BLOG | म्हणून गरज आहे ‘जीएम काॅर्न’ची..!

सध्या जगभरात अनेकांना वाढत्या वजनामुळे आहारावर नियंत्रण ठेऊन वजन कमी करावे लागत आहे. तर, बहुसंख्यांकांना एका वेळच्या खाण्याची भ्रांत आहे. हे आताच्या जगाचे वास्तव असून हे बदलण्यासाठी सर्वांना पोटभर आणि पोषक मुल्ये असलेले अन्न मुबलक व वेळेवर मिळण्याची गरज आहे. ती गरज भागविण्यासाठी जेनेटिकली मॉडीफाईड अर्थात जीएम क्रॉपची गरज असल्याचे अनेक शास्त्रज्ञ सांगत आहेत. तर, अनेक विचारवंत व सामाजिक अभ्यासकांना हे नवे तंत्रज्ञान म्हणजे मानवजातीच्या नाशाचे कारण वाटत आहे. त्याबद्दल जेनेटिक लिटरसी प्रोजेक्ट https://geneticliteracyproject.org या वेबसाईटवर ईश्ना गोगीया यांचा सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाचा स्वैर अनुवाद व संपादकीय अंश येथे देत आहोत.

सर्वांगीण विकासासाठी व सर्वांना जगण्याचा हक्क देण्यासाठी जीएमओ क्रॉप गरजेचे असल्याची मांडणी या लेखात लेखिकेने केली आहे. त्यासाठी मका आणि बटाटा या दोन पिकांच्या फरकाचे फोटो आणि सविस्तर शास्त्रीय माहिती देण्याचाही त्यांनी त्यात प्रयत्न केला आहे. त्या लेखात म्हणतात की, जगात अन्न सुरक्षा धोक्यात आलेली आहे. जगभरातील सुमारे ७९६ मिलियन लोकांना कुपोषित राहावे लागत आहे. आपल्याकडे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे उत्पादन वाढत आहे. मात्र, ते पुरेसे नाही. तुलनेत लोकसंख्या भरमसाठ वाढत असल्याने बहुसंख्य लोकांना खाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशावेळी फ़क़्त जीएम क्रॉप संशोधन आणि लागवडीतून उत्पादित झालेल्या भरमसाठ उत्पादनाचीच जगाला गरज आहे.

कमी पाण्यात मिळावे अधिक उत्पादन
कमी पाण्यात म्हणजे अगदी एक-दोन पावसावरही चांगले उत्पादन देणाऱ्या पिकाच्या जाती आपल्याला गरजेच्या आहेत. जागतिक तापमानवाढीचा फटका शेतीला बसत आहे. नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. अशावेळी खाणारी तोंडे वाढल्याने उत्पादनात वाढ गरजेची आहे. भविष्यात जनुकीय बदल केलेले पिक व त्याच्या जाती यामुळेच सर्वांना खायला आपण देऊ शकतो. त्यासाठी सगळ्यांनी विचारापेक्षा विज्ञानाला महत्व देत जनुकीय चाचण्यांना विरोध करणे टाळले पाहिजे. अशा चाचण्या होऊनच दर्जेदार जनुकीय बदल केलेल्या पिकाच्या जाती शोधता येतील.

बटाटा ही मोठी गरज
यासाठी त्यांनी १५ वर्षे संशोधन करून बनविल्या गेलेल्या सिम्लोट इन्नेत (Simplot innate potato) या बटाट्याच्या जातीचे उदाहरण दिले आहे. प्रक्रियायुक्त वेफर्स किंवा इतर पदार्थ बनविण्यासाठी बटाटा वापरताना मोठ्या प्रमाणात बटाट्याची साल आणि आतील काळपट गर काढून फेकावा लागतो. हा कचरा ही मोठी समस्या असते. मात्र, सिम्लोट इन्नेत या बटाट्याच्या जातीमुळे असा कचरा सुमारे ८० ते ९० टक्के कमी राहतो. त्यामुळे जास्त वेफर्स व प्रक्रियायुक्त पदार्थ मिळतात.

लश्करी अळीपुढे भारत हतबल
तसेच उदाहरण त्यांनी मक्याचेही दिलेले आहे. जीम काॅर्न ही काळाची गरज असल्याचे सांगताना मका पिकावर वाढत असलेल्या रोगाचाही दाखला त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रासह भारतात सध्या मक्यावर अमेरिकन लश्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात आहेत. तर, कुक्कुटपालन करणारे शेतकरी मक्याच्या भाववाढीने तोट्यात आलेले आहेत. मक्याच्या उदाहरणानुसार देशात जीम काॅर्न ही मोठी गरज असल्याचे दिसते. मात्र, स्वदेशी विचारवंत आणि नैसर्गिक व जैविक शेतीचा जयघोष करणारे पर्यावरणवादी यांच्यामुळे देशात बीटी कॉटन (कपाशी) जातीच्या बीजी ३ हे आधुनिक बियाणे वापरण्यासाठी बंदी आहे. वांग्याच्या चाचण्या होऊनही सगळीकडे अंधार आहे. तर, मका, सोयाबीन, बटाटा अशी पिके चाचणीच्या टप्प्यावरही पोहचू शकलेली नाहीत.

लेखक, अनुवादक व संपादक : सचिन चोभे, संपादक, कृषीरंग

संपूर्ण इंग्रजी लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://geneticliteracyproject.org/2019/08/09/viewpoint-why-gmo-crops-are-planets-best-for-sustainability/?mc_cid=f9a8b0a7a3&mc_eid=ec5a4c8f63

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*