दुधाची भुकटी करण्यासाठी १८७ कोटीच्या खर्चास मान्यता

मुंबई :

करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरित परिस्थितीतही राज्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी प्रतिदिन १० लक्ष लिटर दूधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी येणाऱ्या १८७ कोटी इतक्या खर्चास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली.

संपूर्ण जगात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम दिसून आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण देशामध्ये २४ मार्च पासून लॉकडाऊन घोषित केला आहे.  लॉकडाऊनमुळे बाजारात पिशवीबंद दूधाच्या मागणीत घट झाली असून हॉटेल, रेस्टारंट व मिष्ठान्न निर्मिती केंद्र मोठ्याप्रमाणात बंद झाली आहेत. परिणामी राज्यातील दूधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दुग्धोत्पादक शेतकऱ्यांपुढे अतिरिक्त दूधाचा प्रश्न निर्माण झालेला होता.

अतिरिक्त दूधाचे नियोजनावर चर्चा करण्यासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार  अध्यक्षतेखाली ३१ मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (पदुम), आयुक्त, दुग्धव्यवसाय, व्यवस्थापकीय संचालक, महानंद व इतर अधिकारी उपस्थित होते.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) यांनी  राज्यातील प्रतिदिन १० लक्ष लिटर अतिरिक्त होणाऱ्या दूधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.  बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांच्या मान्यतेने प्रतिदिन १० लक्ष लिटर दूधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी रु.१८७ कोटी निधीची मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाच्या अनुषंगाने अतिरिक्त दूधापैकी प्रतिदिन १० लक्ष लिटर दूधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी रु.१८७ कोटी निधीची तरतुद करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*