राणे कोणाला बुडविणार बादलीत..?

पुणे :
माजी मुख्यमंत्री व कोकणचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पार्टीला निवडणूक आयोगाने बादली हे चिन्ह दिले आहे. महाराष्ट्रातील धडाडीचे राणे आता त्यांच्या या बादलीत कोणाला बुडविणार आणि कोणाला फक्त बुचकळून बाहेर काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेत असताना फर्ड्या भाषेत काँग्रेसची पिसे काढणारे नारायण राणे नंतर वैयक्तिक राजकीय कारणाने काँग्रेसमय झाले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासह सामना वृत्तपत्राने त्यामुळेच त्यांना वेळोवेळी लक्ष्य केले. मागील वर्षी त्यांनी काँग्रेसला राम..राम करीत भाजपत जाण्यासाठीची तयारी केली. पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी त्यासाठी त्यांना पक्षाचे दरवाजे खोलले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला न दुखविण्यासाठी त्यांचा स्वाभिमान जागृत करून महाराष्ट्र स्वाभिमान हा पक्ष स्थापन करण्यास भाग पाडले. भाजपचे खासदार असल्याने त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रचार समितीत शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वर्णी लावली. मात्र, आता पुन्हा एकदा भाजपने बॅकफूटवर येऊन सेनेशी घरोबा केल्याने राणे भाजपत एकाकी पाडले. हीच गळचेपी दूर करण्यासाठी राणे पुन्हा स्वाभिमान जागृत होऊन बादली चिन्हासह लोकसभेच्या काही जागा लढविणार आहेत. त्यांच्या या बादलीत ते कोणाला बुचकळून काढणार, कोणाला थेट बुडविणार आणि कोणाला बादलीतून पाणी पाजणार याबद्दलची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*