माहित आहेत का, भाजीपाल्यामधील औषधी गुणधर्म; वाचा सविस्तर

साधारणत: बघण्यात येते की काही ठराविक फळे व भाजीपाला आपण आपल्या आहारात समाविष्ट करत असतो. पण खरं तर संपूर्ण भाज्या ह्या खनिजे व विटमिन्स चा स्त्रोत आहे व काही भाज्यांमद्धे तर औषधीय गुणधर्मांचा खजिना लपलेला असतो पण त्या लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकत नाही जसे की कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक, मुळा, कारले, मेथी, गाजर, कांदा व मिरची इत्यादि व अजूनही बर्‍याच भाज्या या मध्ये समाविष्ट होतील. या पैकी काही निवडक भाज्यांचे औषधी गुण बघूयात.

लेखक : डॉ. मुरलीधर इंगळे,
राधिका नावकर कृषि विज्ञान केंद्र, बालाघाट
मो. ९४२०५६२०३४

१. कोथिंबीर: कोथिंबीर चा उपयोग प्रामुख्याने भाज्यांचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. कोथिंबीर चा जेवणात उपयोग केल्यामुळे गरम पदार्थांची दाहकता कमी होण्यास मदत होते. शरीरात होणारी पित्त वाढ कमी होते. कोथिंबीर ही शीतल असल्यामुळे अपचन, आम्ल पित्त, पोटातील जळजळ इत्यादि रोगांमध्ये ही प्रभावशाली आहे. भाजलेले धने मंदाग्निमध्ये उपयोगी ठरतात. त्वचा जर लाल झाली असेल तर कोथिंबीर चा रस त्यावर लावून आराम मिळतो. कोथिंबीर ही क्षुधावर्धक, कामोत्तेजक व ताप हर म्हणून उपयोगी आहे. डोकेदुखीवर कोथिंबीर चा वाटलेला लेप लावल्यास आराम मिळतो.

२. पुदिना: पुदिना व कांदा यांचा रस एकत्र करून पिल्यास मळमळ कमी होण्यास मदत होते. या शिवाय व्यावसायिक स्तरावर पुदिना हा पेपरमिंट बनविण्यासाठी वापरला जातो. तसेच विविध औषधी तयार करण्यासाठी पुदिण्याची पाऊडर वापरतात.

३. लसूण: लसूण चूर्ण हे पाचक असून पोटाच्या विकारांवर लाभदायक व पाचन समस्यांवर गुणकारी आहे. लसूण तेल हे वात व पक्षाघात असलेल्या अवयवांवर लावल्यास आराम मिळतो. मिठासोबत मिसळून हे डोकेदुखी, उदरवायू मध्ये खाऊ घातल्या जाते. खवखवणारा घसा, सामान्य दमा, पक्षाघात व नर्वस सिस्टम शी संबधित आजारांवर लसूण उपयोगी ठरतो.

४. अद्रक: भूक वाढविण्यासाठी व जेवण केलेल्या अन्नाचे पचन करण्याचे महत्वाचे काम अद्रक पार पाडते. खोकला, दमा, वात असल्यास अद्रक सेवनामुळे हे रोग दूर होतात. अद्रक ओली किंवा वाळवून सुंठ बनवून खाऊ शकतात.

५. मुळा: मुळा हा थंड प्रवृत्तीचा असून भूक वाढविण्यास मदत करतो. मूत्रदोष, मूळव्याध, क्षयरोग, नेत्ररोग, वात, कुष्ठरोग व अन्य रोग कमी करण्यास सहायक आहे. कावीळ मध्ये तर मुळा हा अमृता समान मानतात. ६. गाजर: वेगवेगळ्या रोगांच्या व आजारपणाच्या आक्रमणापासून गाजर वाचवण्यास मदत करते. गाजर हे नैसर्गिक साखरेचा स्त्रोत असून हे पचन शक्ति वाढविण्यास मदत करते. गाजर हे सौंदर्यवर्धक असून त्वचा साफ करण्यासाठी मदत करते.

७. मेथी: मेथीदाणा हा तापहर तसेच पोटाच्या विकारांवर उपयुक्त आहे. मेथी हे कामोद्वीपक, स्त्रावरोधक, आर्तवजनक व जळजळ कमी करण्यास उपयुक्त आहे. मेथी ची पाने थंडपणा देणारी तथा क्षुधावर्धक आहेत. मेथी दाणा पासून बनवलेले चूर्ण केसांना लावल्यास केस गळणे कमी होऊन केसांची वाढ होण्यास मदत होते.

८. मिरची: मिरची ची पेस्ट ही एक अॅंटीसेप्टिक म्हणून त्वचेवर बाहेरून लावता येते व ती या साठी उपयुक्त आहे तसेच टॉन्सिल वरील सूज कमी करण्यास मदत करते. डीप्थिरिया मध्ये मिरची उपयुक्त आहे. घसा खव खवत असल्यास थोडीसी मिरची पाऊडर पाण्यात उकळून गुळणी केल्यास आराम मिळतो.

९. कांदा: उष्णता आणि उष्माघातापासून संरक्षणासाठी बहुतेक सर्व जन कांद्याचा वापर करतात. या व्यतिरिक्त पोटदुखी व स्कर्वी रोगांमध्ये मिठासोबत कांदा देतात. कांदा कच्चा खाल्ल्यास तो मूत्रवर्धक व आर्तवजनक आहे. कांद्याचा रस डोकेदुखी, शुद्ध हरपणे व फीट आल्यास अत्यंत उपयोगी आहे. त्वचारोगामध्ये त्वचेची होणारी जळजळ कमी करण्यासाठी कांद्याचा रस उपयोगी आहे. कान दुखत असल्यास कोमट रस कानात टाकल्यास वेदना कमी होतात.

१०. कारले: कारल्याचे नाव ऐकले की आपली तोंड कडू होते पण खरं तर तर कारले हे खूप गुणकारी आहे. कारल्याची मुळे, पाने, व फळ सर्व काही उपयोगी आहे. कारल्याची मुळे डोळ्यांची दुखणे बरी करण्यास मदत करते. कारले वाततर, क्षुधावर्धक, कामोत्तेजक व बलवर्धक आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*