
पुणे :
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काहीही करून दोन आकडी खासदार निवडून आणून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. त्यातूनच शिरूर आणि नगर या दोन्ही जागा जिंकण्याची व्यूहरचना या पक्षाने आखली आहे.
शिरूर म्हणजे शिवसेना आणि खासदार आढळराव पाटील यांचाच विजय, हे समीकरण यंदा मोडीत काढण्याची तयारी पक्षाने केली आहे. त्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांना बाजूला ठेऊन सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने पक्षात घेतले आहे. शिवसेनेत असताना खासदार आढळराव पाटील यांनी दिलेली वागणूक व अनुभव याचे उट्टे काढण्यासाठीच यंदा डॉ. कोल्हे निवडणूक लढवून विजयी होणार असल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.
शिरुमधून असे जोरदार आव्हान उभे करतानाच विखे पाटील गटाने मोठा दबाव आणूनही राष्ट्रवादीने नगरची जागा काँग्रेसला सोडलेली नाही. उलट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनाच पक्षात आणून येथील जागा काबीज करण्याची व्यूहरचना ज्येष्ठांनी आखली आहे. डॉ. सुजय किंवा कोणताही उमेदवार देऊन येथील भाजप खासदार दिलीप गांधी यांची जागा हिसकावून घेण्याची तयारी या पक्षाने केली आहे. नगर व शिरूर या दोन्ही जागांवरील उमेदवार त्यामुळेच पुढील 36 तासांत ठरविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी व काँग्रेस नेते आणि पक्षामधील बेबनाव, तसेच पक्षांतर्गत गटबाजी यातून पक्ष कसा मार्ग काढतो यावरच या दोन्ही जागांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.
Be the first to comment