कडकनाथ घोटाळा | कारवाईऐवजी रंगला कलगीतुरा..!

महाराष्ट्रात शेतकऱ्यांची फसवणूक हा तसा नवा किंवा ब्रेकिंग न्यूजचा विषय नाही. कारण, माध्यमांच्या दृष्टीने राजकीय आरोप-प्रत्यारोपापेक्षा कधीही शेतकऱ्यांची फसवणूक किंवा पडलेले बाजारभाव हे विषय बातमीच्या दृष्टीने तसे दुय्यमच. आता कडकनाथ कोंबडी व अंडी यांच्या व्यवसायातील महारयत अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा पुढे आलेला आहे. त्यात शेतकऱ्यांची फसवणूक हा मुद्दा दुय्यम बनून शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामधील कलगीतुरा बातम्यांचा मुख्य मुद्दा बनला आहे. त्यानिमित्ताने…

यापूर्वी ससा, इमू, कोरफड, शेळीपालन आणि इतरही अनेक बाबतीत राज्यातील लाखो शेतकरी फसले आहेत. फसवणूक केलेल्यापैकी काहींवर कारवाई झाली, तर काहीजणांची चौकशी सुरू आहे. काहीजणांना क्लीनचीट मिळून ते आणखी चीटिंग करायला मोकळे झालेले आहेत. अशावेळी पुन्हा एकदा राज्यात कडकनाथ कोंबडी घोटाळा पुढे आला आहे. त्यात्तील आरोपी किंवा फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, यावर माध्यमे विशेष वृत्त करीत नाहीत. मात्र, त्यावरील शेट्टी-खोत यांचा कलगीतुरा बातम्यांतून महाराष्ट्राचे नेहमीप्रमाणे मनोरंजन करीत आहे.

या प्रकरणी इस्लामपूर येथील महारयत कंपनीच्या संचालकांविरोधात शेतकऱ्यांची ३ कोटी ९४ लाख ५९ हजार ९३० रुपये फसवणूक केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. यातील संशयित सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यासह अन्य संचालकांवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला आहे. यातील मोहिते बंधू मंत्री खोत यांचे नातेवाईक असल्याने पोलीस कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप माजी खासदार शेट्टी यांनी याप्रकरणी केला होता. त्यावर कोणीही नातेवाईक नसल्याचे सांगून खोत यांनी जीभ घसरेपर्यंत शेट्टी यांच्यावर प्रत्यारोप केले होते. आता यातील आरोपी संदीप मोहिते यांचे खोत यांची पुतणी प्रियांका यांचाशी लग्न झाल्याचे पुरावेही शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी सदर करण्यास सुरुवात केली आहे.

संदीप मोहिते यांच्या लग्नाची पत्रिका

तर, वरची माहिती याच्या राजकीय घोळाबद्दल होती. आता महारयत कंपनीच्या आर्थिक घोळाबाबत. ही कंपनी साधारणपणे दोन वर्षांपूर्वी स्थापन झाली. वेगवेगळे प्रयोग व गुंतवणूकीवर अधिक परतावा देणाऱ्या आकर्षक स्कीम या कंपनीने विकण्यास सुरुवात केली. सध्या सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आदि जिल्यातील सुमारे ८ हजार शेतकऱ्यांना या कंपनीने सभासदत्व दिले आहेत. कडकनाथ कोंबड्या देऊन प्रत्येकी ५० रुपयांनी विकत घेण्याचे गणित मांडून ही कंपनी काम करते. बाजारात सर्रास १५ ते २५ रुपये दराने कडकनाथ अंडी मिळतात. मात्र, या कंपनीने हेच बाजाराचे गणित मांडून फसविल्याचे आरोप होत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*