवाय गावातील इतर शेतकर्यांनी धाडसाने बोर्ड लावण्याची तयारी दाखवली तरच आपले आंदोलन यशस्वी होऊ शकते, त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत. (बोर्ड व झेंड्याचा नमुना सोबत जोडला आहे.)

२. संपुर्ण कर्जमुक्ती आंदोलन
गेल्या पाच सात वर्षात कोणत्याच शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन थकित झाला होताच पण शासनाने वेळोवेळी कर्जमाफीचे गाजर दाखवल्यामुळे नियमीत कर्जफेड करणार्या शेतकर्यांनीही कर्जफेड करणे बंद केले आहे. आता थकबाकीदार शेतकर्यांची संख्या प्रचंड आहे.
२००१ साली शरद जोशींनी सांगितलेली उणे ७२% सबसिडी व २०१८ साली OECD ने सांगितलेली उणे १४%सबसिडीद्वारे झालेली ४५ लाख कोटी रुपयांची लूट या आधारावर पुढील कर्जमुक्तीचा लढा आपल्याला उभारायचा आहे. उच्चन्यायालयात याचिका दाखल करण्या बरोबरच जप्त्या लिलाव उधळने आणि रस्त्यावरची लढाई सुद्धा सुरु ठेवावी लागणार आहे. आंदोलन पुढे नेण्यासाठी नविन कल्पना व मार्ग सुचवावेत.

वरील विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी ऑगष्ट महिण्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य कार्यकारिणी घेण्याचा विचार आहे. तारीख व ठिकाण कळविण्यात येइल. तोपर्यंत तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलन पुढे नेण्यासाठी कपाशीच्या शेतात सेल्फी, तणनाशक फवारताना व्हिडिअो व शेतात बोर्ड व झेंडे लावण्याची मोहीम जोरात सुरु ठेवावी. कर्जमुक्ती आंदोलनाबाबत काही कल्पना सुचत असतील त्याबाबत पोष्ट टाकाव्यात. याचिकेसाठी काही पुरावे उपलब्ध होत असतील तर ते द्यावे. निवडणुक लढवू इच्छिणार्यांनी आता तरी सक्रीय होउन गावागावात संघटना बांधणी सुरु करावी.

पत्रलेखक : अनिल घनवट, अध्यक्ष , शेतकरी संघटना

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*