फुले विक्रम हरभरा हार्वेस्टिंग करा मशीनने..!

हरभरा म्हटले की आपल्याला आठवतो, तो हिवाळ्यातील संक्रातीचा कालावधी. कारण त्या काळात आपण लुसलुशीत हिरवा किंवा भाजलेला हरभरा मस्त एन्जॉय करतो. गावाकडे फुकटात मिळणारा हरभरा शहरात विकत घेऊनही नागरिक मोठ्या आवडीने खातात. मात्र, हरभरा वळून पक्व झाला की त्याची काढणी करणे हेच शेतकऱ्यांसाठी अवघड असते. मजूर मिळत नसण्याच्या काळात ही मोठी समस्या आहे. मात्र, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हे काम अगदी सोपे केले आहे.

होय, या विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पात संशोधन करून फुले विक्रम ही नवीन हरभरा जात (वाण) विकसित करण्यात आली आहे. संशोधकांनी मोठ्या मेहनतीने विकसित केलेल्या या जातीला महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यात पेरणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. जमिनीपासून १ फुट उंचीवर या वाणास घाटे येतात. त्यामुळे कंबाईन हार्वेस्टरद्वारे या हरभरा पिकाची काढणी करता येते. याच्या चाचण्या घेतल्यावर तीन राज्यातील शेतकऱ्यांसाठी या वाणाचे बियाणे वितरीत करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

झारखंड राज्याची राजधानी रांची येथील बिरसा कृषी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय हरभरा संशोधन आढावा बैठकीत यास मान्यता मिळाली. मर रोगाला प्रतिकारक्षम असलेला हा वाण मध्यम आकाराच्या दाण्याचे हेक्टरी ४० ते ४२ क्विंटलपर्यंत उत्पादन देत असल्याचे चाचाण्यातून सिद्ध झाले आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास व जमीन हलकी असल्यास उत्पादनात घट होते. मात्र, तरीही सरासरी २२ क्विंटल इतकी उत्पादकता फुले विक्रम या वाणाची असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे व त्यांच्या टीमने हा नवीन वाण विकसित केला आहे. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा आणि संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांचे त्यांना यासाठी मार्गदर्शन लाभले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*