आदर्श तहसीलदार लाच घेताना सापडला; महसूलचा ‘आदर्श’ झाला जगजाहीर..!

औरंगाबाद :
पोलीस कुठेही लाच घेताना दिसतात म्हणून बदनाम असतात, मात्र सर्वाधिक लाचखोर विभाग म्हणून महसूल विभागाची ओळख आहे. त्यालाच आणखी पक्के करण्याचा कारनामा पैठण येथील आदर्श तहसीलदार महेश नारायण सावंत यांनी केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आदर्श तहसीलदार म्हणून नुकताच सावंत यांचा गौरव झाला होता. त्यांनाच १ लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्यामुळे सरकारकडून खैरातीत वाटण्यात येणारे पुरस्कार कसे ‘आदर्श’ अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटतात त्याचाही पर्दाफाश झाला आहे.

कुळाची जमीन परत मिळावी,याकरीता तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी ३० लाख रुपये लाचेची मागणी करून वकिल आणि मदतनिसामार्फत १ लाख रुपये लाच घेताना पैठणचे तहसीलदार सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पैठण तालुक्यातील पांगरा येथील १२ एकर १४ आर कुळाची जमीन खरेदी केली आहे. कुळाची ही जमीन परत मिळावी, म्हणून मूळ मालकाच्या नातेवाईकांनी पैठण तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे दावा दाखल केला होता. हे प्रकरण सुनावणीसाठी होते. या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी तहसीलदार सावंत यांनी अ‍ॅड. कैलास लिपने पाटील आणि बद्रीनाथ भवर यांच्यामार्फत ३० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. २९ सप्टेंबर रोजी पैठण तहसील कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी तहसीलदार सावंत यांनी त्यांच्या कार्यालयातच अ‍ॅड. कैलास लिपने पाटील आणि बद्री यांच्या उपस्थितीत लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून एक लाख रुपये घेतले. लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपींना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*