यशोगाथा | डोईफोडे यांनी फुलविली मिश्र फळबाग शेती

कमी पाण्यावर जोपासली जाते मिश्र फळांची बाग
फळे व रोपे विक्रीतून वर्षाकाठी होते लक्षावधी रुपयाची उलाढाल
कृषी पदवीच्या शिक्षणामुळे शेतीला मिळाली आधूनिकतेची जोड
मेहनत,जिद्द आणि चिकित्सक पध्दतीने केले फळबागेचे संगोपन
ठिबकच्या साह्याने जोपासली सर्व मिश्र फळबाग

“शेतक-यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत आधूनिक पध्दतीने शेतीत पीके घेणे काळाची गरज आहे. प्रत्येक शेतक-याने एकूण क्षेत्रापैकी दोन एकर तरी फळबाग लावली तर चांगले उत्पन्न मिळते. कमी पाण्यात कमी खर्चात फळबाग अधिक उत्पन्न मिळवून देते याचा मी स्वता: अनूभव घेत आहे”, असे आत्माराम सुंदरराव डोईफोडे सांगतात.

लेखक : आनंद ढोणे पाटील, मुक्त पत्रकार, मराठवाडा

कमी पाण्यात, कमी मणूष्य बळात आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणजे फळबाग. शेतक-यासाठी पारंपरिक पिकापेक्षा फळबाग लागवड फायदेशीर ठरत आहे. म्हणून अनेक शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळताना दिसत आहेत. महाराष्ट्र शासनाचे कृषी खाते फळबाग लागवड करण्यासाठी अनूदान देते. या लाभावर राज्यातील असंख्य शेतक-यांनी संत्रा, मौसंबी, आंबा, सिताफळ, पेरु, लिंबोनी (लिंबू), आवळा, जांभूळ, डाळिंब चिकू आदी फळबागा लागवड केल्यात. काही शेतकरी तर अनूदानाच्या मागे न लागता स्वता:च्या खर्चाने फळझाडांची लागवड करुन त्यापासून उत्पादनही घेत आहेत. याच धरतीवर बीड जिल्ह्यातील ईट येथले कृषी पदवीधारक शेतकरी आत्माराम सुंदरराव डोईफोडे यांनी आपल्या शेतीत पेरु, सिताफळ, जांभूळ, डाळिंब या मिश्र फळबागेची लागवड करुन त्यातून मोठे उत्पन्न मिळवून शेतीला नवा आयाम दिला आहे.

दुष्काळी मराठवाडा विभागात येणा-या बीड जिल्ह्यातील बहूतांश शेतक-यांच्या शेतात आज घडीला शेकडो हेक्टरवर फळबागा उभ्या दिसतात.त्यात अधिक करुन सिताफळ बागा पहावयास मिळतात. बीडच्या ईट-पिंपळनेर येथील शेतकरी आत्माराम डोईफोडे यांनी तर कृषी पदवीपर्यंत शिक्षण घेवूनही कुठे नौकरीच्या मागे न लागता शेतीतच आपले करियर घडवले आहे. ईट हे साडे तीन हजार लोकसंख्यचं गाव बीड पासून पूर्व दिशेला १६ किमी अंतरावर आहे. येथे आत्माराम यांना एकूण १० एकर मध्यम प्रतीची जमीन आहे. त्यात सिंचनासाठी एक विहीर आणि ४ बोअरवेल आसून त्यास सध्या थोडे थोडे पाणी टिकून आहे.संपूर्ण शेतीला थिबक संच बसवण्यात आले आहे. ठिबकने सर्व मिश्र फळबाग झाडांना पाणी दिले जाते.

पेरु बागेची केली लागवड
दोन वर्षापूर्वी त्यांनी आपल्या शेतीत पारंपरिक पिकाला फाटा देत १२ बाय ६ फूट अंतर अकारावर अमृत राॅयल वाणाच्या पेरुच्या ४०० रोपांची लागवड केली आहे. हे वाण लागवडीपासून वर्ष पूर्ण झालेकी लगेच फळे द्यायला सुरुवात करते. फळांचा रंग हिरवट पिवळा असून यात बिया कमी अन् गर अधिक असतो. तसेच गोडी चांगली आहे. एक फळ एक किलो वजनाचे होते. दोन वर्ष वयाच्या एका झाडावर योग्य व्यवस्थापन झाल्यास जवळपास २५ ते ३० किलो फळे उत्पादीत होतात. त्याच बरोबर त्यांनी अलहाबाद सफेदा वाणाच्या १०० पेरु झाडाची लागवड केली आहे. या वाणाच्या फळाचा अकार लहान असतो. गोडी चांगली असून उत्पादन भरपूर देते. फळे लवकर लगडतात. दोन्ही वाणाच्या पेरु लागवडीने एक एकर क्षेत्र व्यापले आहे.

जांभूळ लागवड प्रयोग
पेरुसह त्यांनी ६ वर्षापूर्वी कोकण बडोली (बहाडोली) वाणाच्या जांभूळाची १०० रोपाची २४ बाय २४ फूट अकारावर लागवड केली आहे. या वाणाच्या जांभूळ झाडाला लागवडीपासून ३ व्या वर्षी फळधारणा होते. याच्या जांभूळ फळांचा रंग गडद जांभळा असून फळास गोडी जास्त आहे. शिवाय फळातील बी अकराने लहान आसून गर अधिक असतो. पिकलेले फळ तोडल्यानंतर जास्त काळ जसेच्या तसे टिकून राहत असल्यामुळे निर्यातक्षम आहे. एक फळाचे वजन २५ ते ४० ग्राम होते. सहा वर्षानंतरची झाडे भरपूर उत्पादन देतात. त्यासोबतच साई वाणाच्या जांभूळाचीही लागवड आहे. साई जांभूळाच्या एका फळाचे वजन साधारणता ५० ग्राम भरत असून त्यात १० ग्राम बी म्हणजे निव्वळ गर हा ४० ग्रा असतो. याचा रंग फिकट जांभळा असून लागवडनंतर ३ वर्षाला फळ धारणेस सुरुवात होते. फळ मोठे असल्याने कोकण बडोली वाणा ईतके उत्पादन मिळत नाही. पेरु, जांभूळ यासहच सुपर गोल्डन सिताफळाची शुध्दा १४ बाय ७ फूट अंतरावर ६०० झाडे लागवड केलेली आहेत. ही सर्वच बाग फळे देत आहे.

त्यांच्या शेतात असलेल्या मिश्र फळबाग झाडांना दरवर्षी शेण खत भरवला जातो. सिताफळावर बुरशी व मिलीबग रोग येवू नये म्हणून दसपर्णी अर्क आणि निंबोळी अर्कची फवारणी करावी लागते. ताणानुसार ठिबकने पाणी देतात. उन्हाळ्यात खालच्या फांद्यांची कापणी करावी लागते. सिताफळाच्या फळधारणे करीता मे महिन्याच्या शेवटी सर्व कोवळ्या फांद्या छाटून घेतात जेणे करुन पावसाचे पाणी पडताच छाटणी केलेल्या कडक फांदींना पालवी फुटून त्यावर फुल धारणा अधिक होते. सर्वच फळबागेला मे महिन्यापासून पाणी देणे बंद करुन फूलोरा येण्यासाठी ताण दिला जातो. या पध्दतीने बागेचे संगोपन करतात.

फळांचे उत्पादन व विक्री
सिताफळाच्या झाडापासून त्यांना आतापर्यंत सिताफळाचे १३ टन उत्पादन मिळाले असून त्यास पहिल्या वर्षीच्या २ टनाच्या फळांना प्रती किलो सरासरी ७५ रु दर मिळाला. त्याच्या विक्रीतून १,५०,००० रुपये मिळाले त्यातून २५,००० उत्पादन खर्च वजा जाता १,२५,००० रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. तर दुस-या वर्षी ५ टन उत्पादन झाले. फळ विक्रीतून ३,७५,००० रुपये आले उत्पादन खर्च ३०,००० रुपये जाता ३,४५,००० रुपये मिळाले. तिस-या वर्षी ६ टन उत्पादन झाले. फळ विक्रीतून उत्पादन खर्च ३०,००० रुपये वजा जाता ७,५० ००० असे मिळून १२,२०,००० रुपये निव्वळ आर्थिक उत्पन्न मिळाले. त्याच बरोबर जांभूळाचे दोन वर्षापासून ८ क्विंट्टल उत्पादन झाले आहे. त्यास प्रती किलो १२० रुपये स्थानीक बाजारात दर मिळत आहे. आतापर्यंत जांभूळ विक्रीतून जवळपास दिड लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच आजतागायत पेरुचे ८ टनापर्यंत उत्पादन झाले आहे. त्यास सरासरी ३० पासून ५० रुपये किलोला दर मिळाला. पेरु फळापासून उत्पादन खर्च जाता २ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

रोपवाटीकेची केली निर्मीती
डोईफोडे यांनी २ वर्षापूर्वी आपल्या शेतीत उभे असलेल्या पेरु, सिताफळ, जांभूळ, लिंबोनी, डाळिंब, ड्रगन फळ या फळबाग मातृ वृक्षापासून शरद नावाने रोपवाटीकेची निर्मीती केली आहे. ते प्रतिवर्षी सिताफळ ५० हजार, पेरु ५० हजार, जांभूळ ५ हजार, लिंबोनी १५ हजार, साई सरबती १५ हजार प्रती वाण दर्जेदार व खात्रीशीर रोपे तयार करतात. रोपांच्या विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळत असून त्यांच्या कडून रोपे विकत नेवून अनेक शेतक-यांनी फळ बागेची लागवड केली आहे.

संपर्क
आत्माराम सुंदरराव डोईफोडे
रा. ईट-पिंपळनेर, ता./जि. बीड.
मो. ९५४५८७५१५१

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*