वारे विदर्भाचे | भाजपला कॉंग्रेसची टक्कर..!

विदर्भ म्हणजे देशातील सर्वाधिक आत्महत्या होणारा प्रदेश म्हणून नावलौकिक असलेला प्रदेश. हा बदनामीचा डाग मागील चार वर्षातही भाजप पुसू शकली नाही. उलट नागपूर शहरात मोठा विकासनिधी देताना या भागातील शेतकऱ्याला सरकारने सापत्न वागणूक देताना ग्रामीण भागावर अन्याय केल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. हे या भागाचे दुर्दैव आहे.

सरकार बदलले म्हणून विदर्भाची परिस्थिती मात्र फारशी बदलेलीच असे नाही. विदर्भाच्या याच विदारक स्थितीमुळे वेळोवेळी वेगळ्या विदर्भाची मागणीही होत राहते. आताही काहीजण त्यासाठी आग्रही आहेत. राजकीयदृष्ट्याही हा भाग नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. उजव्या विचारसरणीची अग्रणी संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय याच विदर्भात आहे. 2014 ला त्यामुळेच उजव्या विचारसरणीच्या राजकारनास “अच्छे दिन” आल्यानंतर या भागाचेच असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राची तर, नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी आली. त्या बरोबरीने राज्यातील महत्वाची अशी बरीच खाती विदर्भाच्या वाट्याला आली आहेत.

विदर्भातील शेतकरी व कष्टकरी ठरविणार भाजपचे भविष्य…

मागील लोकसभा निवडणुकीत या भागात कॉंग्रेस-राष्ट्रवादी खातेही उघडू शकली नव्हती. सर्वच्यासर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्येही युतीने आपले एकहाती वर्चस्व राखले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. विदर्भाला लागूनच असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्येही त्यांतर भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचाही फटका आणि वारे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिसतील असेच चित्र आहे. त्यामुळे येथून भाजपच्या किती जागा कमी होणार, यावर देशाचे लक्ष राहणार आहे.

यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या दोन टप्प्यात लोकसभेची निवडणूक होते आहे. बदलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भाजप-सेनेला शह देण्याचा प्रयत्न करीत असली तरी अंतर्गत मतभेद आणि विखुरलेलं संघटन यामुळे आघाडी सेना-भाजप युतीवर कितपत भारी पडेल, याबाबत शंकाच आहे. भारिप प्रमुख असलेल्या प्रकाश आंबेडकर यांचा अकोला लोकसभा मतदारसंघ याच भागात असल्याने आंबेडकर प्रणित भारिप-बहुजन-वंचित आघाडीही आपली शक्ती दाखविण्याचा प्रयत्न करेल. अमरावती, अकोल्यासारख्या एखाद-दुसऱ्या मतदारसंघात त्यामुळेच तिरंगी वा बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी थेट लढतीचीच शक्‍यता अधिक आहे. ग्रामीण भागातील व कष्टकरी शहरी मतदार भाजपला कितपत साथ देतात, यावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे.

लेखक : राहुल ठाणगे (राजकीय अभ्यासक) मो. 7040144341

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*