वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी गावांना लोखंडी कुंपण..!

मुंबई :

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून प्रायोगिक तत्त्वावर वनालगतच्या संवेदनशील गावांच्या वनसीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभे करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेत मान्यता देण्यात आली. वाघ-बिबट्यांचे वारंवार हल्ले होऊन व्यक्ती-शेतीचे नुकसान होत असलेल्या गावांना प्राधान्याने कुंपण लावण्यात येणार आहे. ही योजना २०१९-२० व २०२०-२१ या वर्षांत शंभर कोटी निधीच्या मर्यादेत राबविण्यात येणार आहे.

जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, ग्रामस्थांची वनावरील निर्भरता कमी करून शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे आणि त्या माध्यमातून मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राज्यात राबविण्यात येते. व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्र व वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्या सीमेपासून दोन किलोमीटर आतील भागातील गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे वन्यप्राण्यांना पुरेसे संरक्षण मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. अशा गावांत वन्यप्राण्यांचा प्रादूर्भाव वाढत असून वन्यप्राण्यांच्या वारंवार हल्ल्याच्या घटना घडत असल्याने अशा संवेदनशील गावांना वनसीमेलगत लोखंडी जाळीचे कुंपण देण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत होती. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर वनविभागाद्वारे लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्या गावात वाघ किंवा बिबट्यासारख्या प्राण्यांचा प्रादूर्भाव जास्त आहे आणि शेतीच्या नुकसानीची प्रकरणे जास्त आहेत अशा निवडक गावाच्या वनसीमेवरच हे कुंपण करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामसभेच्या ठरावासह प्रस्ताव उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी यांना सादर करावा लागणार आहे. त्यावर त्यांना परिस्थितीचा आढावा घेऊन वनसंरक्षक किंवा मुख्यवनसंरक्षक यांना मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे. कुंपणाची उभारणी करताना वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग बाधित होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासोबतच जाळीमुळे शिकारीचा प्रकार किंवा जाळीमध्ये विद्युत प्रवाह सोडण्याची घटना घडल्यास ही जाळी तातडीने काढून घेऊन अन्य गावात लावण्यात येणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*