‘कृषी’ला संजीवनी’ देण्यासाठी आलाय ‘हा’ नवा प्रकल्प; वाचा सविस्तर प्रेसनोट

शेतकऱ्यांना आता घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मिळणार

मुंबई : PressNote

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाईन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलचा शुभारंभ काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. कृषी संजीवनी सप्ताह समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते व कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते.

मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. कोरोना संकट काळात सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होमची सुविधा असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो. या अन्नदात्याला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

शेतीक्षेत्रातही बाजारपेठ संशोधन महत्वाचे आहे त्यामुळे जे विकेल तेच पिकेल या पद्धतीने पिकांचे नियोजन करून राज्यभरातील शेतकऱ्यांना एका छताखाली आणा. यासाठी विभागवार पद्धतीने पिकांचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ

महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. विकसीत तंत्रज्ञानाची जोड प्रयोगशील शेतकऱ्याला दिली तर कमी जागेत भरपूर उत्पादन घेणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

सेंद्रीय शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा

गडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकऱ्याने विषमुक्त शेतीचे महत्व पटवून देतांना सेंद्रीय शेतीतून उत्पादित केलेल्या शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी आपण तत्काळ मान्य करत असल्याचे  मुख्यमंत्री म्हणाले.  प्रयोगशीलतेने शेतकरी काही नवीन उपक्रम राबवित असतील तर त्याला प्रोत्साहन देणारे हे सरकार आहे, आता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. कमी जागेत अधिक उत्पादन घेणारे, अत्याधुनिक पद्धतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शेती करणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. त्यांच्या या मेहनतीला शाश्वती देण्याचे काम करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेताच्या बांधावर जाऊन बोलणारा कृषीमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले की, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलणारा, बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानांवर धाडी टाकणारा कृषी मंत्री  दादा भुसे यांच्यारुपाने राज्याला मिळाला असल्याचे मुख्यमंत्री महणाले. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*