पवार नेमके खेळतायेत कुणाकडून..?

माजी संरक्षण मंत्री आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी ११ मार्चला युपीए आणि घटक पक्षासंदर्भात एक ट्विट केलं आहे की, “भाजपा युतीच्या राजकारणासाठी जिथे झारखंड, बिहारमध्ये जिंकलेल्या जागाही घटकपक्षांना सोडवयास तयार आहे तिथे युपीएतील पक्ष हरलेल्या जागाही इतरांसाठी सोडायला तयार नाहीत” हे ट्विट बिहार आणि झारखंड या दोन राज्यांच्या संदर्भात असले तरी महाराष्ट्रातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.

महाराष्ट्रात गेली पाच वर्षे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडलेले शिवसेना-भाजप हे पक्ष एकूणच परिस्थितीचा अंदाज घेत युती करायला तयार झाले. राज्यात राजकीय ताकद वाढलेली असूनही युतीसाठी भाजप या मोदी-शाह यांच्या पक्षाने शिवसेनेसाठी अधिकची जागा सोडायलाही तयार दाखविली. याउलट आघाडीमध्ये नगरच्या जागेवरून झालेला संघर्ष उभ्या महाराष्ट्राने अनुभवला आहे. ह्या संघर्षातून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपविरोधात ज्यांना सेनापती म्हणून लढायचं आहे त्यांच्याच उमेदवारीबाबत जर एकमेकांत पूर्वाश्रमीचे वाद उकरून काढले जात असतील तर ही लोकं एकमेकांच्या साथीने विरोधकांना कशी काय मात देतील हा मोठा प्रश्न आहे.

कॉंग्रेसमधून बंडखोरी केलेले सुजय विखे नगर महापालिका नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह…

निवडणूकीच्या या सर्व प्रक्रियेत स्थानिक राज्य काँग्रेस नेतृत्वाने एक सक्षम आणि सर्वपक्षीय आघाडी कशी होईल हे पाहणं गरजेचे होतं. परंतु, दिल्लीच्या हातात गोष्टी देऊन दिल्लीवरूनच सर्व होईल ही पिढीजात काँग्रेसी भूमिका त्यांनी कायम ठेवली. स्थानिक नेत्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसच्या दिल्ली नेतृत्वाने याबाबत ठोस भूमिका घेणं गरजेचं होतं. परंतु, तेही तितकेसे महाराष्ट्राबाबत गंभीर आहे असे दिसलेच नाहीत. राजू शेट्टी असोत किंवा वंचित आघाडी असो किंवा समाजवादी पक्ष आणि भारिप कुणासोबतच आघाडीचे स्वरूप ते नक्की करू शकलेले नाहीत. वंचित आघाडीने तर आता वेगळे लढण्याची घोषणा केली आहे. *(त्यांचा मागण्या योग्य की अयोग्य हा चर्चेचा विषय असू शकतो परंतु, त्यांचा पर्याय आजही काँग्रेसकडे नाही)

या सर्व घडामोडीमध्ये काँग्रेसने जरी अपरिपक्व भूमिका घेतली असली तरी यात आजघडीला महाराष्ट्रातील सर्वाधिक अनुभवी राजकारणी असलेल्या शरद पवार यांनी मोठेपणाची भूमिका दाखवणं गरजेचे होते. या घडामोडीत भूमिका घेणं सोडा शरद पवार नेमके कुणाकडून खेळतायेत ह्यावरच मोठं प्रश्नचिन्ह गेल्या काही दिवसातील त्यांच्या भूमिकांना पाहिल्यास निर्माण होत आहे.
महाराष्ट्राचे जाणते राजे म्हटल्या जाणाऱ्या पवार साहेबांनी खरतर ह्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत नेतृत्व करत आघाडी विजयीपथावर कशी राहिलं हे पाहणं गरजेचे होते. परंतु, पवार मात्र आपल्या भूमिकातुन आघाडीच्या जागा वाढवण्याऐवजी त्या अडवून कशा ठेवता येईल याचेच राजकारण करत असल्याचे चित्र आहे.

नगरच्या जागेचे ताज उदाहरण असेल, किंवा वंचित आघाडीशी चर्चा न करण्याची भूमिका असेल, पवार आघाडीऎवजी युतीपुरकच भूमिका घेतायेत की काय अशी शंका उपस्थित होते आहे. चांदयापासून बांदयापर्यंतच्या महाराष्ट्राची खडा न खडा माहिती असलेल्या पवारांना नगर दक्षिणच्या जागेच्या बाबतीत राजकिय अंदाज नसेल हे म्हणणं हास्यास्पद होईल. पवारांच्या बोलण्यातून नगरचा अंदाज बरेचदा दिसूनही आला होता. हे सर्व असतानाही केवळ आपल्या जुन्या वादातून जागा न सोडणं हे खरतर पवारांच्या राजकीय अड्डेलतट्टूपनाचेच लक्षण आहे ही भावना सर्रासपणे बोलले जात आहे. जागा न सोडण्याची भूमिका घेतल्यानंतर जुन्या वादाची आठवण करून देणे हे आगीत तेल ओतण्यासारखंच होत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सभांना जमणारी गर्दी…

वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम आहे असे म्हटले जातं आहे. ते येणारा काळ ठरवेलच. परंतु आजच्या घडीला वंचित आघाडीला मिळणाऱ्या मतांमुळे मतविभागणीचा सरळसरळ तोटा कॉंग्रेस आघाडीला होणार हे उघड आहे. पवारांनी तरीही वंचितआघाडी सोबत चर्चाच न करण्याची भूमिका घेणं नक्की पवारांना काय हवंय ह्याबद्दल शंका निर्माण करते आहे. राजकिय चकव्यासाठी माहीर असणाऱ्या पवार यांच्या या सर्वच भूमिका त्यामुळेच आघाडीला फायदा कमी आणि नुकसानच करत आहेत की काय, हेच चित्र सध्या दिसत आहे. त्यातून पवार कसा मार्ग काढणार की आहे त्या वर्तुळात फिरून-फिरून कॉंग्रेस आघाडी राज्यात दमणार यावर राज्यातील ४८ जागांचा निकाल ठरणार आहे…

लेखक : राहुल ठाणगे (राजकीय अभ्यासक) मो. 7040144341

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*