युरियाचा अवाजवी व बेसुमार वापर घातकच; वाचा त्याचे दुष्परिणाम व तोटे

केवळ नत्रयुक्त (युरिया) खतांचा वापर केल्याने पिकांची फक्त शाकीय वाढ होण्यासह रोग व किडीचा प्रादुर्भावही वाढतो. परिणामी उत्पादनात घट होते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा आल्याने खोड नाजूक राहते आणि पिक लोळते. पिकांचा कालावधीही वाढतो.

लेखक : डॉ. आदिनाथ ताकटेमो.९४०४०३२३८९

मृद शास्त्रज्ञएकात्मिक शेती पद्धतीमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर)

युरियाच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. जमिनीतील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर बिघडून सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते. जमिनीमध्ये अमोनिया वायूचे प्रमाण जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टरसारख्या जीवाणूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम दिसतात. गाडूंळाच्या संख्येवरही परिणाम दिसतो. एकूणच जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो.

युरियाच्या अनियंत्रित व अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर (दर्जावर) परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसते. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढून (१० पीपीएम) जलचर प्राण्यांची हानी पोहचते. उलट शेवाळ व पानवनस्पतींची वाढ अशा पाण्यात झपाट्याने होते. युरियाच्या अवाजवी वापरामुळे हवेचेही प्रदूषण होते. कारण, युरियातील अमाइड या नत्राचे रुपांतर अमोनिया आणि नायट्रेटमध्ये होते. नायट्रस ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड यायासारखे नत्राचे वायू हवेचे प्रदूषण वाढवतात. असे वायू कार्बनडायऑक्साइडपेक्षा (CO2) ३०० पटीने घातक आहेत. यामुळे पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन वायुच्या स्तरास छिद्रे पडतात. परिणामी सुर्यापासून उत्पन्न झालेले अतिनील किरणे जमिनीच्या पृष्टभागावर पोहोचतात. आणि एकूण तापमान वाढण्यास मदत होते.

अशा पद्धतीने मानवी आरोग्य व पर्यावरणाला नत्र खतांच्या बेसुमार वापरामुळे हानी पोहचते. हा तसा लांबचा परंतु, लक्ष घेण्याजोगा दुष्परिणाम आहे. मात्र, त्याचवेळी जास्त व बेसुमार पद्धतीने नत्र खतांचा वापर केल्याने पिकावरही दुष्परिणाम होतात. तसेच युरिया खतासाठी जास्त पैसे देऊन झालेला खर्च नफा न देता तोटा वाढवतो. त्यामुळे शेतीचे बजेट कोलमडते. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात माफक प्रमाणात व योग्य गुणोत्तरात युरिया खताचा वापर करावा.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*