इस्राईलचा संघर्ष | वाळवंट ते स्वर्ग

इस्राईल हा देश नव्हे! तो एक भौगोलिक क्षेत्र असलेली कंपनी आहे किंवा त्याहीपेक्षा अधिक एक यशस्वी स्टार्टअप आहे ज्याची सुरुवात १९४८ मध्ये नेगेव्ह च्या वाळवंटात झाली! अहमदनगर जिल्ह्याच्या फक्त दीडपट मोठ्या असणार्‍या इस्रायलचा इतिहास खूप रक्तरंजित आहे. जवळपास साठ टक्के वाळवंट असलेला हा देश वाळवंटाला स्वर्गामध्ये बदलत आहे. वार्षिक एक लाख तीस हजार मेट्रिक टन इतके उत्पादन शेतीतून काढत आहे. याशिवाय तेल अविव हे शहर जागतिक स्टार्टअपचे हब म्हणून ओळखले जात आहे. जगातील कोणत्याही विकसित देशापेक्षा जास्त, देशाच्या जिडीपीचा ४.२ टक्के हिस्सा इस्राईल रिसर्च आणि डेव्हलपमेंट वर खर्च करतो. तब्बल बारा नोबेल पुरस्कार विजेते या छोट्याशा देशातून येतात. जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण केंद्र इथेच आहे. सायबर सिक्युरिटी देणारी सर्वात मोठी कंपनी इस्राईलमध्येच आहे. इस्राईलची सध्याची प्रगती लक्षात येण्यासाठी त्याचा इतिहास समजणे खूप महत्त्वाचे आहे.

इस्राएलचे लोक किंवा ज्यूंचा धर्म हा अब्राहमिक धर्मांमध्ये सर्वात प्राचीन असा धर्म आहे. अब्राहमच्या मुलांपैकी ‘इसहाक’ याचे ते वंशज आहेत. अब्राहमचा दुसरा मुलगा ईस्माईल हा अरबांचा पूर्वज. इसहाकच्या वंशामध्ये याकूब हा एक महत्त्वाचा प्रेषित होता ज्याचे नाव ‘इस्राईल’ म्हणजे हिब्रू भाषेनुसार ईश्वराचा प्रिय असाही बायबलमध्ये उल्लेख आहे. याकूबच्या भावंडांनी त्याला इजिप्तच्या व्यापाऱ्यांना विकले आणि याप्रकारे तो इजिप्तमध्ये पोहोचला. त्याच्या गुणांमुळे तो फॅरोच्या निकटवर्ती लोकांपैकी झाला आणि त्याच्याकडेच नोकरी करू लागला. तिकडे दुष्काळ पडल्यामुळे त्याचे भाऊ इजिप्तमध्ये आले आणि तेथेच त्याच्या सोबत राहू लागले. हा परिवार इजिप्तमध्ये स्थायिक झाला आणि हळूहळू त्यांची संख्या वाढू लागली. हा सर्व गुलामांचा वर्ग असल्याने फॅरोने त्यांचा भयंकर छळ केला. या सर्व छळातून त्यांची सुटका केली ती मुसा ह्या प्रेषिताने. तो त्यांना इजिप्त मधून परत इस्राईलमध्ये घेऊन आला आणि हे लोक मोठ्या संख्येने सिनाई पर्वत आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांत स्थायिक झाले. यानंतर खूपदा रोमन आणि अरब सत्ताधीशांनी त्यांच्यावर आक्रमणे केली. या आक्रमणांना कंटाळून बऱ्याच लोकांनी देश सोडला. ते जगभर पसरले आणि निर्वासित असल्यामुळे छोटा मोठा व्यापार करून हे लोक स्थिर झाले. जवळच्या युरोप खंडात ते मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले.

ज्या भागात नेहमी दुष्काळ पडतो किंवा जे लोक निर्वासित असतात ते भविष्याची चिंता असल्याने आपल्याकडील अन्नधान्य, पैसा तसेच जीवनावश्यक वस्तू यांची बचत आणि साठवणूक करतात. अनिश्चित भविष्यकाळामुळे या लोकांना साठवणूक करायची सवयच लागली. बायबलच्या ओल्ड टेस्टामेंट नुसार ज्यू लोक ज्यू नसलेल्या लोकांना व्याजावर पैसे देऊ शकत होते, परंतु न्यू टेस्टामेन्ट नुसार ख्रिश्चनांना कोणाकडूनही व्याज घेण्यावर बंदी होती. ज्यूंची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यामागे हे सुद्धा मोठे कारण आहे. त्यांचे हे असे आर्थिकदृष्ट्या सधन होणे स्थानिक लोकांना खुपत होते. त्यांच्यावर अत्याचार होत राहिले आणि सर्वात जास्त कहर केला तो हिटलरने! त्यांने असंख्य ज्यूंना अमेरिकेत स्थलांतरित होण्यास भाग पाडले, त्यामुळे ज्यूंचा स्वतःचा एक देश असावा अशी चळवळ युरोपमध्ये सुरू झाली जीचे नाव ‘झायोनिस्ट’ मूव्हमेंट असे आहे. या चळवळीने इस्राईलची पायाभरणी केली. युरोप आणि अमेरिकेतल्या धनाढ्य ज्यूंनी याला भरभरून मदत केली आणि डेड सी च्या उत्तरेला १९४८ मध्ये इस्रायलची स्थापना झाली. लाखो संख्येने ज्यू जेरुसलेम आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाले. इस्राईलमध्ये स्थायिक होत असताना त्यांनी स्थानिक पॅलेस्टाईन लोकांना हुसकावून लावण्यासाठी त्यांच्यावर बरेच अत्याचार केले आणि आजही चालू आहेत. त्यांच्या या कृत्याचे समर्थन करण्याचा कसलाही हेतू नाही.

आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडाच्या कानाकोपर्‍यातून लोक इस्राईलमध्ये जमा झाले त्यावेळी त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता तो पाण्याचा! इस्रायल ची स्थापना होण्याअगोदर काही प्रमाणात पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. १९३८ मध्ये मेकोरोट मध्ये इस्राईलच्या राष्ट्रीय जल प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. या अंतर्गत नाजरेथच्या दक्षिणेकडील जेझ्रील व्हॅली या वाळवंटी प्रदेशात पाइपलाइन मार्गे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. परंतु हा प्रयत्न तितकासा परिणामकारक न झाल्याने १९३९ मध्ये ज्यूंचे स्थलांतर रोखण्यात आले. त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात जल व्यवस्थापनाचे प्रकल्प हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. इतके की आज त्यांच्याकडे पाणी मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे, जे की ते शेजारील देश जॉर्डन, पॅलेस्टाईन आणि वेस्ट बँक यांना सुद्धा पुरवतात. वायव्येकडील समुद्रकिनाऱ्यावर पाच मोठमोठे जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत जे समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य शुद्ध पाण्यात रूपांतर करतात. याशिवाय सर्व मोठ्या शहरातील ८५% सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरले जाते.

सन २०१३ चा तो ऑक्टोबर महिना होता. भारतात पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटला होता. भारतातल्या मराठवाडा आणि सोलापूर या भागात दुष्काळ पडला होता आणि बऱ्याच भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती होती. शेतकऱ्यांचे हाल झालेले होते. सरकार समोर शेतकऱ्यांचे प्रश्न उभे केले जात होते. भागातले शेतकरी मृगजळामागे धावल्या प्रमाणे नेत्यांच्या मागे धावत होते आणि गल्लोगल्ली तयार झालेले नेते शेतकऱ्यांचे कथित कैवारी म्हणून प्रसिद्धीच्या मागे लागले होते! हाच वर्ष, हाच महिना परंतु प्रांत थोडासा वेगळा- इस्रायलचा. देशातल्या मीडियाचे कर्मचारी जेरुसलेम मधल्या प्रधानमंत्री कार्यालयावर लक्ष ठेवून होते. आज तिथे मोठी घोषणा केली जाणार होती. इस्राईलच्या इतिहासातली सर्वात महत्त्वपूर्ण घोषणा! संपूर्ण जबाबदारीने इस्राईलने घोषणा केली, की ते आजपासून पाण्याच्या बाबतीत संपूर्णतः स्वावलंबी आहेत. आजपासून आकाशातून पाण्याचा एक थेंबही नाही पडला तरी त्याचा काहीही फरक त्यांच्यावर पडणार नाही. हाती खूपच कमी संसाधने असताना देखील इस्राईल इथपर्यंत कसा पोहोचला हे पाहणे खरोखरच भरपूर शिकवणारे आहे. इस्राईलच्या साठ टक्क्यांपेक्षा अधिक भागात पंधरा सेंटिमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो, तरीसुद्धा इस्राईलने ही किमया कशी साध्य केली हे आपण येणाऱ्या भागांत पाहणार आहोत. इस्राईलचे तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांना कशाप्रकारे वापरता येईल, हे ही आपण शिकणार आहोत.

क्रमशः

लेखक : शेख रियाझ, बिजनेसवाला, लातूर
मो. 7378926295

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*