बीटी चवळीच्या लागवडीला मान्यता; नायजेरियन शेतकऱ्यांनी केले उत्साहात स्वागत

आफ्रिका म्हटले की आपल्याला समोर दिसतात गरीब आदिवासी. होय, जगामध्ये वेगाने विकास होत असतानाच पर्यावरणाचे संरक्षण करून जीवन जगणाऱ्या या आफ्रिका खंडाचे हे वास्तव आहे. त्यावर मात देऊन देशातील गरिबी व त्या गरिबांची होणारी उपासमार दूर करण्यासाठी आफ्रिकेतील बहुसंख्य देश शेतीमध्ये आधुनिकीकरण आणण्यासाठी आग्रही आहेत. त्यापैकीच एक देश म्हणजे नायजेरिया. या देशाने बीटी कॉटन (कपाशी) पिकानंतर आता बीटी चवळी (काउपी cowpea) लागवडीस मान्यता दिली आहे. बीटी चवळी लागवड करणारा जगातील हा पहिला देश बनला आहे.

शेतकऱ्यांचा दबाव ठरला महत्वाचा

आपल्याकडे चवळी म्हणजे अवसा-पुनवेला खाण्याची भाजी. मात्र, आफ्रिकेत चवळी हे मुख्य अन्नधान्य पिक आहे. नायजेरिया, घाना, मलावी आणि बर्किना फसो या चार आफ्रिकन देशात चवळी हे प्रमुख पिक आहे. मात्र, आपल्याप्रमाणेच तिथेही शेंगा पोखरून खाणारी अळी (pod borer) ही शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी बनली आहे. या संकटामुळे येथील चवळी शेती संकटात आली आहे. या गरीब देशामध्ये आयातीसाठी खर्च करण्याचीही ऐपत नाही. त्यावर मात करण्यासाठी म्हणून सलग किमान ९ वर्षे प्रायोगिक चाचण्या घेऊन नायजेरिया देशाने जीएम (जेनेटिकली मॉडीफाईड) क्रॉप टेक्नोलॉजी अर्थात जनुक सुधारित किंवा अनुवंशिकरित्या सुधारित पिकाची व्यापारी तत्वावर लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. बीटी चवळीच्या लागवडीस येथील स्थानिक परंपरावादी अभिजन व पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. त्यांनी अनेक वर्षे शेतकऱ्यांना हे आधुनिक तंत्रज्ञान खुले न करण्याची मागणी लाऊन धरली होती. मात्र, त्यांच्या दबावापेक्षा स्थानिक शेतकऱ्यांचा दबाव व देशापुढील कुपोषणाचे संकट लक्षात घेऊन नायजेरियन सरकारने बीटी चवळी लागवडीस मान्यता दिली. तेथील शेतकऱ्यांनी याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.

उत्पादनात २० ते ३५ टक्के घट झाली..!

कडधान्य वर्गातील चवळी पिकाच्या बियांना असलेल्या डोळ्याच्या चिन्हामुळे चवळीला इंग्रजीत इंग्रजीत ब्लॅक-आईड पी (काळा-डोळा असणारे दाणे) असेही म्हणतात. ‘जशी चवळीची शेंग कवळी’, असे आपल्याकडे सौंदर्याचे प्रतिक असलेली चवळी खाण्यासाठी चवदार व आरोग्याच्या दृष्टीने पोषक असते. मात्र, हेच प्रमुख अन्नधान्य असलेल्या नायजेरिया देशात शेंगा पोखरणाऱ्या (शेंगपोखर) अळीमुळे २०१२ नंतर उत्पादनात सुमारे २० ते ३५ टक्के घट आली होती. हे संकट लक्षात घेऊन अहमाडू बेल्लो युनिव्हर्सिटी येथील संशोधक मोहमेड इशीयाकू यांच्या नेतृत्वाखाली मोन्संटो कंपनीने विकसित केलेल्या Cry1AB या जीनचा वापर केलेले पर्यायी व सक्षम बियाणे आता नायजेरियन शेतकरी वापरणार आहेत.

नायजेरिया देशातील सरकारी संस्थेने परवागी दिल्याने शेतकरी पुढील हंगामात बीटी चवळी बियाणे लागवड करणार आहेत. आता शेजारील घाना या देशानेही असे बियाणे शेतकऱ्यांना खुले करण्यसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. काही संघटना त्यास विरोध करीत आहेत. नायजेरिया देशातही काही संस्था नॉन-बीटी चळवळ चालवितात. त्यांनी याप्रकरणी स्थानिक यंत्रणेकडे याच्या विरोधात दाद मागण्यासाठी अर्ज देत आक्रमक होण्याची घोषणा केली आहे. एकूणच जगभरात बीटी विरुद्ध नॉन-बीटी अशा चळवळी सुरु असल्याचे दिसते. देश बदलला, मानसं बदलली म्हणून त्यांच्या भावभावना, मूळ समस्या व त्यासाठीचे सामाजिक राजकारण बदलत नाही, हेच यानिमित्ताने दिसते की..!

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग (मो. 9422462003)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*