मोहिते पाटील गटाचा साहेबांना विरोध

पुणे :

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची सोलापूर व सातारा जिल्ह्यावरील पकड आणखी पक्की होण्याची भीती असल्याने येथील राष्ट्रवादी पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाले आहेत. त्यातूनच माढ्यातून पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी उमेदवारी करण्याची गळ घालण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. साहेबांनीही आपण उमेदवारी करण्याचे सूतोवाच केले आहेत. मात्र, आता साहेबांच्या उमेदवारीला ठाम विरोध करण्यासाठी मोहिते पाटील गट सक्रिय झाला आहे.

सध्या राज्यभरात भाजप सरकारच्या विरोधात जनमत एकवटत आहे. मात्र, सरकार विरोधात असलेली हीच नाराजी मतात रूपांतर करण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी कमी पडत आहे. या दोन्ही पक्षांतील अंतर्गत गटबाजी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उफाळून आली आहे. राज्यभरात असेच चित्र असताना माढा लोकसभा मतदार संघामध्ये आता खासदार मोहिते पाटील यांचे तिकीट कापण्याची तयारी पक्षाने केली आहे.

मात्र, यामुळे सोलापूर व सातारा येथील मोहिते पाटील गट साहेबांच्या विरोधात उभा राहण्याची तयारी करीत आहे. स्वतः खासदार मोहिते पाटील नाराजी प्रकट करताना दिसत नसले तरी त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी आता उघड नाराजी व्यक्त करण्याची भूमिका घेतली आहे. विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यासह यापूर्वी साहेबांनी निवडणूक न लढण्याच्या घोषणेची आठवण करून देत या गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*