जागतिक मृदा दिन | तर आपणही होऊ शकतो सत्वहीन..!

अशी आहे महाराष्ट्रातील मातीच्या आरोग्याबाबत सद्य स्थिती :
१) सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी- (सर्व-जिल्हे)
२) नत्राचे प्रमाण कमी (१० जिल्हे)
३) स्फुरदाचे प्रमाण कमी (२३ जिल्हे)
४) पालाशचे प्रमाण अधिक (सर्व जिल्हे)
५) लोहाचे प्रमाण कमी (२३ जिल्हे)
६) जस्ताचे प्रमाण सर्वात कमी (२८ जिल्हे)

लेखक : डॉ. आदिनाथ ताकटे, मो.९४०४०३२३८९ (मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)

गेल्या ५० वर्षात रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अनिर्बंध वापर झाला.त्यामुळे लाखो हेक्टर जमिन नापीक झाली.रासायनिक खतांच्या वापरामुळे मोठा फायदा होतो असे प्रारंभी दिसले खरे, परंतु लहान मुलांची प्रकृती लक्षात न घेता खाद्य पदार्थाचा आणि विटामिन्स चा मारा केला तर त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत जाते तसाच काहीसा प्रकार शेतजमिनीच्या बाबतीत झाला. जमीन सुधारण्याऐवजी, जादा उत्पादन मिळण्याऐवजी पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त खत दिल्यामुळे जमिन बिघडली.उत्पादन कमी येऊ लागले, त्याचबरोबर खरोखरच आवश्यक असलेल्या सेंद्रिय खतांकडे दुर्लक्ष झाले.पाटाचे पाणी परत केव्हा मिळेल याची खात्री नसल्यामुळे, मिळाले कि पिकाला आवशक नसतानांही जड पाणी दिल्याने क्षाराचे प्रमाण वाढत गेले. त्या जमिनीत पिक येईनासे झाले.जमीन नापीक झाली,क्षारपड झाली.खते आणि पाणी यांच्या अधिकाधिक वापराने अधिकाधिक उत्पादन घेण्याची हाव नडली.अतिरेक अंगलट आला.हरितक्रांतीच्या यशाच्या नादात शेतजमिनीचे आजारपण फार उशिरा लक्षात आले.दोहन ऐवजी जमिनीचे शोषण झाले. अशा निसत्व केलेल्या
जमिनीतून येणारे पीकही सत्वहीन झाले. त्यावर जगणारे आपणही सत्वहीन झालो तर नवल कसले

देशाच्या लोकसंख्येत होणारी झपाट्याने वाढ,या वाढत्या लोकसंख्येचा शेती क्षेत्रावर पडणारा भार, वाढते शहरीकरण,उद्योग-व्यवसायाकरिता याकरिता शेतजमिनीचा वापर यामुळे लागवड योग्य क्षेत्रात घट होत आहे. जागतिक हवामान बदलात होणारी गारपीट,थंडी,अवकाळी पाऊस,तापमानातील चढ–उतार यामुळे मातीवर परिणाम होत आहे.अमर्याद सिंचन,रासायनिक खते,किडनाशकाच्या अमर्याद वापराने माती प्रदुषित होत आहे.जमिनीची धूप होऊन सुपीक मातीचा थर वाहून जातोय. एकीकडे लागवड योग्य क्षेत्रात अनेक कारणांनी होत असलेली घट,जमिनीचा खालावत चाललेला पोत हे आजच्या शेतीसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे शेती टिकवायची असेल तर माती जिवंत राहिली पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघाने २०१५ हे वर्ष “जागतिक मृदा वर्ष म्हणून घोषित केले होते.त्याच बरोबर ५ डिसेंबर हा दिवस “जागतिक मृदा दिन” म्हणून गेल्या पाच वर्षापासून साजरा होत आहे.या पाठीमागील प्रमुख उद्देश जमिनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यावरील उपाययोजना या संदर्भात शेतकरयामध्ये
जाणीव निर्माण करणे.

सद्य परिस्थितीत मातीच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने जमिनीच्या सुपिकतेवर आणि
उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. दर वर्षी हेक्टरी १६ टन माती वाहून जात आहे. जमिनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण अत्यंत कमी (०.०३ टक्क्यापर्यंत) झाले आहे.यामुळे मातीमध्ये विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते.याचा विपरीत परिणाम मानवांच्या,जनावरांच्या आणि सुक्ष्मजीवांच्या आरोग्यावर होत आहे.जागतिक स्तरावर या बाबींची प्रकर्षाने नोंद घेतली गेली आहे.अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न या दोहोमध्ये संतुलन साधण्याकरिता मातीचे आरोग्य जपावेच लागेल.याकरिता येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थाचा वापर करावयास हवा.पीक उत्पादनाकरीता जमिनीची ऊत्पादनक्षमतेनुसार,काटेकोर आणि कार्यक्षम वापर होणे गरजेचे आहे. यासाठी माती आणि पाणी परिक्षण करून त्या नुसार रासायनिक खतांचा वापर व्हायला हवा. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची आरोग्यपत्रिका तयार करून घेणे आवश्यक आहे.

वाढत्या लोकख्येसाठी पुरेशा अन्नधान्याचे उत्पादन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. अन्नधान्य हि
सकस असले पाहिजे.याबाबतीत स्वावलंबी होणे हि जरुरी आहे.त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होत आहेत. शासन हि सतर्क झाले आहे.जमिनीत काय कमी आहे हे आजमावत रासायनिक खतांचा आणि पाण्याचा मारा करण्यापूर्वी झालेली चूक परत होऊ नये म्हणून जमिनीची तपासणी करून सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा तपासणीमुळे जमिनीत काय कमी आहे आणि किती कमी आहे हे आजमावता येते आणि ते व तेवढेच देण्याच्या प्रयत्न करता येतो.

शेती व्यवसायामध्ये सुपिक जमिनीस अत्यंत महत्व आहे.म्हणून शेतकऱ्याने आपल्या जमिनी विषयीची सखोल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. आपली जमिन कशी आहे, पाणी कसे आहे, त्यानुसार कोणते पीक घेतले पाहिजे.त्या पिकास कोणत्या अन्नद्रव्यांची केंव्हा आणि किती प्रमाणात गरज आहे. जमिनीत किती प्रमाणात अन्नघटक उपलब्ध आहेत.भरपाई कोणत्या खतामधून भागविता येईल याचा विचार करतांना जमिनीचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे.त्या याचाही विचार करणे आवश्यक आहे.यशस्वी शेतीचे रहस्य प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादनक्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे.म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची आरोग्यापत्रिका तयार करून घेतली पाहिजे.

पिकाचे अस्तित्व, मातीच्या आणि पाण्याच्या स्वाथ्यावरच अवलंबून असते. आपले आरोग्य दीर्घकाळ, निरोगी राहण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडे सर्व चाचण्या करून त्याप्रमाणे शरीर सुदृढ ठेवतो,तसेच नियमित माती पाणी परिक्षण ही नियोजनबद्ध,किफायतशीर शेतीची गुरुकिल्ली आहे. आधुनिक शेतीमध्ये अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने या ठिकाणी माती व पाणी परीक्षणाचे महत्व अन्यन्य साधारण झालेले आहे.माती परिक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या
मात्रेत बचत तर होतेच त्याचबरोबर प्रमाणशीर खतांची मात्रा देता येते.त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढविता येते. तसेच जमिनीचे आरोग्य चिरकाल टिकविण्यासाठीसुध्दा मदत होते.

जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी भौतिक,रासायनिक,जैविक गुणधर्मांचे संवर्धन करावे लागते. शाश्वत शेतीमध्ये पिकांचे फायदेशीर उत्पादन घेऊन सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करून जमिनीची सुपिकता टिकविली जाते.ही जमिनीची सुपिकता आजमिविण्यासाठी मातीची तपासणी करणे आवश्यक आहे.

खत व्यवस्थापनामध्ये माती परिक्षणास अनन्य साधारण महत्व आहे. पिकाच्या संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी नत्र,स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांसोबत सुक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता असते.परंतु गरज असल्यास माती परिक्षणानुसार त्यांचा पुरवठा करता येतो. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खत मात्रा देखील कमी जास्त करता येते त्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांचे किफायतशीर उत्पादन घेता येते.त्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांचे किफायतशीर उत्पादन घट येते. तसेच अति रासायनिक खते वापरण्यामुळे होणारा शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा टाळता येतो व जमिनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवता येते.

माती परिक्षणामुळे जमिनीच्या भौतिक,रासायनिक,जैविक गुणधर्मांचा अंदाज येतो. जमिनीच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सामू,विद्राव्य क्षार,उपलब्ध नत्र,स्फुरद,पालाश,सेंद्रिय कर्ब,चुनखडीचे प्रमाण इत्यादी माहिती मिळते. जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण व सामू द्वारे जमिन क्षारयुक्त किंवा चोपण झाली आहे का? याची ढोबळमानाने कल्पना करता येते.जमिन क्षार व चोपणयुक्त झाली असल्यास सेंद्रिय खतांचा व भूसुधारकाचा वापर करणे सोयीचे ठरते.जमिनीच्या भौतिक गुणधर्माद्वारे जमिनीचा पोत, चिकण मातीचे प्रमाण,पाणी धरून ठेवण्याची क्षमता, घनता, पाणी मुरण्याचावेग, निचऱ्याची क्षमता इत्यादी बाबींची माहिती मिळते. तर जैविक गुणधर्मामुळे उपयुक्त तसेच रोगकारक जीवाणूंची चाचणी करता येते.

माती परिक्षणावर प्रमुख घटकांमध्ये मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे. माती नमुन्यांचे प्रयोगशाळेत निरीक्षण करणे.माती परिक्षणावर अहवाल तयार करणे. पिकांसाठी खतांच्या शिफारशी ठरविणे.क्षार व चोपणयुक्त जमिनी सुधारण्यांचे उपाय सुचविणे इत्यादींचा समावेश होतो. राज्यातील कृषि विभागाच्या मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा विभागातर्फे मागील वर्षी घेण्यात आलेल्या माती तपासणीनुसार राज्यातील १० जिल्ह्यात नत्राचे प्रमाण कमी, २४ जिल्ह्यात स्फुरदाचे प्रमाण कमी,सर्व जिल्ह्यात पालाशचे प्रमाण अधिक तर २३ जिल्ह्यात लोहाचे प्रमाण कमी, तर २९ जिल्ह्यात जस्ताचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यात कृषि विभागाने माती परीक्षणाची सोय सर्व जिल्ह्यांची मुख्यालयी केलेली आहे. याशिवाय कृषि विद्यापीठे,कृषि विज्ञान केंद्रे,साखर कारखाने रासायनिक खत उत्पादन संस्था व खाजगी संस्थांद्वारे माती परिक्षण प्रयोगशाळा राज्यात सर्वत्र उपलब्ध आहे. शेतकरी बंधुनो या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो की हंगामापूर्वी तसेच नवीन फळबागा पिकांचे नियोजन करताना माती परिक्षण करूनच खतांचे व्यवस्थापन करावे व आपली लाख मोलाची जमिन चिरकाल,चिरंजीवी व शाश्वत ठेवावी.अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न या दोघांमध्ये संतुलन साधण्यासाठी मातीचे आरोग्य जपावेच लागेल. माती जिवंत असेल तर शेती जिवंत राहील. जागतिक मृदादिनाच्या सर्वांना शुभेछा !

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*