गोल्डन राईस खाण्याचे हे असतील फायदे

जनुकीय फेरफार करून पिकांचे उत्पादन आणि शेतमालाची गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न सध्या जोरात सुरू आहेत. वाढत्या लोकसंख्येला खायला घालण्यासह कुपोषणाने होणारे मृत्यू आणि बालमृत्यू टाळण्याच्या हेतूने हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पर्यावरणाचा समतोल यामुळे बिघाडण्याची भीती व्यक्त होत आहे. आपल्याकडी बीटी कॉटनही त्यामुळेच बदनाम आहे. मात्र, आता बांगलादेश येथे गोल्डन राईस अर्थात सोनेरी भात ही नवी जात लागवड करून त्याच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्या यशस्वी ठरल्यास हा सुवर्णमय भाताचा खजाना आशियामध्ये खवय्यांच्या दिमतीला असणार आहे.

भात म्हटले की आठवतो तो बासमती किंवा इंद्रायणीचा सुगंध. भाताचा रंग, चव आणि स्वाद यावर त्याची गुणवत्ता ठरते. मात्र, अनेकांना काहीच खायला नसल्यावर कोणताही भात आणि कंदमुळे खावी लागतात. जगात यामुळे अनेकांचे कुपोषणाने बळी जातात. हेच रोखण्यासाठी गोल्डन राईस ही व्हरायटी बनविण्यात आलेली आहे.

१९९० मध्ये सर्वप्रथम युरोप खंडात ही जीएम (जनेटिकली मॉडीफाईड) भाताची जात संशोधित करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रामाणात अ जीवनसत्व असून त्यामुळे अ जीवनसत्व अभाव यामुळे बाधित असलेल्या आशिया व आफ्रिका खंडातील कोट्यावधी जनतेला मोठा फायदा होईल. यामध्ये गाजर, रताळी व संत्री यापेक्षाही जास्त बीटा कॅरोटिन असल्यानेच या तांदळाचा रंग पिवळसर सोनेरी झालेला आहे. पर्यावरण प्रेमींचा यास विरोध आहे. मात्र, काही देशात हा तांदूळ अनेकांसाठी सुवर्णयुग निर्माण करून गरीब जनतेसाठी सुवर्ण अध्याय रचण्याची खात्री संशोधकांना आहे.

अ जीवनसत्व अभाव याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेला नकाशा. यात भारतासह आशिया, आफ्रिका व काही प्रमाणात समृद्ध अशा युरोप-अमेरिकन देशांचाही समावेश आहे. (स्रोत : जनेटिक लिटरसी प्रोजेक्ट)
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*