दूध, अंडी, मांस, लोकर उत्पादन वाढविण्यासाठी सरकारची नवीन योजना

मुंबई :

राज्यात दूध, अंडी, मांस व लोकर उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबवावी, यामुळे राज्यात असणारी दूध, अंडी आणि मांसाची तूट भरून निघेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागांचा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज झाली. यावेळी श्री.ठाकरे बोलत होते.

श्री. ठाकरे म्हणाले, पशुपैदास धोरण राबवतांना कृत्रिम रेतनाव्दारे पशुधनामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा. पशुधनाचे रोगराईपासून संरक्षण करून जास्त दूध उत्पादन, अंडी उत्पादन, मांस, लोकर ही पशुजन्य उत्पादने वाढवावीत. ग्रामीण गोरगरीब शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे, शेळी गट, कुक्कुट पक्षी वाटप करून पूरक उत्पन्नाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे. पशुधनास लागणारे वैरण व पशुखाद्याची उपलब्धता वाढवावी. पशुधनास लागणाऱ्या लसींची निर्मिती करावी अशा सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या.

            लिंग वर्गीकृत मात्रांची निर्मिती करून त्याचा वापर करून ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करावी. राज्यात वराह मांसाचे मागणी जास्त असून यासाठी अधिक उत्पादनाच्या विदेशी वराह पालनासाठीची योजना राबविण्यात यावी. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची व्यापकता वाढवावी, असेही ते यावेळी म्हणाले.

कोकणातील आनंदवाडी मत्स्य प्रकल्पाप्रमाणे राज्यात प्राधान्यक्रम ठरवून त्यांचा आराखडा तयार करावा. मत्स्य प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात याव्यात. तसेच मासेमारीसाठी एलईडीचा वापर टाळण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

क्षेत्रीय स्तरावरील कृषी विकास योजनांमधून योजना सादर करून निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी केली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेळी-मेंढी यांची रोगराईने होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी नवीन योजनेचा विचार करण्याची सूचना केली.

दुग्धव्यवसाय विकास विभागाचा आढावा घेताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, दुग्धव्यवसाय विभागाच्या मालमत्तांचा सविस्तर अहवाल सादर करावा. दूध प्रकल्प बंद असलेल्या ठिकाणी आधुनिक दूध प्रकल्प सुरू करण्यासाठी आराखडा तयार करावा.

या बैठकीस पशुसंवर्धन, व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, मत्सव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख, पदुम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, परिवहन आणि संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीस पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त राजू जाधव, पशुसंवर्धन आयुक्त नरेंद्र पोयाम, पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. धनराज परकाळे, शेळी मेंढी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश बनसोडे, सहसचिव माणिक गुट्टे उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*