दक्षिण ऑस्ट्रेलियाने उठविली ‘जीएम’वरील बंदी

जीएम (जेनेटिकली मॉडीफाईड) क्रॉप टेक्नोलॉजीच्या वापराचा निर्णय थेट शेतकऱ्यांवर टाकून दक्षिण ऑस्ट्रेलिया सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग खुला केला आहे. ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करून पुढील हंगामाची तयारीही केली आहे.

सध्या भारतासह जगभरात सेंद्रिय शेती, रासायनिक शेती आणि अनुवंशिकरित्या सुधारित अर्थात जीएम (जेनेटिकली मॉडीफाईड) क्रॉप टेक्नोलॉजी यावरील वाद-विवाद जोरात आहेत. खाणारी तोंडे वाढत असतानाच ग्लोबल वार्मिंगच्या समस्येची कुऱ्हाड शेतीवर येऊन पडली आहे. अशावेळी कमी पाण्यावर व कमी खर्चात शेती करण्यासाठीचा ठोस पर्याय म्हणून जीएम क्रॉपकडे पहिले जात आहे. आपल्याकडील बीटी कॉटन अर्थात जनुक सुधारित कपाशीच्या लागवडीमुळे झालेली क्रांती लक्षात घेता ही टेक्नोलॉजी म्हणजे काळाची गरज असल्याचे म्हटले जात आहे. अशावेळी आपल्याकडे साध्या चाचाण्यांनाही परवानगी देण्याचे धैर्य सरकार दाखवू शकलेले नाही. शेजारच्या बांगलादेश या देशाने जीएम टेक्नोलॉजी शेतकऱ्यांसाठी खुली केलेली आहे. तिथे बीटी ब्रिंजल (वांगी), गोल्डन राईस (सोनेरी भात) आणि सोयाबीन, मका यामध्येही हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात करून शेतीच्या क्षेत्रात क्रांती केली आहे.

अशावेळी अमेरिका व युरोपात सुद्धा जीएमओ टेक्नोलॉजी सर्रास वापरली जात आहे. त्याद्वारे उत्पादित अन्नपदार्थ तिकडे विकले व खाल्ले जात आहेत. आता ऑस्ट्रेलियन शेतकरीही या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमधील उत्पादन खर्च कमी आणि उत्पादनात वाढ करण्यासाठीच्या कामाला लागला आहे. भारतात अशा पद्धतीने तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळविण्यासाठी शेतकरी संघटना व काही इतर संघटना लढा देत आहेत. त्याचवेळी काही संस्था (स्वदेशी जागरण मंच व इतर) या तंत्रज्ञानामुळे जीव संस्थेचा नाश होण्याची भीती व्यक्त करीत आहेत. मात्र, जीएम टेक्नोलॉजीला असलेला असा विरोध तात्विक असल्याचे दिसते. विरोधी मत मांडणाऱ्या मंडळी व संस्थांना याबाबतचे शास्त्रीय पुरावे देणे अजूनही शक्य झालेले नाही.

माहितीचा स्त्रोत : जानेटिक लिटरसी प्रोजेक्ट (https://geneticliteracyproject.org )

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*