गोट फार्मिंग : ‘हे’ आहे बोकड व शेळ्या पैदाशीचे तंत्र; वाचा अन काळजीपूर्वक लक्षही द्या

शेळीपालन व्यवसायाचे तंत्र आणि मंत्र समजून घेण्याच्या या लेखमालेत आज आपण पाहणार आहोत शेळी व बोकड यांच्या पैदाशीचे शास्त्रशुद्ध तंत्र. हे फ़क़्त वाचून घेऊ नका. तर, यानुसार आणि आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने हा मूलमंत्र यशस्वी करून शेळीपालनाद्वारे मस्त नफाही कमवा.

महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता आपल्याकडील शेळ्या वर्षभरात कधीही माजावर येतात. मात्र, एकूण वर्षभराचा आढावा घेतल्यास दिवस लहान आणि रात्र मोठी असणाऱ्या कालावधीत म्हणजे जून ते ऑक्टोबर यादरम्यान शेळ्या माजावर येण्याची टक्केवारी जास्त असते. याचे गणित लक्षात घेऊन शेळीपालकांनी काळजी घ्यावी. तसेच माजावर आलेल्या शेळ्यांना वेळीच जातिवंत अशा पैदाशीच्या बोकडाद्वारे लावून घ्यावे. त्यामध्ये अजिबात हलगर्जीपणा करू नका. कारण, माजाच्या चक्रातील एकवेळ हुकली तर १९ ते २१ दिवस आणखी ती शेळी खाटी राहते. अशावेळी तिला संगोपनाचा खर्च काही कमी होत नाही. परिणामी उत्पादन-खर्च वाढतो.

पुढील तंत्र लक्षात घेऊन पैदाशीचे नियोजन करावे :

  • शेळीचे ऋतुचक्र १९-२१ दिवसांचे असते. त्यावेळी त्या ३६ तास माजावर असतात. मज आल्याचे लक्षात आल्यावर लगेच नाही, तर माज येऊन किमान १० ते १२ तासांचा कालावधी उलटून गेल्यावरच शेळ्या लावाव्यात.
  • एकदा शेळी लावल्यानंतरही जर तिने आपल्या माजाची लक्षणे दाखवली तर अशावेळी पुन्हा एकदा १० तासांनी तीच शेळी बोकडाच्या मदतीने भरून घेण्यास (लावण्यास) हरकत नाही. मात्र, उगीचच वाटते म्हणून असले प्रकार करू नयेत.
  • शेळीचा गाभण असण्याचा कालावधी १४५ ते १५० दिवसांचा असतो. त्यानुसार संगोपनाचे योग्य नियोजन करावे. तिला सकस चारा व पशुखाद्य देऊन गाभण असण्याच्या कालावधीसाठी तयार करूनच पैदाशीचे नियोजन करावे.
  • बोकड जातिवंत बेणुसाठी वापरावा. तसेच असा बोकड किमान १५ महिने वयाचा, तर जास्तीतजास्त ५ वर्षे वयाचाच असावा. एकाच बोकड २ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी वापरू नये.
  • बोकडांचे एकूण आरोग्य उत्तम राखण्याची काळजी घ्यावी. त्याला सकस चारा आणि खुराक द्यावा. तसेच उन्हाळ्यात बोकडांची प्रजननशमता कमी असते. तर, पावसाला व हिवाळा या कमी तापमानाच्या कालावधीत जास्त असते याचे गणित लक्षात घेऊन बोकडाला शेळ्या लावण्यासाठी वापरावे.
  • बोकडाला एका दिवशी एकच शेळी भरण्यासाठी (लावण्यासाठी) वापरावे. एकाचवेळी जास्त शेळ्या भरण्याचा प्रयत्न केल्यास काही शेळ्या खाटया राहण्याची शक्यता असते.
  • मादी करडे साधारणपणे वयाच्या ७-८ महिन्यामध्ये वयात येतात. मात्र, त्यांना आणखी सक्षम करून मग १० महिन्यानंतरच शेळ्या भरण्याचे नियोजन करावे.

(क्रमशः)

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*