यशोगाथा | गावरान लोणचे विक्रीतून मिळवला नफा..!

परभणी जिल्ह्यातील बहूतांश शेतकरी आता कृषी क्षेत्रातील बदलत्या परिस्थीतीनूसार समूहाने एकत्रीत होवून गट शेतीचा आवलंब करु लागले आहेत. त्याचबरोबर पारंपरिक पिकपध्दतीला फाटा देत कमी पाण्यात आणि अल्प खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारी फळबाग शेती करीत आहेत. शिवाय फळ प्रक्रिया उद्योग उभारुन फळावर प्रक्रिया केलेल्या उपपदार्थाच्या विक्रीतून अधिकचा पैसा कमवू लागलेत. याच अनूषंगाने परभणी जिल्ह्यातील माखणीचे कृषीमित्र शेतकरी श्री. जनार्धन बालासाहेब आवरगंड यांनी आपल्या शेतीतील गावरान झाडांच्या आंबा फळापासून शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून गावरान स्वादिष्ट लोणचे निर्मीतीचा प्रक्रियायुक्त उद्योग उभारला आहे. आंबा विक्री ऐवजी लोणच्यापासून अधिकचे उत्पन्न मिळत आहे.

लेखक : आनंद ढोणे पाटील, मुक्त कृषी पत्रकार, परभणी (मराठवाडा)

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील माखणी गाव शिवारात जनार्धन आवरगंड यांना एकूण ७ एकर वडिलोपार्जीत जमीन आहे. शेतात एक विहीर, एक बोअरवेल खोदलेला असून त्यास ब-यापैकी पाणी आहे. त्यांच्याकडे २ बैल, २ वळू, १ गाय असे पशूधने आहेत. ते आपल्या शेतीत खरीपात ३ एकर सोयाबीन, कापूस १ एकर, हळद १ एकर, ऊस १ एकर ही पिके घेतात. तसेच १५ वर्षापूर्वी दिड एकर क्षेत्रात आंबा लागवड करण्यात आलेला आहे. यात ४० झाडे मलिका, ४० झाडे गावरान आणि १० झाडं केशर या वाणाची अंबराई आहे. बागेत सोयाबीनचे आंतर पिकही घेतात. दोन वर्षापूर्वी ३० गुंठ्यात सुपर गोल्डन सिताफळ वाणाची लागवड केली आहे. त्यातही आंतर पीक घेतात. गत ८ वर्षापासून ते आंबा फळाचे उत्पादन घेत आहेत. विक्रीतून त्यांना आतापर्यंत निव्वळ दोन लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. आंबा बागेचे संगोपन सेंद्रिय पध्दतीने करतात. आता यंदा त्यांनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून गावरान अंब्याचे लोणचे तयार करुन त्याची “शेती सेवा ग्रुप ता पूर्णा जि परभणी” या ब्रॅऺड नावाने पॅकिंग करुन विक्री सुरु केली आहे.

सेंद्रिय पध्दतीने घेतात पिकांचे उत्पादन
प्रतिवर्षी ते सोयाबीन, हळद, कापूस, ऊस व भाजीपाला ह्या पिकांचे उत्पादन सेंद्रिय पध्दतीनेच घेतात. सर्व पिकांना पशूधनाच्या शेणाची व गांडूळ खताची मात्रा देतात. सोयाबीन व ईतर पिकावरील किड नियंत्रणासाठी शेतात स्वत: बनवलेल्या अग्नीअस्त्र, जिवामृत, दसपर्णी अर्क या नैसर्गिक सेंद्रिय औषधाचा वापर करतात. यामुळे त्यांचा शेतमाल हा सेंद्रिय विषमुक्त असतो.

आंबा लागवड
आवरगंड यांनी गत १५ वर्षापूर्वी दिड एकर क्षेत्रात मलिका, गावरान अन् केशर या वाणाच्या अंब्याची रोपे १५ बाय १५ फूट अंतरावर लागवड केली. त्या झाडांना वाढीप्रमाणे शेणखताची मात्रा देवून सेंद्रीय पध्दतीनेच बागेचे आजपर्यंत संगोपन चालू आहे.

पाणी व्यवस्थापन
बागेस पंधरा दिवसाआड सरीने आळ्यात पाणी सोडले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात झाडाच्या बुंध्या सभोवतालील आळ्यात केरकचरा व पाचटीचे आच्छादन करुन आळ्यातील ओलावा सुकू नये यासाठी नियोजन केले जाते. विहीर बोअरवेलच्या पाणी उपलब्धतेप्रमाणे एप्रील मे महिन्याच्या उन्हाळ्यातील दिवसात देखील बागेला पाणी देतात.

आवरगंड यांच्या शेतातील ४० मलिका आणि १० केशर वाणाच्या झाडाला लगडलेली आंबा फळे ते पिकवून विकतात. त्यांना मलिकाचे ५ क्विंट्टल, गावरानचे ५ क्विंट्टल, केशरचे २ क्विंट्टल आंबा फळाचे उत्पादन होते. आंबा फळे ते पिकवून स्वत: बाजारात जावून विक्री करतात. तर, यंदा त्यांनी गावरान अंब्याचे लोणचे तयार करण्याचा उद्योग चालू केला आहे.

शेतकरी गटाची केली स्थापना
जनार्धन हे अतिशय चोखंदळ आणि अभ्यासू वृत्तीचे असल्याने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात जावून ते शेतीत बदल घडवून आणण्याकरीता तेथील शास्त्रज्ञांशी संपर्क करुन नेहमीच मार्गदर्शन घेतात. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील अधिका-याचे सल्ले घेवून शेतीत नवप्रयोग राबवत असतात. काही वर्षापूर्वी त्यांनी कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत गावात शेतक-यांना एकत्रित करुन ओंकार शेतकरी बचत गटाची स्थापना केली आहे. गटातील सदस्यांच्या विचाराने ते गट शेती करुन शेतीत सेंद्रिय पध्दतीने पिक प्रयोग राबवत आहेत. याकामी त्यांना कृषी विद्यापीठाचे कूलगुरु डॉ. अशोक ढवण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, संचालक सागर खटकाळे, विश्वंभर गावंडे, सिंचन आयोगाच्या विद्याताई पवार, डॉ. यु. एन. आळसे, डॉ. डि. डि. पटाईत, कृषी अधिकारी तांबीले, खुपसे, डॉ. बि. बि. भोसले, डॉ. आनंद गोरे, आत्माचे कृषि संचालक श्राफ, ईक्कर, स्वाती घोडके, कृ. सा. लांडगे, रनेर, ढोके प्रशांत त्याच बरोबर प्रगतशील शेतकरी कृषीभूषण कांतराव देशमुख, गंगाधर दादा पवार, रमेशराव गोळेगावकर, प्रताप काळे, पंडित थोरात यांचे नेहमी मार्गदर्शन मिळते.

नवतंत्रज्ञान अन् आधूनिक पध्दतीने शेती करण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील काही प्रयोगशिल शेतकरी एकत्रित करुन “शेती सेवा ग्रुप ता पूर्णा जि परभणी” स्थापना केला. ग्रुप मधील शेतक-याकडून विविध पिकाविषयी सल्ला मसलत होवून शेतीत कृषि तज्ञांच्या मदतीने प्रयोग राबवले जातात.

गावरान अंब्यापासून लोणचे निर्मीतीचा उद्योग
शेतकरी गटाच्या माध्यमातून त्यांनी यंदा आपल्या शेतातील गावरान अंब्यापासून घरगुती पध्दतीने गटातील सदस्यांच्या सहकार्याने आंबे कापून फोडी करुन त्यात मिठ, मिरची पावडर, तिखी, हळद, मिरे, जिरे, मेथी बिया, हिंग, कराळ, तेल, बडिशोप व घरी बनवलेला गावरान मसाला हे पदार्थ वापरुन स्वादिष्ट आणि रुचकर असे लोणचे तयार करण्याचा उद्योग प्रथमच चालू केला आहे. त्याचे ४०० ग्राम, ५०० ग्राम आणि १ किलो वजनाचे ‘शेतीसेवा ग्रुप ता पूर्णा जि परभणी’ ब्रॅऺड नावाने डब्बे पॅकिंग करुन सोशियल मिडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करीत मागणीनूसार विक्री केली जात आहे. ४०० ग्रामचा डब्बा ६० रुपये, ५०० ग्रामचा १०० रुपये व एक किलोचा डब्बा २०० रुपये याप्रमाणे विक्री केली जात आहे. यंदा २५० किलो अंब्याचे लोणचे तयार करण्यात आले असून पुढील वर्षी त्यात वाढ केली जाणार आहे.

कृषीमित्र पदी निवड
जनार्धन आवरगंड यांचे ईतर शेतक-याप्रती मार्गदर्शनपर चांगले कार्य असल्यामुळे कृषी विभागाने त्यांची कृषिमित्र पदी निवड केली आहे. या पदावरुन ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याकडून शेतकरी हितासाठी राबवल्या जाणा-या विविध योजनांची माहीती शेतक-या पर्यंत पोहचण्याचे काम करतात. हे काम ते यशस्वीपणे राबवत असल्याने व लोणचे निर्मीतीचा नव प्रयोग यशस्वी केल्यामुळे वनामकृ विद्यापीठाचे कूलगुरु डॉ. अशोक ढवण, महाराष्ट्र राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले यांनी त्यांचे कौतूक केले आहे.

पारंपरिक शेती आणि सध्या करीत असलेली शेती यात शेतीसेवा ग्रुप मधील शेतक-यांच्या मार्गदर्शन व घेवाण देवाणीवरुन आमूलाग्र बदल होत आहे. शेतीसेवा ग्रुपमधील २०० शेतक-यांची दरमहिन्याच्या दुस-या रविवारी एका शेतक-याच्या शेतात मासिक बैठक घेतली जाते. त्यात मार्गदर्शनासाठी कृषि शास्त्रज्ञ व कृषि अधिकारी यांना आमंत्रित केले जाते. तेथे शेती पिकाविषयी ईत्यंभूत माहीती मिळते. एकमेकात विचारांची घेवाण देवाण होते आणि त्यानूसार आधूनिक पध्दतीने शेतीत आम्ही नवप्रयोग राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत. यंदा मी गावरान अंब्यापासून लोणचे तयार करण्याचा उद्योग चालू करुन आंबा विकण्यापेक्षा लोणच्यातून चांगला नफा कमवला आहे, अशी माहिती आवरगंड यांनी दिली.

संपर्क
श्री. जनार्धन बालासाहेब आवरगंड
माखणी, ता. पूर्णा, जि. परभणी; मो ९५५७२४०२६३

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*