Blog | गव्हाची उशिरा पेरणी

महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात बागायती वेळेवर ( १ ते १५ नोव्हेंबर) तसेच उशिरा( १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर) पेरणीसाठी सरबती गव्हाचा फुले समाधान ( एनआयएडब्लू १९९४) हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. वेळेवर पेरणीखाली उत्पन्न ४६.१२ क्विंटल प्रति हेक्टर तर उशिरा पेरणीखाली उत्पन्न ४४.२३ क्विंटल/हेक्टर मिळते. तांबेरा रोगास तसेच मावा किडीस देखील प्रतिकारक्षम, टपोरे व आकर्षक दाणे, हजार दाण्याचेवजन ४३ ग्रॅम, प्रथिनांचे प्रमाण १२.५ ते १३.८ टक्के, चपातीची प्रत उत्कृष्ठ व प्रचलित वाणांपेक्षा सरस, प्रचलितवाणांपेक्षा ९ ते १० दिवस लवकर येतो.

लेखक : डॉ. आदिनाथ ताकटे, मो.९४०४०३२३८९ (मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)

बागायती गव्हाची वेळेवर पेरणीसाठीची नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली तरी काही कारणांमुळे पेरणीची वेळ पाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. ऊस तोडणीनंतर, तसेच खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते.महाराष्ट्रात असे उशिराचे क्षेत्र जवळपास ३० टक्के एवढे असते. या वर्षी त्यात निश्चितच वाढ होईल. यंदाच्या वर्षी परतीचा पाऊस लांबल्याने, जमिनीत वाफसा येण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरण्या लाबंल्या आहेत. बागायत उशिरा पेरणीची शिफारसही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे.मात्र काही शेतकरी १५ डिसेंबरनंतरही गव्हाची पेरणी करतात.

वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी २.५ क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते. गव्हाच्या पिकाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.तसेच दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.

गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी निफाड ३४ (एनआयएडब्लू-३४), एकेएडब्लू-४६२७ किंवा फुले समाधान एनआयएडब्लू १९९४ या सरबती जातींची लागवड करावी. बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या ह्प्त्यासह दोन चाद्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ से.मी.अंतरावर पेरावे.पेरणी करतेवेळी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश (४०:४०:४०) म्हणजेच ८७ किलो युरिया,२५० किलो सिंगल सिंगल सुपर फॉसपेट व ६७ किलो किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे. उर्वरित नत्राचा हप्ता ८७ किलो युरिया खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी दयावा.

पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ से.मी खोल करावी.त्यामुळे उगवण चांगली होते.पेरणी उभी-आडवी अशी दोन्हीबाजूने न करता ती एकेरी करावी.म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते.बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते.जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत. बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यानी खुरपणी करावी.पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही.पिकांची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते.तसेच वाढते मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकांचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो.

जमिनीत कायमस्वरूपी ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवा राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने (१५ दिवसांनी) योग्य मात्रेत पाणी दयावे. तापमान कमी राहण्यासाठी गव्हासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषार सिंचनाने शेवटचे पाणी ८० ते ८५ दिवसा दरम्यान दयावे.बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात. जर एकच पाणी देण्याइतके उपलब्ध असेल,तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी गव्हास पाणी दयावे. दोन पाणी देण्याइतका पाणीसाठा उपलब्ध असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी दयावे.तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल तर पहिले पाणी २० ते २२, दुसरे ४२ ते ४५ व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी दयावे.अशा रीतीने सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गव्हाचे ऊत्पादन घ्यावे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*