Blog| राष्ट्रीय फलोत्पादनाचे जनक – पवार साहेब

राजकीय असो की सामाजिक जीवन असो. त्यामध्ये सगळ्यांना कोणी ना कोणी गुरू असतोच. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे गुरू म्हणजे आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. पवार साहेबांच्या याच कामावर आधारित खास लेखमाला मंत्री आव्हाड यांच्या फेसबुक पेजवरून सुरू झालेली आहे. आम्ही ती वाचकांसाठी जशीच्या तशी प्रसिद्ध करीत आहोत. @टीम कृषीरंग

साहेब_माझा विठ्ठल
भाग – 05

राष्ट्रीय फलोत्पादनाचे जनक – पवार साहेब

देशातील लहरी हवामान,अनियमित आणि अपुरा पाऊस, सिंचन व्यवस्थेला असणारी मर्यादा आणि शेतीवर अवलंबून असणारी मोठी लोकसंख्या; यांचं गणित कसं सोडवायच? हा प्रश्न या देशातील अनेक कृषितज्ञांना आणि राज्यकर्त्यांना पडलेला होता. देशात यावर अनेक प्रयोग करून झाले. पण उत्तर मात्र काही सापडत नव्हतं.

मात्र १९९० साली हा प्रश्न एका माणसाने सोडवला. नुसताच सोडवला नाही, तर नंतर तो दणदणीतपणे देशभर यशस्वीही करून दाखवला. महाराष्ट्रामध्ये भरभरून यश मिळवलेल्या या प्रकल्पाला नंतर देशभरात देखील, “राष्ट्रीय फलोत्पादन अभियान”म्हणून स्वीकारले गेले. या माणसाचे नाव होते, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब !

शेतकऱ्यांच्या पारंपरिक विचारात बदल घडवत, फलोत्पादनाच्या क्षेत्रात राज्याला आणि नंतर देशालाही आघाडीवर नेणाऱ्या कार्यक्रमाचे पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त, पवार साहेबांनाच जाते. त्यानंतर देशातील कृषीशास्त्रज्ञ त्यांना,”हायटेक हिर्टीकल्चर” चे जनक असेही म्हणू लागले.

मुळात साहेबांची नाळ पहिल्यापासूनच शेतीशी जुळलेली आहे. म्हणूनच त्यांना पारंपरिक शेतीतील समस्या माहिती होत्या. त्या दूर करण्यासाठी आणि शेतीक्षेत्राला नवीन जोड देण्याच्या गरजेतूनच, महाराष्ट्रात ‘फलोत्पादन योजना’ जाहीर झाली. या योजनेची कल्पना हीच मूळ पवार साहेबांची आणि हिला पूर्णत्वास देखील नेले ते साहेबांनीच! या योजनेची अंमलबजावणी करत असताना साहेबांचा यात पूर्ण सहभाग होता. म्हणूनच ही योजना क्रांतिकारक देखील ठरली.

१९९०च्या दशकात प्रतिवर्षी सरासरी १ लाख हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आलं. महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी, दलित- आदिवासींकडे असणारी लाखो हेक्टर पडिक जमीन या योजनेमुळे लागवडीखाली आली. सुरवातीला केवळ फलोत्पादन लागवडीने सुरू केलेल्या या योजनेचा विस्तार पुढे दर्जेदार फलोत्पादन, साठवणूक व्यवस्था,वाहतूक यंत्रणा, पणन व्यवस्थेपासून ते पुढे निर्यातीपर्यंत अत्यंत वेगाने झाला.

या फलोत्पादन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता राज्याचे ६ विभाग केले गेले. यात कोकण विभागाला सर्वाधिक महत्व दिले गेले. शेतीची संधी कमी असणाऱ्या या विभागात फलोत्पादनाची मात्र प्रचंड क्षमता होती. तेव्हा ‘आंबा’ एवढीच कोकणची ओळख होती. पण या योजनेमुळे काजू, सुपारी, नारळ याचे उत्पादनही प्रचंड प्रमाणात घेण्यात आले. खानदेशात केळीसोबतच मग मोसंबी आणि लिंबू यांचं विक्रमी उत्पादन घेण्यात आलं. नागपुरात संत्री; तर अहमदनगर, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली या भागात द्राक्ष, डाळिंब,बोर यांचं ‘रेकॉर्डब्रेक’ उत्पादन घेण्यात आले. मराठवाड्यात आंबा आणि मोसंबी ही फळ पिकवण्याचं प्रोत्साहन मोठ्या प्रमाणात देण्यात आलं.

ही योजना इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली की, या योजनेला फलोत्पादन क्षेत्रातील ‘क्रांती’ म्हटले जाऊ लागले. ही क्रांती घडवली ती, पवार साहेबांनीच! या अभियानामुळेच देशातला शेतकरी प्रगत झाला. आपली उत्पादनं निर्यात करू लागला. डॉलरची भाषा बोलू लागला!

(फलोत्पादन योजना आणि रोजगार हमी योजनेबद्दल – पुढील भागात)

#साहेब_माझाविठ्ठल

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*