Blog | त्यासाठी वेळ उरलाच आहे कुठे…?

सध्या स्पेन देशातील माद्रिद येथे जगभरातील पर्यावरण प्रतिनिधी पृथ्वीचे काय होणार आणि भविष्य सुखकर राहण्यासाठी काय करण्याची गरज आहे, यावर मंथन करीत आहेत. त्यातील जागतिक राजकारण कुरघोडीच्या अत्युच्च टप्प्यावर आहे. तर, युरोपने औद्योगिक क्रांती करून तापमान वाढीला हातभार लावून आता कसा इतरांच्या विकासाला ब्रेक लावला आहे, याच्या सोशल मिडिया पोस्ट भारतात व्हायरल केल्या जात आहेत. अमेरिकेसारखा देश हवामान बदलास भारत, ब्राझील, चीन व रशिया यासह इतर देश जबाबदार असल्याचे सांगून साळसूदपणे आव आणीत आहे. तर, युरोपीय देश आता हवामान बदल नाही, हवामान आणीबाणी लागू झाल्याचे सांगून यावर तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी आग्रही आहेत.

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग

भारतामध्ये यंदा मान्सूनच्या काळामधील आणि त्यानंतरच्या पावसाळी घडामोडी आणि विचित्र वातावरणीय बदल आपण अनुभवले आहेत. आपल्याकडे उशिरा दाखल झालेला आणि नंतर साधारणपणे नोव्हेंबरपर्यंत रेंगाळलेला मान्सून अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरला. पूरपरिस्थिती आणि अवकाळी पावसाचे नुकसान यामुळे भारताला चालू वर्षामध्येच किमान पाच लाख कोटींचा फटका बसलेला असेल. त्यातच साठीचे रोग वाढत आहेत.  हे सगळे तात्कालिक परिणाम नसून वातावरणात झालेल्या बदलांचे पडसाद आहेत. नव्हे ही पर्यावरणीय बदलाची आणीबाणी स्थितीच आहे. भारतात नाही, तर जगभरात वातावरण बदलाचे पडसाद विध्वंसक पद्धतीने जाणवत आहेत. सध्या सुरु असलेल्या जागतिक हवामान संघटनेच्या प्राथमिक अहवालातही हेच नमूद करण्यात आले आहे. मंगळवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या  हवामान परिषदेत याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला. अंतिम आकडेवारीसह याचाच सविस्तर अहवाल मार्च २०२० मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. त्या अहवालातून जगाचे काय चित्र समोर येणार याचीच धाकधूक आहे.

भारतासह मध्य अमेरिका, उत्तर कॅनडा, उत्तर रशिया, नैऋत्य आशियाई देश, उत्तर अर्जेंटिना, उरुग्वे, दक्षिण ब्राझील येथील पूरस्थिती अनेक जीवांसाठी घातक ठरली. आग्नेय आशिया व नैऋत्य पॅसिफिक भागात दुष्काळी परिस्थिती तर, युरोपमध्ये उष्णतेची लाट आली होती. आपल्याकडेही आत्ता ऐन हिवाळ्यात उष्णता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. तर, साठीचे रोग व इतर आजारांमुळे फ़क़्त मनुष्य नाही, तर प्राणी आणि वनस्पती रोगग्रस्त झालेल्या आहेत. यंदा फ्रान्स या आल्हाददायक देशात कमाल तापमान ४६ अंश नोंदवले गेले. तर, युरोपातील जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, ब्रिटनमध्येही स्थानिक कमाल तापमानाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वर्षभर पाउस पडतो. मात्र, त्याच ऑस्ट्रेलियन नागरिकांनी कधीही अनुभवलेला उन्हाळा अनुभवला आहे. वातावरणातील बदलांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम दिसत आहेत. साथीच्या रोगांमुळे नागरिकांचा आरोग्यावरील खर्च वाढत आहे. शेती कीड-रोगाच्या फेऱ्यात अडकल्याने अन्नधान्याच्या उपलब्धतेवरही विपरीत परिणाम होत आहेत. २०१९ मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे जपानमध्ये १०० पेक्षा अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. येथेच सुमारे १८ हजार नागरिक रुग्णालयात दाखल केल्याने वाचले. स्पेन, फ्रान्स, नेदरलँड्समध्ये हजारो नागरिकांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. तापमानातील बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सायबेरिया, अलास्का, इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या अॅमेझॉन जंगलात आगीच्या घटना वाढल्या आहेत. दक्षिण अगीसह चक्रीवादळाचेही प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जानेवारी ते जून या कालावधीत १ कोटी लोकांचे विस्थापन झाले तर ७० लाख नागरिक फणी चक्रीवादळ, इराण, फिलिपाइन्स, इथियोपियामधील पुरामुळे बाधित झाले. ही संख्या दोन कोटींहून अधिक होण्याचा अंदाज आहे. अहवालानुसार जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीतील सरासरी तापमान हे औद्योगिक क्रांती होण्यापूर्वीच्या तापमानापेक्षा १.१ अंश सेल्सिअसने अधिक आहे. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड या वायूचे प्रमाण वाढत आहे. समुद्राच्या पातळीत सातत्याने वेगाने वाढ दिसत आहे. ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका येथील बर्फाचे आच्छादन वितळत आहे. समुद्री जीवांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*