सुंदर गावांचा होणार आबांच्या नावे गौरव..!

आर. आर. पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या काळामधील क्लीन इमेजवाला नेता. अशीच आबांची ओळख होती. ते फ़क़्त क्लीन नव्हते, तर विकासाच्या प्रक्रियेला गतिमानता देणारे नेतेही होते. मात्र, २०१५ मध्ये कर्करोगाच्या दुर्घर आजारामुळे आबा आपल्या सर्वांना पोरके करून गेले. त्यामुळे ग्रामीण विकासाच्या गतीला ब्रेक मिळाला. मात्र, आता हाच ब्रेक हटवून पुन्हा एकदा ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आबांच्या नावाने योजना आणली आहे. विधिमंडळात त्याची घोषणा मंत्री मुश्रीफ यांनी केली. त्याबाबत थोडक्यात..

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग

ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत केली. ही गरज होती. कारण, राज्याच्या ग्रामीण विकासाला आताच्या काळात अशाच प्रेरणादायी व आश्वासक कामाची गरज आहे. आबा आठवले की त्यांच्या ठोस व दिशादर्शक योजनाही अपोआपच आठवतात. डान्सबार बंदी, तंटामुक्त ग्राम योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अशा प्रभावी व ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या योजना आबांनी आणल्या आणि धडाक्यात राबवल्या. आताही अशाच पद्धतीने या विकासाला गती देण्यासाठी पक्षाचे नेते शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काम सुरू केले आहे. मंत्री मुश्रीफ यांनी या योजनेची घोषणा करून हाच संदेश दिला आहे.

ग्रामविकास विभागाकडून नोव्हेंबर २०१६ पासून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतात. ही योजना आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ म्हणून राबविली जाईल. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. तसेच त्यांनी  राज्यात ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरु करुन त्या प्रभावीपणे राबविल्या. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन स्मार्ट ग्राम योजनेस त्यांचे नाव देण्यात आले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*