शेतीच्या या विषयात भारत देश चीन-पाकिस्तानच्याही आहे पुढे..!

लोकसंख्येच्या आणि एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत चीन देश भारताच्या पुढे आहे. तसेच शेतीची उत्पादकता आणि आर्थिक क्षेत्रातही चीन भारताच्या बराच पुढे आहे. मात्र, जनुकीय सुधारित बियाणे (जीएम क्रॉप) वापरण्याच्या बाबतीत भारत देशाने चीन आणि पाकिस्तानच्या पुढे मजल मारली आहे. जगातील सर्व देशांमध्ये याबाबतीत भारत पाचव्या स्थानावर आहे.

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग

भारतात फ़क़्त कापूस पिकामध्ये जीएम बियाणे वापरण्यास परवानगी आहे. बीटी कॉटन हा देशभरात आता स्थिरावला आहे. अशावेळी एचटीबीटी कॉटन आणि बीटी ब्रिंजल (वांगे) मात्र अजूनही प्रायोगिक तत्वावर लागवडीसही खुले करण्याचे औदार्य केंद्र सरकारने दाखवून दिलेले नाही. स्वदेशीवाले आणि काही सामाजिक-राजकीय संघटनांच्या विरोधामुळे कापसातील आधुनिक जीएम तंत्रज्ञान आणि वांगे, सोयाबीन, कापूस यामधील जनुकीय सुधारित बियाणे अजूनही भारतीय शेतकऱ्यांसाठी खुले झालेले नाहीत. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्यांनी मात्र या तंत्रज्ञानाला आपलेसे करीत नफ्यातील शेती करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामुळेच एकट्या कपाशीच्या (बीटी कॉटन) जीवावर भारत जगात असे तंत्रज्ञान सुधारित बियाणे लागवडीसाठी वापरणाऱ्या देशांमध्ये पाचव्या स्थानावर पोहचला आहे.

२०१७ पर्यंतची अशा पद्धतीने लागवड केलेल्या पिकाची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. त्यानुसार अमेरिका एकूण जनुकीय सुधारित पिकांच्या लागवडीत अग्रस्थानी आहे. अमेरिकेत सोयाबीन, मका, कापूस आणि अल्फाअल्फा या पिकाच्या जनुकीय सुधारित बियाणांची पेरणी व लागवड केली जाते. अशावेळी भारतीय शेतकरी मात्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे आधुनिक बियाणे तंत्रज्ञानापासून वंचित राहिलेला आहे.

जगभरातील जीएम सीड वापरणाऱ्या पहिल्या दहा देशांची नावे व त्यांच्याकडील अशा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र असे : अमेरिका ७.५ कोटी हेक्टर, ब्राझील ५.०२ कोटी हेक्टर, अर्जेंटिना २.३६ कोटी हेक्टर, कॅनडा १.३१ कोटी हेक्टर, भारत १.१४ कोटी हेक्टर, पराग्वे ३० लाख हेक्टर, पाकिस्तान ३० लाख हेक्टर, चीन २८ लाख हेक्टर, दक्षिण आफ्रिका २७ लाख हेक्टर, बोलाविया १३ लाख हेक्टर, उरुग्वे ११ लाख हेक्टर आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*