संपुर्ण कर्जमाफी देण्याची छावा संघटनेची मागणी

अहमदनगर :

सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडा भागातील शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमाफी द्यावी व अल्पप्रमाणात पाऊस झालेल्या नगर जिल्ह्यातील विविध भागामध्ये चारा छावण्या पुर्ववत चालू करण्याची मागणी अ.भा. छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेखा सांगळे, जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण पाटील, जालू दहिफले, शंकर गोरे, बी.के. जाधव, राजेंद्र गायकवाड, बाबा दहिफळे, अरुण चव्हाण, अजय अवटी, ऋषिकेश कुरकर आदी उपस्थित होते. मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी औसा येथे आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणाला छावा संघटनेच्या वतीने  पाठिबा देण्यात आला. मराठवाड्यामध्ये मागील आठ ते दहा वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तेथे दरवर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक भागात अद्यापि पाऊस झालेला नाही.

मराठवाड्यातील दुष्काळ भागातील खरिपाचे पीक शेतकर्‍यांचे हातातून गेल्याने शेतकर्‍यांना प्रति हेक्टर 5 हजार रुपये द्यावे, खरिपाचे पीक विमा सरसकट 100 टक्के देण्यात यावे, मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी ठिंबक सिंचनाद्वारे शेती करण्यासाठी 100 टक्के अनुदान मिळावे, जनावरांच्या छावण्यामध्ये चार्‍यांची व्यवस्था करावी, शेतकर्‍यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे व 24 तास वीज देण्यात यावी, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने चारा छावण्या पुर्ववत चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*