अबब.. एकाच झाडापासून मिळतात चक्क १९ किलो टोमॅटो..!

जागतिकीकरणाच्या या बहुरंगी व बहुढंगी काळाने अनेकांसाठी वेगवेगळी दालने खुली केली आहेत. तर, काही क्षेत्रात त्याचा फटकाही बसत आहे. असे फटका बसणारे क्षेत्र म्हणजे शेती. मात्र, अशावेळी रडून नाही, तर लढून शेती करावी लागणार आहे. त्यासाठी कमी खर्चात अधिक उत्पादन घेतानाच चांगला भाव मिळण्यासाठीच्या संधी शोधाव्या लागतील. असेच शेतकरी या काळात आर्थिकदृष्ट्या सधन बनतील. त्यालाच बळ देण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हाॅर्टिकल्चर रिसर्च (बंगलोर) या संस्थेने अधिकचे उप्तादन देणारी टोमॅटोची जात विकसित केलेली आहे. तिचे नाव आहे अर्का रक्षक (ARKA RAKSHAK). या जातीचे एकच झाड १९ किलोपर्यंत उत्पादन देत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग

अर्का रक्षक ही जात काही फ़क़्त जास्तीचे उत्पादन देण्यासाठीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत नाही; तर टोमॅटो पिकावर येणाऱ्या लीफ कर्ल व्हायरस, बॅक्टेरिअल विल्ट आणि अर्ली ब्लाईट यां तीन रोगांना ही जात प्रतिकारक्षम आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये टोमॅटोचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, वाढती रोगराई आणि अवेळी पडणारे भाव यामुळे या भागातील उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. अशा शेतकऱ्यांना अर्का रक्षक या जातीच्या टोमॅटोमुळे फायदा होऊ शकतो.

२०१३ मध्ये ही व्हरायटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हाॅर्टिकल्चर रिसर्च या संस्थेने शेतकऱ्यांसाठी खुली केली आहे. त्यावेळी या व्हरायटीला अनेक पुरस्कार मिळाले होते. तसेच याची दखल घेऊन द हिंदू या इंग्रजी दैनिकाने त्यावर स्पेशल रिपोर्ट छापला होता. तर, एनडीटीव्ही या वाहिनीने स्पेशल रिपोर्ट ब्रॉडकास्त केला होता. आताही दक्षिण भारतात ही व्हरायटी किंवा यावरून इतर नावाने काही खासगी कंपन्या बियाणे विक्री करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*