जीएम टेक्नोलॉजी | बायोटेक क्रॉप म्हणजे सर्वाधिक वेगाने वाढणारे तंत्रज्ञान

सध्या भारतासह जगभरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकजण कुपोषणाच्या दुष्टचक्रात अडकलेले आहेत. अशा सर्वांना जगण्यासाठी पोटभर अन्न देण्याचे कर्तव्य कोणताही देश पूर्ण क्षमतेने पार पडताना दिसत नाही. हाताला काम आणि पोटाला भाकरी देण्याच्या मुद्यावर मानवता खोळंबली आहे. त्याचवेळी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठीचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. अशावेळी गरिबांच्या आफ्रिकेसह तुलनेने श्रीमंत वाटणाऱ्या अमेरिकेतही आता जीएम (जेनेटिकली मॉडीफाईड) क्रॉप टेक्नोलॉजी अर्थात जनुक सुधारित किंवा अनुवंशिकरित्या सुधारित पिकाची व्यापारी दृष्टीने लागवड वाढत आहे. नव्हे, आधुनिक शेतीच्या या काळात शेतीमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारे तंत्रज्ञान म्हणून आता जीएम पिकांची ओळख आहे. शेतकरी या तंत्रज्ञानाला आपलेसे करीत असतानाच स्वदेशीवाले मात्र, त्यात खोडा घालून शेतकऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी आग्रही आहेत..

लेखक : सचिन मोहन चोभे (संपादक, कृषीरंग) मो. ९४२२४६२००३; इमेल krushirang@gmail.com

१९९६ मध्ये या तंत्रज्ञानाच्या बियाण्यांचा व्यापारी तत्वावर लागवडीसाठी वापर झाला. तेंव्हापासून आतापर्यंत (२०१९) २३ वर्षांमध्ये जगभरातील ७० देशांनी या तंत्रज्ञानाने विकसित अधिक उत्पादन देणाऱ्या किंवा कीडरोगास कमी बळी पडणाऱ्या पिकाच्या लागवडीसाठी किंवा त्याद्वारे उत्पादित अन्नपदार्थ खाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. युनायटेड नेशन्सने जाहीर केलेल्या अहवालानुसार जगात सध्या ४८ देशांमध्ये कुपोषणाच्या पातळीने उग्र आणि गंभीर रूप धारण केलेले आहे. त्याचवेळी विकसित म्हणवून घेणाऱ्या किंवा भारतासारख्या विकसनशील देशांमध्येही कुपोषणाचे संकट आहे. म्हणजे जगातील ३० टक्के लोकसंख्या पोटभर खात असतानाच इतरांना पोषणासाठीचे अन्न मिळण्याची अडचण कायम आहे. हेच चित्र बदलण्यासाठी आता ब्राझील देशासह आफ्रिका खंडातील देशांनी जीएम पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिलेले आहे.

माहितीचे स्त्रोत : गुगल सर्च इंजिन, जेनेटिक लिटरसी प्रोजेक्ट, ISAAA.ORG आदि.

सुरुवातीला फ़क़्त १.७ मिलियन हेक्टरवर जीएम पिकाची लागवड झालेली होती. मात्र, आता ७० देशांनी या तंत्रज्ञानाला मान्यता देत यामध्ये येणारे नवे तंत्रज्ञान वापरून याच पिकाच्या लागवडीखाली क्षेत्र १३० पटीने वाढले आहे. सध्या (२०१८) जगभरात १९१.७ मिलियन हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रावर जीएम पिकाच्या सुधारित वाणाची लागवड होत आहे. युरोपमध्येही हे तंत्रज्ञान काहीअंशी खुले झाल्याने आता जगातील इतर देशही या तंत्रज्ञानाच्या विरोधी काम करणाऱ्या संस्था आणि आंदोलकांना याबाबत आश्वस्त करण्यासाठी काम करीत आहेत. अशावेळी भारत मात्र, हे तंत्रज्ञान वापरणे आणि त्याच्या किमान चाचण्या घेण्यासाठीही हात आखडता घेत असल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या मंडळींनी वेळोवेळी आंदोलन करून शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे. त्याला यश आल्यास भविष्यात भारतही कुपोषणमुक्त होईल अशीच अशा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*