होय, गांधी जिवंत आहे आणि राहील…

काल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी यथासांग पार पडली. कोट्यवधी जणांनी या महात्म्याचे स्मरण करून आपला आदरभाव व्यक्त केला. तर, काहींनी नेहमीच्याच थाटात फुत्कारे टाकले. गांधी विचार संपविण्याचा चंग बांधलेली ही ‘देशीप्रेमी’ मंडळी कालही गांधींना मारण्याचा अयशस्वी भाबडा प्रयत्न करीत होती. पण त्यांच्या गोळीने आमचा गांधी मरणार नाही आणि आम्ही त्याला मरूही देणार नाही. कारण, गांधी हा एक सकारात्मक ऊर्जा देणारा विचार आहे, आणि धार्मिक उन्मादी गटाकडे फक्त विंध्वंसक हत्यार आहेत. ज्याच्या वापराने गांधी मरण्याऐवजी पुन्हा आमच्यात नवीन चेतना देत राहील मानवतावादी धर्माची आणि विचारांची…

नेहमीच गांधी विचारांना विरोध करणाऱ्या अखिल भारत हिंदू महासभेने खूप विकृत पद्धतीने कालही महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा शकुन पांडे यांनी महात्मा गांधींच्या पुतळयाला गोळी मारुन पुण्यतिथी साजरी केली. उन्मदही व्यक्त केला. आजच्याच दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या धर्मांध माथेफिरूने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती. पूजा शकुन पांडे यांनी गोळी मारताच पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडे यांनी महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हिंदू महासभेशी जोडलेला होता. ज्या पद्धतीने गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी हिंदुत्ववादी विचारांनी भरलेल्या भगव्याधारी उन्मत कार्यकर्त्यांनी गांधींच्या पुतळ्याला गोळी मारली. अन विकृतीचे दर्शन घडविले. त्यानुसार हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, गांधीजींच्या हत्येनंतर सत्तर दशकानंतरही ‘गांधीवाद’ मात्र ‘अमर’ आहे. मरणाच्या शेवटच्या टप्प्यावर असणाऱ्या, वृद्धापकाळाने थकलेल्या माणसाची सार्वजनिक ठिकाणी गोळी घालून ‘हत्या’ करण्यात त्यात कोणतं ‘शौर्य’ दडलेलं आहे?

अवघं आयुष्यभर ‘राम’ नामाचा जप करणाऱ्या महात्म्याचा ‘नथुराम’ने घात केला. नथुराम समर्थक ‘महात्मा’ अशी स्वयंघोषित उपाधी देऊन घोषणाबाजी करताना दिसून आले. मात्र, महात्म्याची हत्या करून कोणीही ‘महात्मा’ होऊ शकत नाही. जगभरातील जवळपास 150 कोटींहून अधिक जनता आजही स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत. त्यांचीही प्रेरणा गांधीजी आहेत. आपल्या देशातील जनतेला स्वातंत्र्य अनेक स्वातंत्रसैनिकांच्या हौतात्म्यानंतर प्राप्त झाले असले तरी आजच्या आपल्या नव्या पिढीला सगळे फुकटात वारसा हक्काने मिळाले आहे. त्यामुळेच असे निर्बुद्ध गांधीजींबरोबरच इतर महापुरुषांना शिव्यांची लाखोली वाहताना दिसतात.

हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सध्या केंद्रात बहुमतात असल्याने हा सत्तेचा माज त्यांच्या कृत्यात उतरत आहे. गांधीजींचा अवमान हा अवघ्या देशाचा अवमान आहे. महात्मा गांधींच्या विचारांना मानणारा वर्ग जगभरात आहे. आपल्या देशातील माणूस हा एकतर गांधीवादी किंवा गांधीनां न मानणारा अशा दोन गटात विभागला जातो. ज्या माणसाच्या विचार व आचरणातून ‘गांधीवाद’ हा नवा विचारवाद जन्माला येतो, तो इतक्या सहजी नष्ट होऊ शकत नाही. सत्तेचा माज ‘सत्य’ लपवू शकत नाही. अशा पद्धतीचा द्वेष हिंदू डोक्यात भरलेला असेल तर मला आज हिंदू असल्याचीच लाज वाटू लागली आहे. आजपर्यंत सर्वधर्मसमभाव जोपासणारा आणि सहिष्णू असणारा, मानवतावाद अंगी असणारा तो हिंदू, अशी साधी व सरळसरळ व्याख्या आहे. पण आज ज्यापद्धतीने ‘त्यागाचे प्रतिक’ असणारे भगवे, बंदूकधारी शांती व संयमाचा महामेरू श्वेतवस्त्रधारी महात्माजींच्या ‘हत्येचा’ इव्हेंट करताना दिसतात. त्यावेळी मात्र मी आपला ‘सोईस्करवादी’ असल्याचा अभिमान वाटतो.

पूजा पांडे हिच्या या निंदनीय कृत्याचा निषेध करतानाच हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करतो. पण मागणी कोणाकडे करायची आणि ऐकणार कोण, हासुद्धा प्रश्न आहेच की. पण गांधी अमर आहे आणि त्याच्या विचारांनी हजारो पिढ्यांना जगण्याची उर्मी मिळत राहील, याबद्दल शंका नाही. मग सरकारचा छुपा पाठिंबा असलेले माथेफिरू काहीही करोत, आम्ही मानवतावादी याविरुद्ध गांधी स्टाईलने लढणार आणि जिंकणारही…

महादेव गवळी

संपादक, राज्यकर्ता.कॉम

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*